Join us   

घसा खवखवतो, खोकला येतो? वेड्या बाभळीचा हा पारंपरिक उपाय माहीत आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2021 1:47 PM

मागील काही दिवसांपासून सर्दी, खोकला, घसा खवखवणे, कफ असे आजार खूपच वाढले आहेत. अशा संसर्गजन्य आजारांवर वारंवार औषधी घेणं देखील उपयोगाचं नाही. म्हणूनच तर वेड्या बाभळीचा हा पारंपरिक आणि अतिशय गुणकारी उपाय करून बघा.

ठळक मुद्दे खोकला कमी होत नसेल तर तोंडात ज्येष्ठमध आणि वेड्या बाभळीच्या शेंगा ठेवाव्यात आणि चघळाव्यात. या उपायाने देखील खोकला कमी होतो.

सध्या वातावरणातील बदलांमुळे संसर्गजन्य आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे. डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार तर आहेतच पण त्यासोबतच सर्दी, खोकला, घसा दुखणे आणि खवखवणे, कफ, अंगदुखी असे त्रासही अनेक जणांना सुरू आहेत. असे आजार झाल्यावर लगेचच गोळ्या- औषधं घेणं हे योग्य नाही. कारण त्यांचा काही ना काही साईड इफेक्ट आपल्या शरीरावर निश्चितच होत असतो. त्यामुळे आपल्याला असा त्रास होतो आहे, हे लक्षात येताच सगळ्यात आधी काही घरगुती उपाय करून बघा. ज्येष्ठमध, वेडी बाभळी म्हणजे अशा अनेक संसर्गजन्य आजारांवर जालिम उपाय आहेत. हे उपाय करूनही जर सर्दी, खोकला कमी झाला नाही, तर मात्र निश्चित डॉक्टरांकडे जाऊन इलाज करून घ्यावा. 

 

हे घरगुती उपाय निश्चितच आहेत गुणकारी १. फुटाणे खोकला येत असेल, छातीत कफ दाटला आहे, असे वाटत असेल तर अशावेळी मुठभर फुटाणे खावेत. फुटाणे खाल्ल्यानंतर काहीही बोलू नये. थोडा वेळ तोंड बंद ठेवावे आणि निदान अर्धा तास तरी पाणी पिऊ नये. शरीरातील सगळा कफ शोषून घेण्यासाठी फुटाणे उपयुक्त ठरतात. हळद लावलेले फुटाणेही बाजारात उपलब्ध असतात. असे फुटाणे खाल्ले तर ॲण्टी बॅक्टेरीयल गुणधर्म असणाऱ्या हळदीचाही शरीराला फायदा होतो आणि सर्दी, खोकला लवकर बरा होतो.

 

२. पत्ताकोबी सर्दी पळवून लावण्यासाठी पत्ताकोबी अतिशय उपयुक्त ठरते. पत्ताकोबीची भाजी आवडत नसेल, तर एकवेळ खाऊ नका. पण सर्दी, कफ अशा आजारात मात्र पत्ताकोबीची वाफ घ्यायला विसरू नका. पत्ताकोबीची वाफ घेण्यासाठी पत्ताकोबीचा एक वाटी किस घ्यावा. हा किस उकळत्या पाण्यात टाकावा. पत्ताकोबी टाकल्यानंतर आणखी एक मिनिट पाणी उकळू द्यावे. त्यानंतर गॅस बंद करावा आणि या पाण्याची वाफ घ्यावी. पत्ताकोबीची वाफ घेत असताना पाण्यात इतर कोणताही बाम किंवा गोळी असे काहीही टाकू नये.

 

३. दूध आणि हळद दूध आणि हळद हा उपाय कोरोनाकाळात घरोघरी केला गेला. सर्दी, खोकला, कफ यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. दूध आणि हळद टाकून तयार केलेल्या दूधाला अमेरिकेत गोल्ड मिल्क म्हणून ओळखले जाते. असे दूध तयार करण्यासाठी एक कप दूध घ्या. त्यामध्ये एक टी स्पून हळद टाका. दुधाला चांगले उकळून घ्या. कपात गुळाचा एक छोटा खडा टाका. त्यानंतर त्या कपात दूध घ्या. गुळ वितळण्यासाठी दूध थोडे हलवा आणि गरम- गरम पिऊन घ्या.  कप पातळ होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे. हा उपाय शक्यतो रात्री करावा आणि दूध घेतल्यानंतर आराम करावा. 

 

४. आल्याचा चहा सर्दी, खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी आल्याचा चहा हा एक उत्तम उपाय आहे. आल्याचा चहा करताना त्यात थोडा गवती चहा, तुळशीची पाने, पुदिन्याची पाने टाकावीत. असा चहा अधिक परिणामकारक ठरतो. अशा चहामध्ये साखर टाकण्याऐवजी गूळ देखील टाकू शकता.

 

५. पपई, गुळवेल आणि पिंपळी डेंग्यूचे रूग्ण सध्या सगळ्या महाराष्ट्रातच मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. डेंग्यू आजारात रूग्णाचे प्लेटलेट कमी होतात. प्लेटलेट वाढण्यासाठी पपई, गुळवेल आणि पिंपळी या तिघांचा एकत्रित रस घेणे फायद्याचे ठरते. लेंडी पिंपळीच्या बिया तुपात परतून खाल्ल्यानेही कफ कमी होतो.

 

तज्ज्ञ सांगतात घरात मनीप्लांटऐवजी आरोग्यदायी असणारे अद्रकाचे झाड लावावे, असा सल्ला वैद्य विनय सेवलीकर देत आहेत. ज्येष्ठमध, दूध, हळद, गुळवेल, लेंडी पिंपळी, तुळशीची पाने, गवती चहा अशा अनेक गोष्टी सर्दी, खोकल्यासाठी लाभदायी ठरतात. अद्रकाचे झाड घरात लावणे अगदी सोपे आहे. शिवाय ते अतिशय गुणकारी देखील आहे.

 

रोजच्या चहात एकदा तरी अद्रक घाला. जेवणापुर्वी मीठ आणि थोडंसं आलं एकत्र करून खाल्ल्यानेही फायदा होतो. खोकला कमी होत नसेल तर तोंडात ज्येष्ठमध आणि वेड्या बाभळीच्या शेंगा ठेवाव्यात आणि चघळाव्यात. या उपायाने देखील खोकला कमी होतो.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स