पोटाचे आरोग्य चांगले असले तर आपली तब्येत चांगली असते. पण पोट किंवा पचनक्रिया बिघडली की आपल्यालाही आरोग्याच्या बाबतीत तक्रारी निर्माण होतात. यामध्ये अनेकदा खाल्लेल्या अन्नाचे पचन न झाल्याने अॅसिडीटी होणे, कधी पोटात गॅसेस फिरणे तर कधी बद्धकोष्ठता होऊन कोठा जड होणे अशा समस्या उद्भवतात. पोट वेळच्या वेळी नीट साफ झालं नाही तर आपल्याला खूप अस्वस्थ वाटत राहतं, पुरेशी भूक लागत नाही, त्यामुळे झोपही नीट येत नाही (Simple food Hack for better gut health add unripe or Semi ripe Banana in Diet).
एकदा हे चक्र बिघडलं की ते पुन्हा ताळ्यावर यायला बराच वेळ लागतो. याचा आपल्या कामावर, वैयक्तिक आयुष्यावर परीणाम होत असतो. पण हे पोटाचे आणि पचनाचे बिघडलेले चक्र नीट करायचे तर त्यासाठी एका सोपा उपाय कोणता ते आज आपण पाहणार आहोत. आहारतज्ज्ञ निधी काकर आपल्या आर्ट ऑफ वेलनेस या इन्स्टाग्राम पेजवरुन हा अतिशय सोपा उपाय सांगतात.
उपाय काय?
अर्धवट पिकलेली केळी हा पोटाचे आरोग्य चांगले होण्यासाठी अतिशय उत्तम उपाय असतो. अशा केळ्यांमध्ये साखरेचे प्रमाणही बेताचेच असते. तसेच यामध्ये रेझिस्टंट स्टार्च असतो. हा स्टार्च म्हणजे एकप्रकारचे सोल्यूबल म्हणजेच विरघळणारे फायबर असते जे आपल्या शरीराला योग्य पद्धतीने पचत नाहीत. मात्र तरीही हे बॅक्टेरीया आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात.
त्यामुळे न पिकलेली केळी अवश्य खायला हवीत. या केळ्यांची भजी, भाजी, काप, वेफर्स असे काही ना काही प्रकार आपण नक्कीच करु शकतो. बाजारातही काही ठिकाणी अशी केळी अगदी सहज मिळतात. मधुमेह, पचनाच्या तक्रारी यांसाठी ही केळी फायदेशीर असल्याने त्यांचा आपल्या आहारात आवर्जून समावेश करायला हवा.