काही जणांच्या बाबतीत खरोखरंच डोळे दिवसाचा अधिकाधिक वेळ लॅपटॉप, कम्प्युटर आणि ते झालं की मोबाईल आणि टीव्ही अशा गॅझेट्सवर अक्षरश: चिकटलेले असतात. अर्थात कामाचे स्वरूप म्हणून त्याला पर्यायही नसतो. पण तरीही यामुळे डोळ्यांचे व्हायचे ते नुकसान (side effects of screen on eyes) होतेच. डोळे जळजळणे, डोळ्यांत काहीतरी खुपल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून पाणी येणे, असा वेगवेगळा त्रास त्यातून होतो. सतत स्क्रिनसमोर असल्याने (screen time) डोळ्यांचा नंबरही सारखा वाढत जातो. हा सगळा त्रास कमी करण्यासाठी (How to reduce Eye fatigue due to screen?) काही उपाय केले किंवा स्क्रिन बघताना काही नियम पाळले, तरी नक्कीच फायदा होऊ शकतो.
याविषयी HT Lifestyle शी बोलताना डॉ. अनुराधा घाेरपडे म्हणाल्या की जर तुम्ही दिवसभरातून ७ तास किंवा त्यापेक्षा अधिक वेळ स्क्रिन बघत असाल तर त्यातून नक्कीच डोळ्यांचे वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात. यालाच वैद्यकीय भाषेत Computer Vision Syndrome म्हटलं जातं. यामध्ये रुग्णांना डोळ्यांचा काेरडेपणा, डोळ्यांसमोर काहीतरी चमकल्यासारखे वाटणे, डोळे लाल होणे, डोके दुखणे, डोळे जड पडणे, खांदे आणि पाठदुखी, नजर कमी झाल्यासारखे वाटणे, असे वेगवेगळे त्रास होतात. अशा प्रकारचा कोणताही त्रास होत असेल तर सगळ्यात आधी नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या. पण त्यासोबतच स्क्रिन बघताना पुढील काही नियम पाळा, असंही त्यांनी सुचवलं आहे.
स्क्रिन बघताना हे लक्षात ठेवा १. स्क्रिन बघताना ॲण्टी रिफ्लेक्टीव्ह चष्मा लावा. २. तुमच्या डोळ्यांचा आणि कम्प्युटर स्क्रिनचा ॲन्गल ४५ डिग्री अंशाचा असावा. ३. टक लावून स्क्रिनकडे पाहू नका. अधून मधून डोळे बंद करा. ४. डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप वापरा. ५. हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या भाज्या, फळे अधिकाधिक प्रमाणात खा.
६. स्क्रिन बघताना २०- २०- २० हा नियम पाळा. म्हणजेच स्क्रिन बघत असताना दर २० मिनिटांनी साधारणपणे २० मीटर अंतर दूर असणारी एखादी गोष्ट २० सेकंदांसाठी बघणे. ७. स्क्रिनवर काम करताना एसीचं वारं थेट तुमच्या डोळ्यांवर येईल, अशा पद्धतीने बसू नका. ८. दररोज ७ ते ८ तसांची झोप घेणं गरजेचं आहे. ९. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी, डोळ्यांचा ओलावा जपण्यासाठी दररोज २ ते ३ लीटर पाणी प्या. १०. सुर्यप्रकाशात काही वेळ घालवा. जास्तीत जास्त दुरचं बघण्याचा प्रयत्न करा.
वरील नियमांसोबतच इतरही काही गाेष्टींची काळजी घ्या असं डॉ. रश्मी शुक्ला यांनी सुचवलं आहे. त्या म्हणतात की कोणतीही स्क्रिन खूप जवळून बघू नका. स्क्रिन आणि तुमच्या डोळ्यांमध्ये २५ इंचाचं अंतर असावं. स्क्रिनचा ब्राईटनेस खूप जास्त किंवा खूप कमी नसावा. टेक्स्ट साईजही योग्य असावी. स्क्रिन नेहमी स्वच्छ असावी.