आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून काही ना काही काम करत असतो. घरातील, बाहेरील, ऑफीसचे असे सतत काही ना काही चालू असते. यामध्ये आपण शारीरिकदृष्ट्या जितके गुंतलेलो असतो तितकेच मानसिक किंवा बौद्धिकदृष्ट्याही आपण थकलेलो असतो. त्यामुळे रात्री घरी आल्यावर जेवण झाले की कधी एकदा बेडवर पडतो असे आपल्याला होऊन जाते. असे असले तरी कितीही थकून बेडवर पडलो की आपल्याला पुढचा बराच वेळ झोप येत नाही. आता इतकं थकल्यावर झोप यायला हवी असं आपल्याला वाटेल पण झोप का येत नाही? याची काही कारणे असू शकतात. कधी जास्त थकल्यामुळे, कधी डोक्यात खूप विचार सुरू असल्यामुळे किंवा कधी झोपेची वेळ पुढे मागे झाल्याने असे होऊ शकते. पण एकदा झोप गेली की बराच वेळ लागत नाही आणि मग आपण या अंगावरुन त्या अंगावर करत राहतो. सध्या तर मोबाइल हे एक असे साधन आहे की जे झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत आपल्या डोळ्यासमोर असते. पण झोप पूर्ण झाली नाही की आळस येणे, दिवसा झोपावेसे वाटणे, थकवा येणे, अॅसिडीटी, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. पाहूयात पडल्या पडल्या गाढ झोप येण्यासाठी कोणते उपाय करायला हवेत.
१. झोप येईल अशी वातावरण निर्मिती करा
आपण ज्या खोलीत झोपतो त्याठिकाणी कोणताही प्रकाश येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. त्यासाठी खिडक्यांना योग्य ते पडदे असणे आवश्यक आहे. म्हणजे बाहेरील प्रकाश घरात येणार नाही. याबरोबच आपल्या बेडवर स्वच्छ नीटनेटकी चादर असेल तर आपल्याला त्यावर झोपावेसे वाटेल. त्यामुळे आपला बेड आवरलेला आणि टापटीप असायला हवा. ज्या खोलीत झोपणार आहोत त्याठिकाणी कमीतकमी पसारा असेल तर झोपायची इच्छा होते.
२. हवा खेळती राहील अशी रचना हवी
उन्हाळ्याच्या दिवसांत तर आपल्या शरीराची लाहीलाही होत असल्याने आपण सतत फॅन किंवा एसीमध्ये बसतो. पण एरवीही आपल्या झोपण्याच्या खोलीत हवा खेळती राहील असे पाहावे. या खोलीला खिडकी किंवा गॅलरी असेल तर त्याचा दरवाजा उघडा ठेवावा. जेणेकरुन याठिकाणी मोकळी हवा येते आणि त्यामुळे आपल्याला चांगली झोप लागण्यास मदत होते. हेच जर आपण झोपतो ती खोली कोंदट किंवा काहीशी दमट असेल तर आपल्याला गुदमरल्यासारखे होऊ शकते आणि लवकर झोप लागत नाही.
३. पुस्तक वाचावे
बराच वेळ झोप लागत नसेल तर आपल्या आवडीच्या विषयाची एखादे पुस्तक आवर्जून वाचावे. अनेकदा वाचनाने आपल्याला झोप येऊ शकते. शांत वाचत बसल्याने आपले मन आहेत त्या विचारांपासून दूर जाऊन आपल्याला झोप येण्यास मदत होते.
४. शवासनात श्वासावर लक्ष केंद्रित करणे
आपण झोपलो आणि आपले मन एकाग्र होत नसेल किंवा आपल्याला काही केल्या झोप येत नसेल तर एक गोष्ट आवर्जून करावी. शरीर रिलॅक्स करुन श्वासावर लक्ष केंद्रित करावे. त्यामुळे मनातील विचार दूर होऊन आपल्याला झोप यायला मदत होते. तसेच श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने आपले डोकेही शांत होते.
५. मोबाइलपासून दूर राहा
आपल्या सगळ्याना मोबाइलचे खूप व्यसन लागलेले असते. आपण सतत कोणत्या तरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा सोशल मीडियावर काही ना काही पाहत असतो. त्यामुळे आपली झोप उडते. आपण सतत सोशल मीडियाच्या मागे असल्याने आपण त्यावरील गोष्टींचा विचार करत राहतो आणि आपली झोप जाते. मात्र झोपायच्या आधी किमान १ तास मोबाइल आपल्यापासून दूर केला तर आपल्याला लवकर आणि चांगली गाढ झोप येऊ शकते.