डाएट हा सध्या सगळ्यांच्याच परवलीचा शब्द झाला आहे. आपण डाएटवर आहोत किंवा माझ्या डाएटमध्ये हे चालत नाही असं आपण अगदी सहज म्हणतो. पण हे डाएट म्हणजे काय आणि ते व्यक्तीनुसार कसे बदलते हे काळानुसार समजून घेणे आवश्यक आहे. कधी वजन कमी करायचे म्हणून तर कधी वाढवायचे म्हणून, कधी आरोग्याच्या तक्रारींसाठी डाएट योग्य असणे अतिशय आवश्यक असते. तुमचे डाएट कसेही असले तरी त्यात काही गोष्टींचा आवर्जून समावेश असतो. प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेटस, स्निग्ध पदार्थ, फायबर यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने तब्येत चांगली राहण्यास मदत होते. हे घटक ज्या पदार्थांतून मुबलक प्रमाणात मिळतात ते पदार्थ दिवसातील विशिष्ट वेळेला खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ आपल्याला देतात. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी योग्य पद्धतीने पाळल्यास आपल्या वजनाच्या किंवा आरोग्याच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
डाएटमध्ये फळे, भाज्या, डाळी, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा यांबरोबरच सॅलेडचाही महत्त्वाचा रोल असतो. तो वेळीच समजून घेणे आवश्यक आहे. पूर्वीपेक्षा आताची दिनचर्या, ऑफीसला जाण्या-येण्याचा प्रवास, कामाचे ताण अशा सगळ्याच गोष्टींमध्ये बदल झाला आहे. पुरुषच नाही तर महिलाही आता घराबाहेर पडत असल्याने त्यांचीही दिनचर्या पूर्वीपेक्षा बऱ्याच प्रमाणात बदलली आहे. हल्ली अनेक जण हॉटेलमध्ये किंवा कुठे बाहेर खाणार असतील तरी सॅलेड खाणे पसंत करतात. आता सॅलेडचे इतके महत्त्व वाढण्याचे नेमके कारण काय आणि सॅलेड खाल्ल्याने आरोग्याला कोणकोणते फायदे होतात याविषयी...
१. सॅलेड म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन किंवा फॅन्सी वाटत असले तरी ते तसे नाही, तर सॅलेड हा आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आणि जुनाच पदार्थ आहे, ज्याला आपण कोशिंबीर म्हणून ओळखतो.
२. शरीराला आणि मेंदूला प्रमाणापेक्षा जास्त ताण झाला की हा ताण पेलवत नाही आणि मूळव्याध, बद्धकोष्ठता, अपचन, अॅसिडीटी यांसारखे त्रास सुरु होतात. यालर वेळीच उपाय केले नाहीत तर या तक्रारी गंभीर रुप धारण करतात आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सॅलेड असायलाच हवे.
३. पूर्वी पानात न चुकता दोन चमचे कोशिंबीर वाढली जायची. आता मात्र आपल्याला एक वाटीभरुन कोशिंबीर खाण्यास सांगितले जाते याचे कारण बदलती जीवनशैली हेच आहे.
४. सॅलेडमध्ये असणाऱ्या तंतुमय पदार्थांचा शरीराला फायदा होतो. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण खात असलेल्या भाज्या शिजलेल्या असल्याने त्यातील पोषक तत्त्वे शिजताना बऱ्याच प्रमाणात निघून जातात. मात्र सॅलेडच्या बाबतीत तसे होत नाही, सॅलेड कच्चे असल्याने त्यातील सर्व व्हिटॅमिन्स आपल्याला योग्य प्रमाणात मिळण्यास मदत होते.
५. सॅलेडमध्ये आपण साधारणपणे दही किंवा लिंबू घालतो. या दोन्हीतून क जीवनसत्व मिळते आणि सॅलेड पचायला हलके होते. मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांच्या आहारात सॅलेड आवर्जून असायला हवे.
६. सॅलेड खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि इतर जेवण नकळत कमी जाते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी उपयोग होत असल्याने सॅलेडचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
७. हल्ली हॉटेलमध्ये इटलियन, मक्सिकॅन असे सॅलेडचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या असल्या तरी त्यात चीज, मायोनिज हे योग्य प्रमाणात आहे ना हे पाहून खायला हरकत नाही.
८. पिझ्झा, बर्गर, समोसा, पास्ता यांसारखे मैद्याचे पदार्थ खाणाऱ्यांना पोटाच्या तक्रारी उद्भवतात. अशांनी सॅलेड आवर्जून खायला हवे.
९. सॅलेडमध्ये आपण गाजर, काकडी, कांदा, टोमाटो, सॅलेडची पाने, कोबी, मूळा, बीट यांसारख्या बऱ्याच भाज्यांचा वापर करु शकतो. यामध्ये किसून मीठ, मीरपूड घातले तरी छान लागते.
१०. पोटात जाणारे अनावश्यक घटक सॅलेडमधील फायबरच्या माध्यमातून शरीराबाहेर पडण्यास मदत होत असल्याने सॅलेड खाणे पोट साफ होण्यासाठी अतिशय उपयुक्त असते.