Join us   

डायबिटीस असणाऱ्यांना किती तास झोप गरजेची? झोप कमी झाली तर शुगर वाढते का..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 11:50 AM

Sleep Routine Of Diabetic Patients For Sugar Control : डायबिटीस असणाऱ्यांना किती तास झोप गरजेची असते आणि ती मिळाली नाही तर शुगर वाढते का हे समजून घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्दे रोजची झोपायची वेळ आणि उठायची वेळ निश्चित केली आणि हे टाईमटेबल फॉलो केले तर झोप पूर्ण होऊन आराम मिळतो आपल्या रक्तातील साखर खूप जास्त असेल किंवा खूप कमी असेल तर आपल्याला रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवते.

डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी पन्नाशीनंतर उद्भवणारी ही समस्या आता वयाच्या तिशीतच निर्माण व्हायला लागली आहे. डायबिटीस झाला की सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे औषधे आणि डाएट. याबरोबरच व्यायाम, झोप या गोष्टींकडेही पुरेसे लक्ष देणे आवश्यक असते. सणावाराच्या दिवसांत किंवा एरवीही आपले आरोग्याकडे पुरेसे लक्ष दिले जातेच असे नाही. मात्र यामुळे आपल्याला असणारे त्रास वाढण्याचीच शक्यता असते. कधी ऑफीसच्या कामाचा ताण तर कधी घरगुती जबाबदाऱ्या आणि मोबाईलचे व्यसन यांमुळे आपण उशीरा झोपतो. इतकेच नाही तर सकाळीही ऑफीसला जायचे असल्याने आणि घरातली कामे असल्याने आपल्याला लवकर उठावे लागते. यामुळे आपली पुरेशी झोप होतेच असं नाही. मात्र डायबिटीस असणाऱ्यांना किती तास झोप गरजेची असते आणि ती मिळाली नाही तर शुगर वाढते का हे समजून घेणे आवश्यक आहे (Sleep Routine Of Diabetic Patients For Sugar Control). 

(Image : Google)

कमी झोप घेतली तर काय होतं? 

आपली झोप कमी झाली तर शरीरावर त्याचा ताण येतो. ज्यामुळे कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्सची निर्मिती होते. यामुळे शरीरात निर्माण होणाऱ्या इन्शुलिनला विरोध होऊन रक्तातील साखरेचे प्रमाण वाढायला लागते. अमेरिकन अॅकॅडमी ऑफ स्लिप मेडिसिनच्या म्हणण्यानुसार, डायबिटीस असणाऱ्या १० रुग्णांपैकी ७ जणांना ऑब्सट्रक्टीव स्लीप अॅप्नियाचा त्रास असतो. गळ्यापाशी जास्त प्रमाणात चरबी निर्माण झाल्यामुळे हा त्रास उद्भवतो. त्यामुळे झोपेत पूर्ण वेळ श्वास न घेता थांबून थांबून श्वास घेण्याची क्रिया शरीराकडून केली जाते. त्यामुळे नकळत शरीराला कमी ऑक्सिजन मिळतो आणि जास्त वेळ झोपलो तरी झोप पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. यामुळे घोरण्याची समस्या, दिवसभर झोप येणे, चिडचिडेपणा यांसारख्या समस्या उद्भवतात. 

(Image : Google)

आपल्या रक्तातील साखर खूप जास्त असेल किंवा खूप कमी असेल तर आपल्याला रात्री झोप न येण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवल्यास झोपेची समस्या दूर होण्यास मदत होते. डायबिटीसच्या रुग्णांना आपली झोपेची सायकल चांगली ठेवायची असेल तर त्यांनी झोपेचे एक टाईमटेबल तयार करणे आवश्यक असते. रोजची झोपायची वेळ आणि उठायची वेळ निश्चित केली आणि हे टाईमटेबल फॉलो केले तर झोप पूर्ण होऊन आराम मिळतो आणि शुगर नियंत्रणात राहण्यासही मदत होते. यासाठी रात्रीच्या वेळी अल्कोहोल न घेणे, दिवसा व्यायाम करणे आणि आहार संतुलित ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांना इतरांपेक्षा जास्त म्हणजेच ७ तासांपेक्षा जास्त झोप आवश्यक असते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह