डॉ. दाक्षायणी पंडित
तीस वर्षांची मनीषा लोकांकडे घरकाम करायची. तिचा बाहेरख्याली नवरा दोन वर्षांपूर्वी एड्सने वारला तेव्हा ती बरी होती. पण गेल्या दोन महिन्यात १० किलो वजन घटलं होतं. बराच खोकलाही येत होता. नेहमीच्या डॉक्टरांना तिच्या नवऱ्याची सगळी माहिती होती. तिने त्यांना विचारलं, “डॉक्टर, मला एड्स तर नसंल? मी ऐकलंय, नवऱ्याकडून बायकुला लागण व्हती म्हून.” ते म्हणाले, “घाबरू नका. आपण तुमच्या काही चाचण्या करून घेऊ.” तिला त्यांनी एड्सबद्दल समजावून सांगून एड्स व क्षयरोगाची चाचणी करायला पाठवलं. दोन्ही चाचण्यांवरून एड्स वा क्षयरोग दोन्ही झाल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी मनीषाला एड्स व क्षयरोग दोन्हींच्या मोफत उपचारांसाठी सरकारी दवाखान्यात पाठवलं (how to Treat HIV Aids).
आजाराचं नाव – एड्स
रोगकारक जंतू- मानवी प्रतिकार न्यूनताकारक विषाणू (एच आय व्ही). हा विषाणू माणसाच्या प्रतिकारशक्तीचा हळूहळू नाश करीत जातो आणि ती आवश्यकतेपेक्षा खूप कमी झाल्यावर विविध संसर्ग होतात.
एड्स- अक्वायर्ड (उपार्जित)इम्युनोडिफिशियन्सी (प्रतिकार न्यूनता)सिन्ड्रोम (लक्षण समूह). हा आजार मानवी प्रतिकारशक्तीचा ह्रास करणाऱ्या विषाणू (एचआयव्ही) मुळे होतो याचा प्रसार मुख्यत्वे असुरक्षित तसेच अनेक व्यक्तीशी लैंगिक संबंध, एचआयव्ही संक्रमित रक्तदात्याचे रक्त दिले गेलेल्या व्यक्तीस, दूषित रक्त/सुया/साधने इ. मार्फत व आईकडून गर्भाला अशा प्रकारे होतो. भारतात आज लक्षावधी एचआयव्ही संसर्गित व्यक्ती आहेत. रक्तातून प्रसाराचा धोका शंभर टक्के असल्याने रक्तपेढीतील प्रत्येक रक्ताची एचआयव्ही चाचणी होते. दूषित रक्त नष्ट केल्याने, साधने निर्जंतुक करूनच वापरल्याने संसर्गप्रसार थोपविता येतो. शिरेतून नशेची औषधे टोचून घेणाऱ्यांमध्ये संसर्गित व्यक्ती असेल तर दूषित सुईचा सामाईक वापर संसर्ग पसरवतो.
लक्षणे-संसर्ग झाल्यानंतर रुग्णांना सहसा त्रास होत नाही. काहींना ताप, खोकला, डोकेदुखी, अंगावर पुरळ इ. त्रास होतो. ३-४ महिन्यांनी अनेक ठिकाणच्या लसिका ग्रंथींची वाढ, वजन वेगाने घटणे, ताप, खोकला, जुलाब इ. लक्षणे दिसतात. लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास व रुग्ण बरा न झाल्यास तो मृत्युमुखी पडतो. अनेकांना १० ते १५ वर्षे त्रास होत नाही. हा विषाणू जंतूंशी लढणाऱ्या पेशींमध्ये शिरून तिथेच वाढतो व त्यांना मारून टाकतो. ही प्रक्रिया सावकाश होते. उपायांअभावी मृत्यू निश्चित असतो. लढाऊ पेशींची संख्या खूप कमी झाल्यावर लक्षणे दिसायला लागतात. ती प्रामुख्याने कोणत्या तरी जंतुसंसर्गामुळे असतात. यात बरेच संधिसाधू जंतूही असतात. क्षयरोग, मेंदू आवरण दाह, बुरशी तसेच अनेक जीवाणू, विषाणू व परजीवी घटलेल्या प्रतिकार शक्तीचा फायदा घेऊन आपले बस्तान बसवतात. प्रत्येक संसर्ग हा अधिक गंभीर व घातक असतो. काही रुग्णांना कॅपोसीज सार्कोमा, लिम्फोमा इ. कर्करोग होतात.
निदान- एड्सची ठराविक लक्षणे नसतात. ताप, खोकला, जुलाब, त्वचेवर पुरळ इ खूप दिवस असेल व कोणत्याही उपचाराने बरे होत नसेल तसेच १-२ महिन्यात वजन ५-१०किलोने कमी झाले तर एड्सची शंका घ्यावी. या अवस्थेनंतर उपचार केले नाहीत तर सतत आजारी पडत थोड्या अवधीत रुग्ण मृत्युमुखी पडतो.
आता निदानासाठी उत्तम प्रकारच्या विविध चाचण्या उपलब्ध आहेत. संसर्ग झाल्या झाल्या रुग्णाच्या रक्तात विषाणूची प्रतिजने (अँटिजेन्स) असतात पण त्यांचे प्रमाण खूप कमी असते व रुग्ण लक्षणे नसल्याने डॉक्टरांकडे जात नाही. प्रतिजने शोधू शकणारी पीसीआर चाचणी उपलब्ध आहे. तिची निदानक्षमता विषाणूंच्या संख्येवर अवलंबून असते. संसर्गानंतर ३ महिन्यांच्या आसपास प्रतिपिंडे तयार होतात व त्यांचे अस्तित्वदर्शक चाचण्या निदान होण्यास मदत करतात. यासाठी अनेक पटकन होणाऱ्या चाचण्या आहेत. पण त्यांची खात्री करून घेणे गरजेचे असते.
उपचार –एड्स पूर्ण बरा होत नाही. पण आता एचआयव्ही वर उत्तम नियंत्रक औषधे उपलब्ध आहेत. ती डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित घ्यावीत. शिवाय कुठला संसर्ग झाल्यास जोडीने तीही औषधे घ्यावीत. यामुळे पुढे बरेच आयुष्य मिळते.
प्रतिबंध- काँडोमचा वापर संसर्ग रोखतो. धोक्याचे वर्तन टाळा. अजून तरी एड्सवर लस नाही.
मैत्रिणींनो, काळजी घ्या. तुम्हाला किंवा पतीला एड्सची शंका असल्यास संकोच न करता डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )