वजन कमी होण्यासाठी डाएट ,व्यायाम यांचे नियम पाळले जातात. अनेकांच्या बाबतीत तर नियम पाळूनही वेटलाॅस ( weightloss) होत नाही. पण काहींच्या बाबतीत मात्र जरा विचित्रच होतं. ते ना आहाराचे नियम पाळतात, ना व्यायाम करतात पण तरीही त्यांचं वजन अचानक आणि आपोआप कमी व्हायला लागतं. अशा प्रकारच्या (sudden weight loss) वेटलाॅसमुळे काही काळ आनंद वाटू शकतो पण नंतर मात्र तब्येत बरी नसल्याचं जाणवायला लागतं. आरोग्यदायी पध्दतीनं वजन कमी केल्यानं वाटणारा उत्साह, ऊर्जा अशा प्रकारे अचानक आणि आपोआप वेटलाॅस झाल्यानं वाटत नाही.तज्ज्ञ म्हणतात की अचानक आणि आपोआप होणारा वेटलाॅस म्हणजे आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपोआप आणि अचानक वजन कमी होण्यामागे (unintentional weight loss )शरीरात वाढत जाणारे आजार कारणीभूत असतात. अशा पध्दतीनं वजन कमी होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डाॅक्टरांकडे जायला हवं. 5 प्रकारच्या आजारांमुळे आपोआप वजन कमी होतं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
1. संधिवात
संधिवात अर्थात रुमेटाइड अर्थराइटिस हा स्वयंप्रतिकार करणारा आजार आहे. या आजारात रोगप्रतिकारशक्ती सांध्यावर आक्रमण करतात. यामुळे सांध्यांना सूज येते. ही सूज जर खूप काळ टिकली तर त्याचा परिणाम शरीराच्या चयापचय क्रियेवर होतो. चयापचय क्रिया वेगवान होवून वजन वेगानं घटतं.
Image: Google
2. नैराश्य
अभ्यासकांच्या मते नैराश्य या मानसिक आजाराचे परिणाम शरीरावरही दिसतात. नैराश्यामध्ये उदास वाटतं. कशातच लक्ष लागत नाही. ही लक्षणं जर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिली आणि त्याकडे जर दुर्लक्ष झालं तर वजन कमी होवू लागतं. नैराश्य या मानसिक आजारात भूक नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर परिणाम होतो. त्याचा परिणाम म्हणजे भूक कमी लागते आणि वजन कमी होतं.
Image: Google
3. आतड्यांचा दाह
इंफ्लेमेटरी बाउल डिजीज अर्थात आतड्यांचा दाह/ सूज या आजाराचा परिणाम म्हणूनही वजन कमी होतं. या आजारात आतड्यांना सूज येतो. आतड्यांचा दाह होतो. त्याचा परिणाम पचनक्रियेवर होतो. आतड्यांचा दाह हा आजार झाल्यास भूकेशी निगडित असलेलं घ्रेलिन या हार्मोनच काम बिघडतं. तर जेवण केल्यानंतर समाधान प्राप्त करुन देणारं लेप्टिन हे हार्मोनही काम करेनासं होतं. या कारणांमुळे भूक कमी होते. अन्नावरची वासना उडून वजन कमी होतं.
Image: Google
4. हायपरथायराडिज्म
हायपरथायराडिज्म हा थायराॅइड ग्रंथीशी निगडित आजार आहे. या समस्येला ओव्हरॲक्टिव्ह थायराॅइड असंही म्हणतात. थायराॅइड ग्रंथी शरीरातील कामं नियंत्रित करण्याचं काम करते. हायपरथायराडिज्म या समस्येत थायराॅइड ग्रंथी हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार करते. त्याचा परिणाम चयापचय क्रियेवर होतो. या आजारात शरीरातील उष्मांक जास्त प्रमाणात जळतात. भूक व्यवस्थित असली तरी हायपरथायराडिज्ममुळे वजन अचानक आणि आपोआप कमी व्हायला लागतं.
Image: Google
5. मसल लाॅस
बैठ्या जीवनशैलीमुळे जसं वजन वाढतं तसं ते कमीही होतं. त्याचं कारण बैठ्या जीवनशैलीमुळे काही स्नायू वापरलेच जात नाही. स्नायू वापरले गेले नाही तर स्नायुंची झीज होवून मसल लाॅस होतो. अशा प्रकारे स्नायुंची झीज झाल्यामुळे वजन कमी होतं.