Join us   

झोपेचा खेळखंडोबा तब्येतीवर संक्रांत! तुम्ही रोज किती तास झोपता? कमी वेळ तर झोपत नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 6:47 PM

सोशल मिडिया, गेमिंग, टीव्ही किंवा मग ऑफिसचा ताणतणाव यापैकी कोणत्याही कारणामुळे जर तुम्ही झोपेच्या वेळांमध्ये बदल  करत असाल तर सावधान. कारण अपुऱ्या झोपेमुळे अनेक आजार निर्माण होऊ शकतात. 

ठळक मुद्दे सगळे ताणतणाव विसरा, अनावश्यक गोष्टींमुळे झोपणे लांबवू नका, असे तज्ज्ञ सांगतात. 

दुपारची वेळ असो किंवा रात्रीची. अशी खूप मंडळी आहेत, ज्यांना कधीही आणि कुठेही मस्त ताणून द्यायला आवडतं. अशा व्यक्तींना चटकन कुठेही झोप देखील लागते. पण असेही खूप लोक आहेत, ज्यांना खूप इच्छा असूनही आणि प्रचंड गरज असूनही झोपता येत नाही, किंवा मग ते झोपत नाहीत. तुम्हीही असंच करत असाल आणि कुठल्या न कुठल्या कारणाने झोपण्यास विलंब करत असाल, अपूरी झोप घेत असाल, तर तुमची ही अशी सवय तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकते. कारण पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचे आरोग्यावर अनेक विपरित परिणाम होतात. 

 

नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार असे सांगण्यात आले आहे की, सातत्याने तुम्ही कमी झोपत असाल तर स्माेकिंग करण्यामुळे तुमच्या आरोग्यावर जो परिणाम होतो, त्यापेक्षाही अधिक नुकसान होऊ शकते. मेंदूला आणि संपूर्ण शरीरालाच आराम मिळण्यासाठी, मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणे खूप गरजेचे आहे. सध्या तर वर्क फ्रॉम होममुळे अनेक जणांचे वर्किंग अवर्स वाढले आहेत. त्यामुळे झोपेची वेळ खूप जास्त अनिश्चित झाली आहे. सातत्याने अपुरी झोप होत असल्याने अशा व्यक्तींना खूप जास्त तणाव येत असून शरीराची कार्यक्षमता कमी होत चालली आहे. यामुळे चिडचिडेपणा, बीपी, शुगर, लठ्ठपणा, नैराश्य, अशक्त्पणा असे आजार तर वाढत आहेच, पण कॅन्सर, टाईप २ मधुमेह, अल्झायमर, हृदयरोग अशा आजारांनाही आमंत्रण मिळते आहे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. 

 

किती तास झोप घ्यावी जगण्यासाठी आपल्याला अन्न, पाणी आणि हवा जेवढी गरजेची आहे, तेवढीच गरजेची झोप आहे. पण हल्ली झोपेच्या वेळा आणि झोपेचे प्रमाण यात खूपच जास्त असंतुलन दिसून येत आहे. तरूण मुलांमध्ये झोपेचे प्रमाण खूप कमी झाले आहे. रात्री चॅटिंग करत जागायचे आणि सकाळी उशीरापर्यंत झोपायचे, असे अनेक जणांचा नित्यक्रम झाला आहे. यामुळे अशा मुलांनाही झोपेची शिस्त लावून त्यांचे आरोग्य जपण्याची गरज आहे. प्रौढ लोकांनी दररोज नियमितपणे रात्री ७ ते ९ तासांची झोप घेतली पाहिजे. किशोरवयीन म्हणजेच टीनएजर्सनी ९ तास झोपले पाहिजे. 

 

हे देखील लक्षात घ्या सध्या वजन वाढीची समस्या खूप जास्त लोकांमध्ये दिसून येत आहे. वजन वाढीसाठी जेवढ्या आहाराच्या चुकीच्या सवयी आणि बैठी जीवनशैली जबाबदार आहे, तेवढीच जबाबदार अपुरी झोप आहे. झोप योग्य प्रमाणात झाली नाही, तर चयापचय क्रिया बिघडते. या क्रियेवर परिणाम झाला तर खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठत जाते.  अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला आराम मिळत नाही. त्यामुळे मेंदूचे विकार वाढतात. स्मरणशक्ती कमी होते तसेच विसराळूपणा वाढत जाऊन पुढे त्याचे रूपांतर अल्झायमरमध्ये होण्याचा धोकाही संभवतो. त्यामुळे सगळे ताणतणाव विसरा, अनावश्यक गोष्टींमुळे झोपणे लांबवू नका, असे तज्ज्ञ सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स