Join us   

 पोट बिघडतं कारण आपल्या चुकीच्या सवयी, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर सांगताय पचन टकाटक ठेवण्याचे सोपे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2021 5:41 PM

शरीराचं पोषण हे केवळ खाणं पिणं या एकमार्गी घटकावर अवलंबून नाही. आरोग्य नीट राहाण्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होणंही गरजेचं आहे. आणि अन्न तेव्हाच नीट पचतं जेव्हा ते पौष्टिक असतं. पोषण आणि पचन यांचा जवळचा संबंध आहे.

ठळक मुद्दे आपण जितकं चांगल खाऊ तितकंच पचनही चांगलं होतं.पचनावर आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. पचन बिघडल्याची लक्षणं शरीर आपल्याला सांगतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो.योग्य आहार न घेणे आणि पुरेसा व्यायाम न करणे यामुळे देखील पचनाच्या समस्या निर्माण होतात.

 सध्या पोषण सप्ताह सुरु आहे. लोकांना पोषणाच्या , आपल्या आरोग्याच्या संदर्भात जागरुक करणं हा त्याचा उद्देश आहे. यंदाच्या वर्षी पोषण सप्ताहाची थीम ही स्मार्ट फीडिंग आहे. हे स्मार्ट फीडिंग आपल्या शरीराला आवश्यक ते घटक देऊन शरीराचं पोषण करतं. पण शरीराचं पोषण हे केवळ खाणं पिणं या एकमार्गी घटकावर अवलंबून नाही. आरोग्य नीट राहाण्यासाठी आपण खाल्लेल्या अन्नाचं नीट पचन होणंही गरजेचं आहे. आणि अन्न तेव्हाच नीट पचतं जेव्हा ते पौष्टिक असतं. पोषण आणि पचन यांचा जवळचा संबंध आहे.

पचन बिघडण्याला अनेक घटक कारणीभूत असतात. पण सर्वात मोठं कारण म्हणजे आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी. त्या सुधारण्यासाठी प्रसिध्द आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत.

पचन सुधारण्यासाठीच्या नियमांबाबतचा एक व्हिडीओ ऋजुता दिवेकर यांनी आपल्या  ्ट्विटर अकाउण्टवरुन शेअर केला आहे. आहार आणि विहाराचे काही नियम पाळल्यास पचनतंत्र सुधारतंच त्यासोबतच त्याचा फायदा आपल्या त्वचेला आणि केसांनाही मिळतो.

पचन बिघडलंय कसं कळतं?

* आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर म्हणतात की, आपण जितकं चांगल खाऊ तितकंच पचनही चांगलं होतं. पचन चांगलं झाल्यास त्वचा आणि केस चांगले होतात तसेच मधुमेह, रक्तदाब या आजारांचा धोकाही टळतो. * पचनावर आपलं संपूर्ण आरोग्य अवलंबून असतं. पचन बिघडल्याची लक्षणं शरीर आपल्याला सांगतं पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तसं न करता या लक्षणांना ओळखायला हवं. * पचन बिघडलं असल्यास आपल्याला रोज अँसिडिटी होते, पोटात गॅस होणं, पोटात डचमळणं, पोट दुखणं यासारख्या समस्या सतत जाणवतात. याचाच अर्थ आपलं पचन तंत्र बिघडलंय असं समजावं. * रात्री झोप नीट न लागणं, मधेच जाग येणं याचाही पचनतंत्र बिघडण्याशी संबंध असतो. * रोजच गोड खावसं वाटणं, चॉकलेट खाण्याची इच्छा होणं हे देखील पचनतंत्र बिघडल्याचं लक्षण आहे. असं असल्यास त्वरित सजग होऊन आपण काय खातो पितो याकडे लक्ष द्यावं. पोष्टिक आहार घेण्यावर भर द्यावा. पौष्टिक खायला सुरुवात केल्यास पचनही सुधारतं असं ऋजुता दिवेकर म्हणतात.

पचनाच्या समस्या निर्माण होतात कारण..   रोज पुरेसं पाणी न पिणं यामुळे पचन संस्थेचं काम बिघडतं. पाणी पुरेश्या प्रमाणात पिल्यास पचन सुधारतं तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. पुरेसं पाणी न पिणं हे पचन बिघडण्याचं कारण आहे.

पचन सुधारण्यासाठी काय करावं?

* ऋजुता दिवेकर पचन सुधारण्यासाठी आहार विहाराचे काही नियम सांगतात. त्या म्हणतात की संध्याकाळी चार वाजेनंतर चहा किंवा कॉफी यांचं सेवन करु नये. चार वाजेनंतर चहा कॉफी पिल्यास पचन बिघडतं. * योग्य आहार न घेणे आणि पुरेसा व्यायाम न करणे यामुळे देखील पचनाच्या समस्या निर्माण होतात. योग्य आहारासोबत पुरेशा व्यायामाचा नियम पाळलाच पाहिजे. रोज किमान अर्धा ते पाऊण तास व्यायाम करायलाच हवा. * पचन तंत्र सुधारण्यासाठी ते व्यवस्थित ठेवण्यासाठी रोज दुपारी जेवणानंतर गुळाचा खडा साजूक तुपासोबत खावा. गुळामधे लोह आणि फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. गूळ आणि तुपाच्या सेवनानं शरीरात ओलावा निर्माण होतो. * रोज एक केळ खाण्याचा नियम करावा. केळामुळे पचन चांगलं होतं.

* पोटात गॅस होणं, नीट झोप न लागणं, मधेच जाग येणं, पीसीओडी यासारख्या समस्या असतील तर दही आणि मनुके एकत्र खावं. यासाठी दही लावतानाच त्यात मनुके घालावे. आणि ते दही खावं. दही आणि मनुक्यात प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक जीवाणू असतात. हे जीवाणु पचन व्यवस्था मजबूत करतात तसेच शरीरात हिमोग्लोबीन आणि ब 12 हे जीवसत्त्वं वाढवण्यास मदत करतात.