आपण नियमितपण आहारात विविध पदार्थांचा समावेश करत असतो. आरोग्य उत्तम राहावं यासाठी आपण शक्य तितका पौष्टीक आहार घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण खात असलेल्या गोष्टींमध्येही थोडेसे बदल केले तरी आपल्याला त्याचा अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. आपला अग्नी हा शरीरातील महत्त्वाचा घटक असतो. तो अग्नी शांत ठेवायचा आणि आरोग्याचं संतुलन राखायचं तर आहार उत्तम असायला हवा. रोजच्या आहारात काही लहान बदल केले तरी आपले वात, कफ, पित्त यांसारखे दोष दूर होण्याची शक्यता असते. हे बदल खूप मोठे नसून अतिशय लहान असल्याने ते करणे अतिशय सोपे आहे. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रेखा राधेमणी यासाठीच काही अतिशय सोप्या टिप्स देतात त्या कोणत्या पाहूया (Simple swap that can improve your gut health)...
१. सॅलेड आहारात असायला हवे म्हणून आपण कच्चे सॅलेड खातो. पण त्याची कोशिंबीर केली तर ती पचायला जास्त हलकी होते. यामध्ये लिंबू, दही, फोडणी घातल्याने त्यावर एकप्रकारची प्रक्रिया होते आणि सॅलेड पचते.
२. ब्राऊन राईस आरोग्यासाठी चांगला असतो असं आपल्याला सांगितलं जातं. म्हणून आपण कोणतीही माहिती न घेता तो खायला सुरुवात करतो. पण पांढरा भात खाणे पोटाच्या आरोग्यासाठी जास्त चांगले असते.
३. आपण आहारात विविध प्रकारच्या तेलांचा वापर करतो. यामध्ये सूर्यफूल, शेंगदाणा, तीळ, ऑलिव्ह अशा तेलांचा समावेश असतो. पण त्यापेक्षा तूप खाणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त फायदेशीर असते. त्यामुळे हे लहान बदल तुम्ही नक्कीच करु शकता.
४. आपण साधारणपणे म्हशीचे किंवा गाईचे दूध पितो. चहासाठीही आपण याच दुधाचा वापर करतो. पण त्यापेक्षा शेळीचे दूध अधिक पौष्टीक असते. हे दूध सहजासहजी मिळत नसले आणि त्याची किंमत थोडी जास्त असली तरी आरोग्यासाठी ते जास्त फायदेशीर असते.
५. आपण हलका आहार म्हणून काहीवेळा अतिशय सपक आहार घेतो. मात्र पदार्थांमध्ये मसाले घातले तर त्याला एकप्रकारचा फ्लेवर येतो आणि तो पदार्थ पचणे जास्त सोपे होते. त्यामुळे खूप सपक आहार घेण्यापेक्षा नीट मसाले घातलेले अन्न खाणे केव्हाही जास्त चांगले.
६. आपण साधारणपणे सुकामेवा कच्चा खातो. पण अने न करता सुकामेवा हा कायम भिजवून शक्य त्या सुकामेव्याची साले काढून खाल्ल्यास त्यातून आरोग्याचे जास्त चांगल्या प्रकारे पोषण होते.