Join us   

सांधे जखडले - सतत सांधेदुखी? तज्ज्ञ सांगतात, तातडीने आधी दूध पिणे बंद करा, कारण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 2:01 PM

Stop Having Milk If You are Facing Joint Pain Problem : दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनांचा परिणाम म्हणून संधिवाताची लक्षणे दिसू शकतात.

डॉ. अविनाश भोंडवे 

वयाच्या चाळिशीनंतर साधारणपणे सांधे दुखण्याचा त्रास सर्वांनाच सुरु होतो. काहींना तो तिशीतही जाणवू लागतो. हा त्रास पुरुषांपेक्षा स्त्रियांना अधिक होतो. सांधेदुखीप्रमाणेच संधिवातासारखे ऑटोइम्युन प्रकारातले गंभीर त्रासही अनेकांना होत असतात. या आजारात औषधे घेतल्याने बरे वाटते, पण तात्पुरते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात. मात्र औषधांसोबत काही खाण्यापिण्याची पथ्ये पाळली, तर हे त्रास कमी वेदनादायक ठरतात आणि औषधेही कमी लागतात. या पथ्यांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करण्याचा उपाय अवश्य करून पहा (Stop Having Milk If You are Facing Joint Pain Problem).

दूध आणि दुग्धजन्य पदार्थात केसिन नावाचे प्रथिन मोठ्या प्रामाणात असते. या प्रथिनामुळे शरीरातील वेगवेगळ्या सांध्यांमध्ये दाह निर्माण होऊन वेदना होतात आणि सांध्यांवर सूजही येऊ शकते. दुधापासून बनणाऱ्या लोण्यासारख्या पदार्थात संपृक्त चरबीचे (सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड) प्रमाण जास्त असते. या संपृक्त चरबीमुळेदेखील सांधेदुखी होऊ शकते. दुधामध्ये असलेल्या लॅक्टोज नावाच्या शर्करेमुळे डोकेदुखी, डोके हलके वाटून गरगरणे, कामातील एकाग्रता कमी होणे, अल्पकालीन स्मरणशक्ती कमी होणे, कमालीचा थकवा येणे, विविध प्रकारच्या अॅलर्जी होणे, हृदयविकार, तोंड येणे, तोंडात जखमा होणे, घसा खवखवणे आणि सतत लघवीला होणे असे त्रास तर होतातच; पण शरीरातील स्नायूंमध्ये वेदना होणे आणि विशेष म्हणजे सांधेदुखीचा, त्रास होणे हे त्रासदायक शारीरिक विकार होत असल्याचे आढळतात. 

दुग्धजन्य पदार्थांमध्ये आढळणाऱ्या विशिष्ट प्रथिनांचा परिणाम म्हणून संधिवाताची लक्षणे दिसू शकतात. संधिवात असलेल्या अनेक व्यक्तींना दुधाचे वावडे असल्याचे लक्षात येते. त्यांच्या चाचण्या घेतल्यावर त्यांच्या शरीरात दुधाच्या विरोधी प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) असल्याचे दिसून येते. प्रतिपिंडे पिंडाचे कार्य म्हणजे, बाहेरून शरीरात येणाऱ्या प्रतिजननांना (अँटिजेन) आणि रोगजंतूंना नष्ट करणे. दुग्धजन्य पदार्थातील प्रतिपिंडे आपल्याच शरीराला चुकून हानिकारक पदार्थ समजतात आणि दूध वगळता शरीरातील इतर अवयवांवर हल्ला करतात. त्यापासून दाह निर्माण होतो आणि यातच संधिवाताला सुरुवात होते. म्हणूनच सांधे दुखत असतील, तर तीन आठवडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करा. एकवीस दिवसात तुमच्या लक्षणांमध्ये, वेदनांमध्ये नक्की फरक दिसेल. 

दूध सांधेदुखीसाठी कारणीभूत असेल, तर दुधाला दाहविरोधी पर्याय म्हणून बदामाचे किंवा काजूचे अथवा तांदळाचे दूध वापरून पहावे. दुग्धजन्य पदार्थांसाठी सोया दूध हासुद्धा एक उत्तम पर्याय ठरतो. दूध वर्ज्य केल्यावर सांध्यांचे दुखणे लगेच कमी होत नाही, पण हळूहळू तीन आठवड्यात वेदना कमी होऊ लागतात. दुधाची अॅलर्जी असलेल्या व्यक्तींमध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ सेवन केल्याने प्रतिकारप्रणाली कार्यरत होते आणि दाह निर्माण होतो. परंतु यामध्ये लॅक्टोजची भूमिका दुय्यम असते. साहजिकच दुग्धजन्य पदार्थ टाळल्याने सांधेदुखीची वेदनादायी लक्षणे कमी होतात, परंतु दाह कमी होत नाही.

सांधेदुखी कमी करण्यासाठी आहार

१. ओमेगा-३ फॅटी अॅसिडस्- यात प्रामुख्याने मासे आणि माशांचे तेल येते. थंड पाण्यामधील मासे ओमेगा-३ फॅटी अॅसिडचे उत्कृष्ट स्त्रोत असतात. आरोग्यासाठी आवश्यक आणि पोषक असतात.

२. नट्स- यात काजू, पिस्ता, बदाम, अक्रोड, शेंगदाणे येतात.

३. भाज्या- ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, कोबी, फुलकोबी, हिरव्या पालेभाज्या, मुळा 

४. रंगीत फळे

५. ऑलिव्हचे तेल

६. कडधान्ये- मसूर, सोयाबीन 

७. लसूण

८. टरफलासह संपूर्ण तृणधान्ये- हातसडीचा तांदूळ, होल ग्रेन्स इ.

(लेखक जनरल प्रॅक्टीशनर असून इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.)

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सलाइफस्टाइलआहार योजना