ब्राच्या वापरासंदर्भात मध्यतंरी मोठा वाद गाजला. जगभरही अनेकजणी ‘नो ब्रा’ मुव्हमेण्टच्या समर्थक आहेत. मात्र तरीही ब्राचा वापर आवश्यक ठरतो. त्यामुळे स्तनांना आधार, योग्य आकार मिळणे, नीटनेटके दिसणे हे साध्य होत असले तरीही दिर्घकाळ ब्राच्या वापराने अनेक तोटेही उद्भवू शकतात. ब्राचा प्रकार, कापड, आकार याबाबत आपल्याकडे वयात आलेल्या मुलींनाही योग्य ती माहिती दिली न गेल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होताना समोर येतात. याबाबत महिलांमध्ये बरेच समज-गैरसमज असल्याचेही पाहायला मिळते. यातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रात्री झोपताना ब्रा घालावी की नाही. दिवसभर घातलेल्या ब्रामुळे झोपताना अस्वस्थ वाटू शकते. पण आपल्या स्तनांचा आकार तर बदलणार नाही ना, असे केल्यास इतर काही त्रास उद्भवणार नाही ना या भितीपोटी ब्रा काढायची इच्छा होऊनही ती काढली जात नाही.
अनेकदा लहान घर, अवतीभोवती लोक, गाऊन घालून बरं दिसणार नाही म्हणून इच्छा असूनही अनेकजणी रात्रीपण ब्रा घालून झोपतात. पण तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना ब्रा वापरणे आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. काय आहेत यामागची शास्त्रीय कारणे, रात्रीच्या वेळी ब्रा घालून झोपल्याने कोणकोणते दुष्परिणाम होतात जाणून घेऊया...
१. रात्रीच्या वेळी ब्रा घातल्याचा सर्वात मोठा दुष्परिणाम म्हणजे त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. ब्रामुळे स्तनांतील स्नायूंवर दाब येतो आणि त्याचा रक्तप्रवाहावर परिणाम होतो. त्यामुळे रात्री झोपताना ब्रा काढलेली केव्हाही चांगली. असे करणे शक्य नसेल तर किमान हूक तरी काढून ब्रा सैल करावी.
२. दिवसभर आपण कामात असल्याने अनेकींना घाम येतो. ब्रा काहीशी घट्ट असेल किंवा ब्राचे कापड सुती नसेल तर या घामाचे प्रमाण जास्त असू शकते. ब्राच्या पट्ट्या साधारणपणे जाड असतात. रात्रीच्या वेळी हा घाम तसाच राहीला आणि स्तनांना मोकळी हवा मिळाली नाही तर याठिकाणी त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. याठिकाणी फंगल इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे रात्री ब्रा काढून टाकावी.
३. सतत ब्रा घालून राहिल्याने त्वचेवर एकप्रकारचे डाग पडू शकतात. त्यामुळे त्वचा काही ठिकाणी काळी आणि काही ठिकाणी लालही होऊ शकते. तसेच रॅश येऊन अशाठिकाणी खाजही येऊ शकते. असे होऊ नये यासाठी वेळीच काळजी घेतलेली चांगली.
४. ब्रा घट्ट असेल आणि रात्री तुम्ही तसेच झोपलात तर स्तनांमध्ये गाठी होण्याचीही शक्यता असते. अनेकदा या गाठी कर्करोगाच्या असू शकतात असे तज्ज्ञ सांगतात. तुमचे स्तन मोठे असतील आणि तुम्हाला ब्रा न घालता झोपणे अवघडल्यासारखे होणार असेल तर झोपताना अगदी सैलसर ब्रा घालावी.
५. ब्रा घट्ट असेल तर अनेकदा श्वसनालाही त्रास होऊ शकतो. पूर्ण श्वास घेता न आल्यास त्याचा झोपेवर परिणाम होतो. पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने आणि श्वास घेताना काहीसा ताण पडत असल्याने झोप अर्धवट होते. अर्धवट झोपेचेही आरोग्यावर दुष्परिणाम होतात.
६. सध्या बाजारात विविध प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत. वायर्ड ब्रा, कप ब्रा असे अनेक प्रकार पाहायला मिळतात. तुमच्या स्तनांच्या आकार आणि ठेवणीनुसारही ब्रा वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण ब्रा ला असणारे इलॅस्टीक आणि इतर गोष्टींमुळे त्वचेची आग होणे, काचणे अशा समस्या उद्भवतात.