Join us   

पोट साफच होत नाही, रोज रात्री दुधात तूप घालून प्या, तज्ज्ञ सांगतात ९ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 12:27 PM

आरोग्य उत्तम ठेऊन सौंदर्य वाढवायचे असेल तर आहारात काही किमान बदल करायला हवेत...

ठळक मुद्दे आरोग्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासही उत्तम उपाय हाडे होतील मजबूत आणि मिळेल इन्स्टंट एनर्जी

दुधाला पूर्णान्न म्हटले जाते. जेवण झाल्यावर रात्री झोपताना अनेकांना दूध पिऊन झोपायची सवय असते. तुम्हीही असे करत असाल तर त्या दूधात तूप घालायला अजिबात विसरु नका. दूध आणि तुपाचे एकत्रित सेवन आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे असते. या दोन्ही गोष्टी एकत्र करुन सेवन केल्याने आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो. याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदीप काळे सांगतात, गीर गाईचे दूध पिणे अधिक फायदेशीर असते. आयुर्वेदानुसार जर तूप दुधात घालून प्यायलं तर दैनंदिन आरोग्याच्या अनेक समस्यांपासून आपली सुटका होऊ शकते. लहान मुलांसाठी तर अशाप्रकारे झोपताना दूध आणि तूप पिणे हे खूप उपयुक्त असते. कारण लहान मुलं सतत खेळत असतात. दुधात तूप टाकून प्यायल्याने त्यांचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. ज्या मुलांचे खूप खेळल्यामुळे हात पाय दुखतात त्यांना तूप घातलेलं दूध दिले असता हाडे भरीव होवून हात पाय दुखणे थांबण्यास मदत होते. गायीच्या तुपात कोलेस्ट्रॉल नसते, त्यामुळे दुधामुळे कोलेस्ट्रॉल वाढेल असे तुम्हाला वाटत असेल तर तसे होत नाही. दिवसभर बाहेर काम करुन घरी परतल्यानंतर जर तुम्हाला मरगळ आल्यासारखी वाटत असेल तर लगेचच दुधात तूप घालून प्यायला हवे. यामुळे मरगळ निघून जाते आणि तुम्हाला थोड्या वेळासाठी तरी एनर्जी मिळते. 

रात्री झोपताना दूध आणि तूप एकत्र घेण्याचे फायदे 

१.    डोळ्यांसाठी फायदेशीर - दुधामध्ये 1 चमचा गाईचे तूप घातल्यास ते आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. दररोज असे केल्याने आपल्या डोळ्यांच्या विविध समस्या दूर होण्यास मदत होते. आपण अनेकदा दिवसभर कॉम्प्युटर, मोबाईल, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांसमोर असतो. त्यामुळे डोळयांवर ताण येतो. डोळे चुरचुरणे, लाल होणे, पाणी येणे, कोरडे पडणे अशा समस्या भेडसावतात. पण रात्री झोपताना दूध आणि तूप घेतल्यास ही समस्या दूर होण्यास मदत होते.  

२.    हाडांची बळकटी वाढण्यास उपयुक्त -  दूध व तूप एकत्र घेतल्याने हाडांना बळकटी देते. दुधामधले व्हिटॅमिन डी हाडांमध्ये शोषले जाते आणि आपली हाडे मजबूत होतात. हल्ली लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना हाडे दुखण्याचा त्रास असतो. पण या उपायाने हा त्रास कमी होतो.

३.    शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स मिळतात - तूपातील महत्त्वपूर्ण व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के आणि जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी महत्वाची असतात. शरीराचे सर्वप्रकारे उत्तम पोषण होण्यासाठी व्हीटॅमिन्सची आवश्यकता असते जी दूध आणि तूप एकत्र घेतल्याने पूर्ण होते.  

४.    गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी उत्तम -  तूप घातलेलं दूध गरोदर महिलांना त्यांच्या पोटातील बाळांच्या हाडाचा विकास करण्यास मदत करते. बाळाच्या मेंदूची नियमित वाढ करण्यासाठी या अशाप्रकारे दूध आणि तूप एकत्र घेतल्यास मदत होते. स्तनपान करणाऱ्या बाळंत महिलांनीही नियमित रुपानं हे दूध प्यावं जेणेकरुन बाळाला दूध कमी पडणार नाही.

५.    बद्धकोष्ठता व पचनाच्या इतर समस्या दूर होण्यास मदत – थंडीमध्ये सामान्यपणे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच एरवीही ज्यांना बद्धकोष्ठता, गॅसेस आणि पचनाशी निगडीत इतर तक्रारी भेडसावतात त्यांच्यासाठी दूध आणि तूप हे मिश्रण अमृतासारखे काम करत असते. रात्री झोपताना हे प्यायल्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. 

 ६.    मूळव्याधीवर उत्तम उपाय - मुळव्याधीचा त्रास असल्यास तिखट पदार्थ खाणाऱ्यांना शौचानंतर आग होते.  अशा उठणे-बसणेही अनेकदा अवघड होऊन जाते. अनेकदा जेवणही जात नाही. त्यावेळेस दूध व तूप एकत्र करुन एक-दोन दिवस घेतल्यास आग व वेदना थांबतात.

७.    झोपेची समस्या होते दूर - बऱ्याच लोकांना हल्ली रात्री झोप लागत नाही. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पुरेशी झोप न झाल्यास आरोग्यावर त्याचा अतिशय वाईट परिणाम होतो. अशावेळी रुग्णांनी कोमट दुधामध्ये तूप टाकून प्यायल्यास फायदेशीर ठरु शकते. मेंदूच्या मज्जातंतूंना शांत करण्याचे काम यातील घटक करतात, त्यामुळे आपल्याला आरामशीर वाटते. तसेच दुधात तूप घालू घेतल्याने दिवसभराचा मानसिक थकवा नष्ट होतो. वात दोष कमी होवून झोप येण्यास मदत होते.

८.    अँसिडीटीवर उत्तम उपाय - ज्यांच्या कामांचे तास अधिक असतात किंवा काहींना खाण्यास पुरेसा वेळ मिळत नाही असे लोक आवर्जून चहा बिस्कीट घेतात. मात्र त्याऐवी त्यांनी दुधामध्ये एक चमचा तूप टाकून प्यायल्यास फारच फायद्याचे ठरते. पोटामधे तयार होणारे अँसिड कमी होण्यास मदत होते. शिवाय तूप आणि दूध हे मिश्रण  प्यायल्याने शरीराला इन्स्टंट ऊर्जा मिळत असते. तसेही दूध हे पूर्णान्न असून तूप त्याला पुरक असल्यामुळे पटकन टवटवीत वाटते. 

९.    त्वचेची चमक वाढण्यास मदत – अनेकदा महिलांना त्वचेशी निगडीत समस्या असतात. थंडीच्या दिवसांत तर या समस्या जास्त वाढतात. तुपामध्ये अनेक अँटी- ऑक्सिडंट घटक असतात जे त्वचेवरील टवटवीतपणा टिकून ठेवण्याचे काम करतात. तूपाचे सेवन केल्यामुळे त्वचेवरील चमक वाढते. पण दूध आणि तूप यांचे एकत्रितपणे सेवन केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते. त्वचेचा कोरडेपणा, खडबडीतपणा निघून त्वचा नितळ होण्यास तूप उपयुक्त असते.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल