Join us   

महिलांना थायरॉईडचा त्रास जास्त, कसे ओळखाल की आपल्याला थायरॉईडचा त्रास होतोय? डॉक्टर सांगतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 12:07 PM

Thyroid Disease: Causes, Symptoms, Risk Factors हार्मोनल बदल छळतात तेव्हा दुर्लक्ष करू नका..

आजच्या काळात, अनेक लोक थायरॉईड या आजाराशी झुंजत आहे. थायरॉईड ही आपल्या घशातील एक ग्रंथी आहे. या थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी, यासह हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉईड ग्रंथी ही ट्रायओडोथायरोनिन (T3) आणि थायरॉक्सिन (T4) या दोन महत्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होतात अथवा, अत्यंत कमी प्रमाणात होत असल्यास, तेव्हा थायरॉईडचा त्रास सुरु होतो. त्या त्रासाला थायरॉईड डिसीज असे म्हणतात.

यासंदर्भात नवी दिल्लीमधील सर गंगाराम हॉस्पिटलचे प्रतिबंधात्मक आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. सोनिया रावत सांगतात, ''थायरॉईडची समस्या साधारणपणे दोन प्रकारच्या असतात. जेव्हा आपली थायरॉईड ग्रंथी कमी प्रमाणात हार्मोन्स तयार करते, तेव्हा या समस्येला हायपोथायरॉईडीझम म्हणतात.

या स्थितीत शरीरातील चयापचय क्रिया मंदावते. जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात हार्मोन्स सोडू लागते, तेव्हा या समस्येला हायपरथायरॉईडीझम म्हणतात. अशा स्थितीत शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते. काही लोकांना थायरॉईड वाढण्याची समस्या येते, तर काही लोक कमी थायरॉईडच्या समस्येला बळी पडतात. थायरॉईडच्या या दोन्ही परिस्थिती लोकांसाठी हानिकारक आहेत''(Thyroid Disease: Causes, Symptoms, Risk Factors)

या ४ कारणांमुळे वाढू शकते थायरॉईड

शरीरात आयोडीनची कमतरता

ऑटोइम्यून डिसऑर्डरमुळे त्रास

कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक कारणांमुळे थायरॉईड

काही रोगांवरील औषधांमुळे हा आजार उद्भवू शकतो 

थायरॉईडची लक्षणे

थायरॉईड त्रासाच्या प्रकारानुसार, थायरॉईडची लक्षणे असतात. हायपरथायरॉईडीझम असल्यास, झोपेच्या तक्रारी, दुर्बलता, वजन कमी होणे, थायरॉईडचा आकार वाढणे, महिलांमध्ये मासिक पाळीच्या निगडीत समस्या सुरु होणे, गरम वाटणे अशी लक्षणे जाणवतात. हायपोथायरॉईडीझमची समस्या असल्यास लठ्ठपणा, पोट साफ न होणे, थकवा, केस गळणे, थंडी अधिक जाणवणे अशी लक्षणे जाणवतात.

तोंडात सतत फोड येतात? लाल चट्टे, ही सामान्य लक्षणे की कॅन्सर होण्याची शक्यता? तपासा...

थायरॉईडचा त्रास कोणाला होऊ शकतो

थायरॉईडचा त्रास हा कोणत्याही वयाच्या स्त्री - पुरुषांना होऊ शकतो. मात्र, स्त्रियांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. कौटुंबिक इतिहास आणि अनुवांशिक कारणांमुळे देखील थायरॉईडचा त्रास होऊ शकतो. टाईप - १ डायबिटिज रुग्ण, आमवाताचे रुग्ण, वयाच्या साठीनंतरचे व्यक्ती, या लोकांना थायरॉईडचा त्रास होण्याची शक्यता आहे.

थायरॉईडची समस्या कशी नियंत्रित करता येईल?

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, थायरॉईडवर नियंत्रण ठेवण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब केला पाहिजे. चयापचय क्रिया चांगली ठेवण्यासाठी रोज व्यायाम करावा. आयोडीन युक्त आहार घ्यावा. पुरेशी झोप घ्यावी. वेळोवेळी चाचण्या केल्या पाहिजेत. वयाच्या साठीनंतर थायरॉईडच्या समस्यांचा धोका अधिक वाढतो. विशेषत: महिलांनी थायरॉईडबाबत खूप काळजी घ्यावी.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल