वर्क फ्रॉम होम किंवा एरवीही ऑफीसमध्ये सतत खुर्चीत एकाच पोझिशनमध्ये बसून पठ, पाय दुखण्याची समस्या आपल्यातील अनेकांना भेडसावते. कितीही ठरवलं तरी व्यायामाला वेळ होत नाही. घरातली कामं आणि ऑफीस करता करता नाकात दम येतो, तेव्हा व्यायाम कधी करणार. पण ऑफीसच्या कामासाठी मात्र दिवसभर खुर्चीत बसण्य़ाला पर्याय नसतो. मधे पाय मोकळे करण्यासाठी उठलो तरी पुन्हा त्याच पोझिशनमध्ये ८ ते १० तास बसून राहावे लागते. अशावेळी मांड्या, पाय पार अवघडून जातात. रात्री झोपलो की किंवा सकाळी जोपेतून उठताना पायातून कळा येतात. कधीकधी पाय एकदम जड झाल्यासारखे वाटतात. तुम्हालाही असंच होत असेल तर वेळीच काळजी घ्या नाहीतर ही समस्या गंभीर रुप धारण करु शकते. व्यायाम करायला वेळ नसेल तर काम करता करताच खुर्चीच्याच मदतीने तुम्ही हे स्ट्रेचिंगचे प्रकार नक्कीच करु शकता. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना याबाबत सांगत आहेत. पाहूयात कोणते स्ट्रेचिंग केल्याने तुमच्या पायांच्या स्नायूंना आराम मिळू शकतो.
१. एक पाय म्हणजेच पायाचे पाऊल खुर्चीवर ठेवायचे. खालचा पाय जमिनीला टेकलेला राहील याची काळजी घ्यायची. हाताने खुर्चीच्या दोन्ही कडांना धरायचे आणि शरीर पुढच्या बाजूला झुकवा. यामुळे एका पायात वाकलेले असताना एक पाय सरळ राहील. त्यामुळे मांड्यांना आणि नितंबाच्या स्नायुंना ताण पडेल. इतकेच नाही तर या स्ट्रेचिंगमुळे मणक्याचाही व्यायाम होऊन त्याचे स्ट्रेचिंग होण्यास मदत होईल. त्यामुळे एका स्ट्रेचिंगमध्ये पाय, पाठ, मणका, मांड्या असे सगळे स्नायू मोकळे होण्यास मदत होईल.
२. एका पायाची टाच खुर्चीत ठेवा, पायाची बोटे वरच्या दिशेला राहील असे पाहा. हात वर घेऊन समोरच्या भिंतीला धरा. यामध्ये कंबरेतून वाकायचे आहे हे लक्षात ठेवा. या स्ट्रेचिंगमुळे पाय, मांड्या, मणका, पाठ असा सगळ्याला ताण पडेल आणि स्नायू मोकळे होण्यास मदत होईल. काम करता करता किंवा अगदी एखादी मिटींग, सेशन सुरू असतानाही व्हिडिओ बंद ठेऊन तुम्ही हे व्यायाम सहज करु शकता. त्यामुळे तुमचे पाय दुखणे नक्की कमी होऊ शकते.
३. दिवसभर खुर्चीत बसून काम केल्याने आपले पायच दुखतात असे नाही तर मान, खांदेही दुखतात. त्यासाठी पहिल्या पोझिशनप्रमाणे एक पाय खुर्चीत ठेऊन एका हाताचे कोपर गु़डघ्याच्या आतल्या बाजूला घ्यावा आणि पाठीला ताण पडेल अशारितीने मागे वळावे. यामुळे पाठ, पाय, मणका अशा सर्व स्नायूंना आराम मिळतो. दिवसातून १० मिनीटे हे व्यायामप्रकार आपण नक्कीच करु शकतो.