झोपताना कधी - कधी घोरण्याच्या आवाजामुळे दचकून उठता का? या आवाजामुळे आपली झोप मोड झाली आहे का? बऱ्याचदा या गोष्टी होत राहतात. घोरणे ही एक सामान्य समस्या आहे, काहींना झोपेत घोरण्याची सवय असते. घोरण्यामुळे इतर लोकांना त्रास होतो. मात्र, त्याहून अधिक त्रास घोरत असलेल्या पिडीतेला होतो. ही समस्या दिसते तितकी सोपी नाही. ही एक जुनाट समस्या असू शकते, किंवा गंभीर आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. दगदग झाल्यामुळे किंवा नाक चोंदण्यामुळेही तुम्ही घोरू शकता. म्हणूनच घोरण्याच्या समस्येकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.
नाकाच्या आतील काही विकारामुळे आपण तोंडावाटे श्वास घेतो. वास्तविक पाहता डोके, तोंड, दात, कान आणि डोळे हे सर्व अवयव नाकाशी जोडलेले असतात. याचा अर्थ घोरणे ही केवळ नाकाची समस्या नसून, त्याच्या निगडीत अवयवांची देखील असू शकते. आयुर्वेदामध्ये, घोरणे किंवा नाकाशी संबंधित समस्यांवर अनेक उपाय आहेत. ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ही समस्या दूर करू शकता.
आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांच्या मते, ''नस्य हे सुप्राक्लेविक्युलर (खांद्याच्या वरच्या) विकारांवर सर्वोत्तम आयुर्वेदिक उपचार आहे. आयुर्वेदानुसार, “नासा हि शिरसो द्वारम्” म्हणजे, नाक हे मेंदूचे प्रवेशद्वार आहे. हे डोके, तोंड, दात, कान, डोळे आणि एकूणच आरोग्याशी संबंधित सर्व विकारांवर मदत करते. त्यामुळे नस्य थेरपीमुळे घोरण्याच्या त्रासापासून आराम मिळेल.''
नाकात टाका गाईचे तूप
श्वसनमार्ग मोकळा नसल्यास घोरण्याची समस्या निर्माण होते. अशा स्थितीत गाईचे देशी तूप उपयोगी पडेल. डॉक्टरांच्या मते, ''सकाळी किंवा रात्री नाकपुडीत गाईच्या तुपाचे 2 थेंब टाका. असे केल्याने चांगली झोप लागेल, डोकेदुखी (तणाव, मायग्रेन इत्यादींपासून) आराम मिळेल, यासह रोगप्रतिकारशक्ती वाढेल, अॅलर्जी कमी होईल, स्मरणशक्तीही सुधारेल.
देशी तूप नाकात टाकण्याची पद्धत
डॉक्टरांच्या मते, ''झोपण्यापूर्वी गाईच्या तुपाचे २ थेंब नाकात टाका. हे देशी तूप कोमट करून वापर करा. ही प्रक्रिया ३ महिन्यांपर्यंत करा. या उपायामुळे चांगली झोप लागेल, मन शांत राहेल, डोकेदुखी आणि घोरण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.
अणू तेल
आपल्याला जर देशी तुपाचा वापर करायचा नसेल तर, त्या ऐवजी अणु तेलाचा वापर करा. अणु तेल हे आयुर्वेदिक तेल आहे, जे अनेक औषधी वनस्पतींच्या मिश्रणातून बनवले जाते. डोके, मान, खांदे, डोळे, नाक, घसा आणि केसांशी संबंधित आजार बरे करण्यासाठी हे उपयुक्त आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन हा उपाय करावा.