लघवी लागणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून ती योग्य त्या प्रमाणात, योग्य पद्धतीने होत असेल तर ठिक आहे. पण लघवी करताना जळजळ होणे, लघवीचा रंग बदलणे, लघवी खूप जास्त वेळा होणे या जशा अडचणी आहेत त्याचप्रमाणे लघवी कमी प्रमाणात होणे ही पण समस्याच आहे. लघवी कमी होण्यामागे आपला आहार, आहारातील प्रोटीनचे प्रमाण, पाणी पिण्याचे प्रमाण, अनुवंशिकता किंवा आरोग्याशी निगडीत इतर काही समस्यांचा समावेश असतो. लघवीच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आरोग्यविषयक धोका पत्करणं होय (Simple Solutions for Water Retention in Body or less urination by Anjali Mukerjee).
त्यामुळे लघवी कमी होत असले तर योग्य ती काळजी घ्यायला हवी. लघवीच्या समस्येकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर भविष्यात गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पाणी जास्त प्रमाणात पिण्याबरोबरच लघवी योग्य प्रमाणात व्हावी आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडावेत यासाठी काय करावं याविषयी आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी २ सोपे उपाय सांगतात. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून त्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या विषयाबाबत माहिती देतात. आरोग्याच्या समस्यांवर औषधे घेण्यापेक्षा अशाप्रकारचे पारंपरिक आणि नैसर्गिक उपाय करणे केव्हाही जास्त चांगले.
१. नारळ पाणी
तुम्हाला लघवी कमी प्रमाणात होत असेल तर रोज न चुकता एक किंवा दोन ग्लास नारळ पाणी प्या. यामुळे लघवीचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. आपल्या घराच्या आसपास किंवा हल्ली ऑनलाईनही नारळ पाणी सहज मिळते. त्यामुळे औषधे घेण्यापेक्षा हा सहज आणि सोपा उपाय आहे.
२. कुळीथ डाळ सूप
कुळीथ हे कडधान्य असून त्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे असतात हे आपल्याला माहित आहेच. कुळथाचं पिठलं, कुळथाची उसळ असे पदार्थ आपण काही वेळा खातो. मात्र कुळथाचं सूप प्यायल्यास त्याचा लघवीची समस्या दूर होण्यास फायदा होतो. कुळीथ रात्रभर भिजत घालून ती पाणी घालून कुकरला शिजवा. याच्या वर जे पाणी येईल त्यामध्ये लसूण, जीरं, मीठ घालून उकळा आणि हे सूप दिवसभर प्या.