तोंडाच्या आणि दातांच्या निगडीत समस्या खूप वेदनादायी ठरतात. जर, तोंडात फोड आले असतील तर विचारायलाच नको. या फोडामुळे खाणे, पिणे बंद होऊन जाते. संपूर्ण लक्ष आपले त्या फोडावर असते. या कारणामुळे आपले इतर कामात देखील लक्ष लागत नाही. पोटातील गर्मी आणि शरीरातील पित्त वाढल्याने तोंड येण्याची समस्या निर्माण होते. बऱ्याचवेळा शरीरात व्हिटॅमिन बी आणि आयरनच्या कमतरतेमुळे ही समस्या उद्भवते. तोंड आल्याने अनेक लोकांना जळजळ आणि वेदना सहन होत नाही. अशा स्थितीत आपण औषधांसह काही घरगुती उपायांचा वापर करून तोंडातील फोडापासून सुटका मिळवू शकता.
तोंडातील समस्येसाठी घरगुती उपाय
गाईचे दुध गुणकारी
तोंडातील अल्सर घालवण्यासाठी गाईचे दुध खूप गुणकारी उपाय आहे. गाईच्या ताज्या दुधात सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असतात. जे तोंडाच्या अल्सरपासून आराम देतात. यासह जळजळीपासून आराम मिळते. त्यामुळे तोंडात फोड आल्यास गाईचे ताजे दूध प्या.
तोंडाच्या समस्येसाठी मध
मधाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक म्हणजे तोंडाच्या फोडांवर घरगुती उपाय म्हणून ते काम करतात. तोंडात मध लावल्याने ऍलर्जी कमी होते. याशिवाय, जळजळ शांत करण्यासाठी देखील प्रभावी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तोंडात व्रण येत असतील तेव्हा एक चमचा मध घेऊन ते तोंडाला लावा. काही वेळ असेच राहू द्या आणि नंतर पाणी प्या. नियमित ही प्रक्रिया करा जेणेकरून लवकर आराम मिळेल.
खोबरेल तेल देईल आराम
खोबरेल तेल अल्सरसाठी उपयुक्त ठरू शकते. नारळ तेलाचे दाहक-विरोधी गुणधर्म अल्सरची अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात. कारण, यामुळे दाह कमी होते. नारळाच्या तेलात कापसाचा तुकडा बुडवून ते अल्सरवर लावा. अशाने अल्सरपासून आराम मिळेल.
सुपारीचे पान एकदा ट्राय करा
सुपारीच्या पानामुळे तोंडातील बॅक्टेरियाची वाढ कमी होण्यास मदत होते. याशिवाय, फोडाची जळजळ कमी होते. त्यामुळे तोंड आले की, सुपारीचे पान खावा.