Join us   

४ प्रकारची पानं करतात शुगर कण्ट्रोल; रोजच्या वापरात ‘ती’ पानं कशी वापरायची, ४ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2022 12:22 PM

Sugar Level Control Tips : आहार, औषधोपचार यांबरोबरच आयुर्वेदातील काही वनस्पतींचा आहारात समावेश केल्यास शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते...

ठळक मुद्दे अश्वगंधा घेतल्यास शरीराची ताकद भरुन निघण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असणारे रुग्ण याचे सेवन करु शकतात.डायबिटीस एकदा मागे लागला की तो शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सोबत राहतो, त्यामुळे सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षात भारत हा डायबिटीसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असलेला एक देश आहे. आनुवंशिकता, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, आहाराच्या चुकीच्या पद्धती यांमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे (Diabetes Control Tips). भारतात टाइप - १ आणि टाइप - २ अशा दोन्ही डाय़बिटीसचे प्रमाण वाढले आहे (4 Ayurvedic herbs to prevent high sugar level and insulin problems). इतकेच नाही तर पूर्वी वयाच्या ५० किंवा ६० वर्षानंतर होणारा डायबिटीस आता वयाच्या तिशीतच होऊ लागला आहे. शरीरात पुरेशा प्रमाणात इन्शुलिन तयार होत नसेल तर रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि आपल्याला डायबिटीस झाला असे आपण म्हणतो (Sugar Level Control Tips). 

(Image : Google)

डायबिटीसला स्लो पॉयझनिंग म्हणतात याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा आजार शरीर हळूहळू पोखरत जातो आणि शुगर नियंत्रणात ठेवली नाही तर प्रसंगी अवयव निकामी होण्याचीही शक्यता असते. योग्य आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांच्या साह्याने ही वाढलेली शुगर नियंत्रणात येऊ शकते. आयुर्वेदातही यासाठी काही उपाय असून कोणत्या वनस्पती शुगर कमी कऱण्यास उपयुक्त ठरतात याविषयी सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे...

१. कडीपत्ता 

आपण स्वयंपाकात पदार्थांना स्वाद येण्यासाठी नियमितपणे कडीपत्ता वापरतो. मात्र अनेकदा आपण पदार्थांतून कडीपत्ता बाहेर काढतो आणि टाकून देतो. असे करणे योग्य नसून कडीपत्ता चावून खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. शुगरमुळे पचनशक्ती काही वेळा क्षीण होण्याची शक्यता असते, ही पचनशक्ती दिर्घकाळ चांगली राहावी आणि मेटाबॉलिजम चांगला राहावी यासाठी कडीपत्ता गुणकारी ठरतो. 

रोजच्या जगण्यातल्या ४ साध्या चुका देतात हार्ट अटॅकला आमंत्रण, बघा तुम्ही रोज किती चुकताय?

२. गुळवेल 

चवीला कडू असलेली ही औषधी वनस्पती रोगप्रतिकारशक्ती, दमा, सर्दी, अशक्तपणा, कावीळ अशा अनेक आजारांवर अमृतसारखं काम करते. याशिवाय यामध्ये आढळणारा अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्याचे काम करतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही गुळवेल फायदेशीर ठरते. गुळवेलीचा काढा घेणे, गुळवेलच्या गोळ्या घेणे अशाप्रकारे आपण गुळवेलीचा वापर करु शकतो. 

(Image : Google)

३. कडुलिंब 

आपल्याकडे चैत्र पाडव्याला आवर्जून खाल्ली जाणारी कडुलिंबाची पाने आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. कारले, मेथ्या यांसारख्या कडू चवीच्या गोष्टी डायबिटीसवर गुणकारी ठरतात. कडुलिंबाला कडवटपणा जास्त असल्याने त्याचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. चहाच्या स्वरुपात किंवा पाण्यात कडुलिंबाची पाने उकळून हे पाणी पिणे फायदेशीर ठरते. 

‘व्हिटॅमिन डी’ सतत आणि जास्त प्रमाणात घेतलं तर, सावधान तब्येत बिघडण्याचा धोका आहे..

४. अश्वगंधा

अश्वगंधा ही आयुर्वेदातील एक अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये अश्वगंधा वापरली जाते. डायबिटीसमुळे अनेकदा व्यक्तीला थकवा किंवा अशक्तपणा येण्याची शक्यता असते. अशावेळी अश्वगंधा घेतल्यास शरीराची ताकद भरुन निघण्यास मदत होते. त्यामुळे डायबिटीस असणारे रुग्ण याचे सेवन करु शकतात. चहाच्या स्वरुपात काढा म्हणून किंवा दूधात घालून ही वनस्पती घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. मात्र आयुर्वेदतज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वरील औषधांचा उपयोग करावा...  

टॅग्स : आरोग्यमधुमेह