Join us

Sugarcane Juice: उन्हाळ्यात उसाचा थंडगार रस म्हणजे सुख; पण मधुमेहींनी प्यायला तर चालतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 14:43 IST

Sugarcane Juice:उसाचा रस आवडत नाही असा विरळाच, मात्र हा साखरेचा थेट स्रोत असल्याने मधुमेही रुग्णांनी तो प्यायला तर चालेल का? ते जाणून घ्या. 

भारतात मधुमेहाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याला कारणीभूत भारतीय अन्नपदार्थ वा मिठाई नसून बिघडलेली जीवनशैली आणि आहार नियंत्रणाचा अभाव हे आहे. कामगार वर्गातल्या लोकांना सहसा मधुमेह होत नाही. कारण भरपूर मेहनत, दोन वेळचे जेवण आणि पुरेशी झोप घेतल्यामुळे त्यांच्यामागे या 'महागड्या' व्याधी लागत नाहीत. तर अनिश्चित जीवनशैली, पॅकेट फूड, जंक फूड, बाहेरचे अन्न यांच्या सेवनामुळे वजनवाढ आणि पर्यायाने रक्तदाब, मधुमेह हे आजार होतात. एक वेळ अशी येते की उसाच्या रसासारखे नैसर्गिक पदार्थ सेवन करतानाही भीती वाढते. ही भीती योग्य आहे की अनाठायी? चला जाणून घेऊया. 

उन्हाच्या झळा असह्य झाल्या की खूलूखुळू घुंगरू वाजणाऱ्या उसाच्या रसांवंतीगृहाकडे आपसुख पाय वळतात. बर्फवाला, बिनाबर्फवाला, मसाला, अद्रक घातलेला वा न घातलेला उसाचा रस सुमधुर लागतो. मात्र अशावेळी मधुमेही रुग्ण इच्छा असूनही मोहावर नियंत्रण ठेवतात. कारण, उसाचा रस गोड असल्यामुळे त्याच्या सेवनाने रक्तातील साखर झपाट्याने वाढेल की काय अशी त्यांना भीती वाटते. मात्र उसाच्या रसाने खरोखरच साखर वाढते का? चला जाणून घेऊ. 

मधुमेही रुग्णाने उसाचा रस प्यावा का?

उसाचा रस खूप गोड असतो. मधुमेही रुग्णांनी उसाचा रस पिणे टाळावे.  कारण उसाच्या रसात सुक्रोज असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. मात्र रस पिण्याची इच्छा अनावर होत असेल, तर अर्धा ग्लास बिनाबर्फ घातलेला रस दिवसा प्यावा, तोही महिन्यातून एकदाच! तरीदेखील डॉक्टरांचा सल्ला उपयुक्त ठरेल. 

उसाच्या रसात कॅलरीजचे प्रमाण 

एक ग्लास उसाच्या रसामध्ये अंदाजे 250 कॅलरीज असतात. झटपट ऊर्जेसाठी उसाचा रस अत्यंत गुणकारी आहे. पण मधुमेही रुग्णाने ऊस मोजक्या प्रमाणात घ्यावा.

वजन वाढ : 

उसामध्ये जास्त कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन कमी होत असेल तर उसाचा रस पिऊ नये. जर तुम्ही रोज उसाचा रस प्यायलात तर तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.

निद्रानाश :

उसाच्या रसात पॉलिकोसॅनॉल असते ज्यामुळे निद्रानाशाची समस्या वाढते. जर तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल तर तुम्ही उसाचा रस कमीत कमी प्यावा. निरोगी व्यक्तीनेही उसाचा रस आठवड्यातून एक ते दोन वेळा प्यावा, तोही सकाळीच प्यावा. 

ऊस हा उष्ण प्रकृतीचा असल्याने उन्हाळ्यात उसाच्या रसाचे सेवन इच्छा होते, मात्र त्याचे अतिरिक्त सेवन आरोग्यासाठी तापदायी ठरू शकते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह