Join us   

शुगर कंट्रोल करायची, सोप्पंय; सवयी बदला, नाश्त्याला हे ४ पदार्थ नियमित खा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 4:19 PM

सकाळच्या नाश्त्यात आरोग्यदायी पदार्थांच समावेश करुन मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो हे अभ्यासातून सिध्द झालं आहे. त्यामूळे मधुमेही रुग्णांनी सकाळी नाश्त्याला काहीबाही किंवा जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ मुद्दाम टाळून आणि योग्य पदार्थांचा समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहील.

ठळक मुद्दे नाश्त्याला ओटस खाण्याने खूप फायदा होतो. कारण ओटसमधे भरपूर प्रमाणात फायबर असतात.बार्लीत ओटसच्या तुलनेत दुप्पट प्रथिनं आणि उष्मांक असतात. याचमुळे नाश्त्याला बार्लीचे पदार्थ खाणं याला महत्त्व आहे.बदाम खाल्ल्याने टाइप २ डायबिटीजमधे रुग्णांच्या रक्तातील ग्लायसेमिक स्तर पूर्णत: नियंत्रणात राहातो.

पूर्वीपेक्षा आताची जीवनशैली खूप बदलली आहे. घावपळीची, दगदगीची झाली आहे. झोपणं- उठणं, खाणं- पिणं या कशालाच काळवेळ राहिलेला नाही. ही धावपळीची जीवनशैली आपल्याला स्पर्धात्मक जगात यश देते आहे असं वाटत असलं तरी आपण आरोग्याच्या पातळीवर खूप काही गमावतो आहे. ही बदलेली जीवनशैली कमी वयात आयुष्यभर सोबत करणारे आजार देते आहे. आज कमी वयात स्त्री पुरुषांना मधुमेह होतो आहे. अनेकजण होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. असं म्हणतात की कुठलीही गोष्ट असो किंवा एखादी चूक असो ती सुधरायची वेळ कधीच हातातून जात नाही. मधुमेहाच्या बाबतीतही तसंच आहे. चुकीची जीवनशैली टाळून आरोग्यदायी सवयी लावल्या तर मधुमेह नियंत्रणात राहातो आणि पुढचे धोके टळतात. योग्य जीवनशैलीमधे योग्य आहार हा खूप महत्त्वाचा मूद्दा असतो. मधुमेहात सकाळच्या नाश्त्याला खूप महत्त्व असतं. एकतर मधुमेही रुग्णांनी जास्त काळ उपाशी राहून चालत नाही. नाहीतर त्यांची रक्तातील साखर एकदम कमी होते. आणि रात्रीचं जेवण होवून सकाळी बराच काळ उलटून गेलेला असतो. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळचा नाश्ता टाळून चालत नाही.

सकाळच्या नाश्त्याला  आरोग्यदायी पदार्थांच समावेश करुन मधूमेह नियंत्रणात ठेवता येतो हे अभ्यासातून सिध्द झालं आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी सकाळी नाश्त्याला काहीबाही किंवा जिभेचे चोचले पुरवणारे पदार्थ मुद्दाम टाळून आणि योग्य पदार्थांचा समावेश केल्यास मधुमेह नियंत्रणात राहील , दिवसभर काम करण्यास ऊर्जा मिळेल . सकाळच्या नाश्त्याला काही आरोग्यदायी पर्याय आहेत ज्याद्वारे मधुमेह नियंत्रणात ठेवता येतो.

Image: Google

१. ओटस

नाश्त्याला ओटस खाण्याने खूप फायदा होतो. कारण ओटसमधे भरपूर प्रमाणात फायबर असतात. ओटस खाल्ल्याने ते लवकर पचतातही. पण ओटसमुळे भरपूर वेळ पोट भरल्यासारखं राहातं. ओटसमुळे रक्तातील साखरेचा स्तर नियंत्रित राहातो. मधुमेह आणि स्थूलता अशा दोन्ही समस्या असतील तर नाश्त्याला ओटपासूनच्या वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. ओटसमधे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, फोलेट आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. हे ओटस कमी फॅटस असलेल्या दुधात शिजवून खावेत. यात साखरेऐवजी मध टाकून खावं. तसेच ओटसचा उपमा, इडल्या असे पदार्थही करता येतात.

Image: Google

२. बार्ली

नाश्त्याला ओटसला पर्याय बार्लीचा आहे. बार्लीत ओटसच्या तुलनेत दुप्पट प्रथिनं आणि उष्मांक असतात. याचमुळे नाश्त्यात बार्लीचे पदार्थ खाणं याला महत्त्व आहे. बार्लीमधे पचनास सहाय्यभूत असणारे फायबर भूक नियंत्रित करतात. तसेच मधुमेहामुळे हदयाला असलेला धोकाही बार्लीच्या सेवनानं कमी होतो.

Image: Google

३. दही

तसं पाहिलं तर सगळ्यांनीच दही खायला हवं. पण मधुमेही रुग्णांसाठी तर नाश्त्यात थोडं तरी दही आवश्यक आहे. सकाळी नाश्त्याला खाल्लं नाही तर किमान दुपारच्या जेवणात तरी दही हवंच. लो फॅट दही एक वाटी खाल्ल्याने मधुमेही रुग्णांचं इन्शुलिन लगेच वाढत नाही. याशिवाय दह्यामधे प्रथिनं, कॅल्शियम आणि पचनाला मदत करणारे इतरही महत्त्वाचे घटक असतात. दही जर रोजच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात असेल तर टाइप २ डायबिटीज होण्यासही प्रतिबंध होतो.

Image: Google

४.  बदाम 

मधुमेही रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात थोडे बदाम खावेत. बदाम खाल्ल्याने टाइप २ डायबिटीजमधे रुग्णांच्या रक्तातील ग्लायसेमिक स्तर पूर्णत: नियंत्रणात राहातो. चार ते पाच बदाम आणि सोबत एक हंगामी फळ खावं. पण फळं खाताना ती प्रामुख्यानं आंबट चवीची अर्थात सायट्रिक फळं खावीत. जर मधुमेहाचं प्रमाण खूप असेल तर आधी आहारतज्ज्ञांना भेटून त्यांच्याकडून एक डाएट् चार्ट करुन तो काटेकोरपणे पाळायला हवा,

सकाळच्या नाश्त्याच्या बाबतीत वरील चार पदार्थांचा गांभिर्यानं आपल्या आहारात समावेश केला तर मधुमेही रुग्णांंचा मधुमेह नियंत्रणात राहून त्यांना बिनधोक आरोग्यदायी जीवन जगता येतं.

 

टॅग्स : अन्नहेल्थ टिप्स