वजन कमी करणे हा वाटतो तितका सोपा टास्क नक्कीच नाही. जे लोक हे करतात त्यांनाच माहिती की या गोष्टीसाठी किती कष्ट घ्यावे लागतात. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर शिस्त आणि नियमितता यांची आवश्यकता असते. आपले वजन कसे आणि किती वाढते हे आपल्याला कळतही नाही पण हे वाढलेले वजन कमी करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. सध्या इतक्या दिवसांत वजन कमी करण्यासाठी हे खा आणि वजन कमी करायचे असेल तर ते करा अशा प्रकारच्या उपायांचा सुळसुळाट झालेला दिसतो. इंटरनेटवरही त्याबाबत मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. सोशल मीडिया तर सध्या या सगळ्या गोष्टींसाठी भांडार झाले आहे. वजन कमी करण्याबाबत आपल्याकडे अनेकदा बरेच गैरसमज असलेले पाहायला मिळतात. पण त्यामुळे वजन तर कमी होत नाहीच पण आरोग्यावर इतर परीणाम होताना दिसतात.
प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पूजा बंगा यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी आहारातील गैरसमजांबाबत एक छोटा व्हिडियोही पोस्ट केला आहे. त्यांच्या या पोस्टला नेटीझन्सनी बरीच पसंतीही दिली आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये त्या वजन कमी करण्याबाबतचे चार भ्रम किंवा उपाय याबाबत माहिती देतात. हे भ्रम लोकांमध्ये लवकर रुजतात पण त्याचे फारसे परिणाम होताना दिसत नाहीत. त्या म्हणतात, “मी असे खूप लोक पाहिले आहेत जे एखाद्या गोष्टीमागचे लॉजिक समजून न घेता ती फॉलो करतात, हा उपाय खरंच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे की नाही हे तपासून पाहणेही ते गरजेचे समजत नाहीत.” पाहूयात अशा चार गोष्टी ज्याबाबत सामान्यांमध्ये गैरसमज असतात.
१. वजन कमी करण्यासाठी हर्बल पेय घेणे
या गोष्टींचा वजन कमी करण्यासाठी काहीही उपयोग होत नाही तसेच यामुळे वजन कमी होते असा दावा कोणीही करत नाही. असा कोणताही अन्नपदार्थ नसतो ज्यामुळे तुमचे वजन वाढते किंवा कमी होते. असे कोणतेही जादुई पदार्थ किंवा पेय नसतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. सध्या वेगवेगळ्या प्रकारचे हर्बल टी, हर्बल शेक यांचे खूप फॅड आलेले दिसते. मात्र हे पिऊन वजन कमी झाल्याचे फारसे दिसत नाही.
२. आहारातून कार्बोहायड्रेटस कमी करणे
आपल्या शरीराला संतुलित आहाराची आवश्यकता असते. यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, फायबर, पाणी यांबरोबरच कार्बोहायड्रेटसची जास्त प्रमाणात गरज असते. अशावेळी वजन वाढते म्हणून कार्बोहायड्रेटस जेवणातून वजा करुन टाकले तर कसे चालेल. पण अनेक लोक कोणताही सल्ला न घेता वजन कमी करण्यासाठी आहारातून कार्बोहायड्रेटस घेणे बंद करतात. यामध्ये प्रामुख्याने पोळी, भात, भाकरी या मुख्य अन्नपदार्थांचा समावेश होतो. हेल्दी आणि चागल्या डाएट प्लॅनमध्येही कार्बोहायड्रेटस हा महत्त्वाचा भाग असतो. एका जेवणात साधारणपणे ४० टक्के कार्बोहायड्रेट असणे गरजेचे असते.
३. आहारात केवळ फळांचा समावेश करणे
फळांमध्ये आरोग्याला उपयुक्त असे घटक असतात हे मान्य असले तरीही शरीराला आवश्यक असणारे सगळेच घटक फळांमध्ये नसतात. तर फळांमध्ये काही प्रमाणात कार्बोहायड्रेटस, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने हे घटक असतात. शरीराला आवश्यक असणारे इतर घटक फळांमध्ये नसल्याने वजन कमी करण्यासाठी केवळ फळेच खाणे आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तसेच प्रत्येक फळामध्ये असणारे पोषकतत्व वेगळे असते, त्यामुळे याबाबत योग्य ती माहिती नसताना नुसता फलाहार घेऊन वजन कमी करणे धोक्याचे ठरु शकते.
४. तासंतास कार्डिओ व्यायाम करणे
वजन कमी करणे ही अतिशय सोपी प्रक्रिया असून आहारात कॅलरीजचे प्रमाण वाढवणे आणि कॅलरीजचे प्रमाण कमी करणे यामुळे वजन घटू शकते. त्यामुळे तासंतास कार्डिओ व्यायाम केल्यावर आपले वजन कमी होईल असे वाटून काही जण तेच करत राहतात पण असे होत नाही. जास्त वेळ कार्डिओ व्यायाम केला तर त्याचा चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुमची चयापचय क्रिया बिघडू शकते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय असे काही करत असाल तर ते वेळीच थांबवा, त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही.