उकाडा वाढायला लागला की अंगाची लाहीलाही तर होतेच. पण तोंड याणे, डोळ्यांची किंवा तळपायाची जळजळ होणे, थकवा येणे अशा समस्या उद्भवतात. याशिवाय सतत लघवी लागणे किंवा खालच्या बाजुला आग होणे, अॅसिडीटी यांसारखे त्रासही होतात. उन्हाळ्याच्या दिवसांत हवेतील तापमानाशी जुळवून घेताना शरीरात होणारे हे बदल त्रासदायक ठरु शकतात. उन्हात ज्यांना कामासाठी बाहेर जावं लागतं, त्या लोकांना तर उष्णतेचा त्रास होतोच, पण घरात असणाऱ्यांनाही थोड्या फार फरकाने उष्णतेच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेताना आपल्या आहार-विहारात आवर्जून काही बदल करायला हवेत. हे बदल काय आणि कसे करावेत याविषयी समजून घेऊया (Summer Care Diet Tips).
१. द्रव पदार्थ वाढवणे
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला घाम येतो. तसेच उन्हामुळे शरीर कोरडे पडते. त्यामुळे या काळात शरीराला जास्तीत जास्त द्रव पदार्थांची आवश्यकता असते. अशावेळी आहारात जास्तीत जास्त पाणी घ्याला हवे. याशिवाय सरबत, नीरा, नारळ पाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा.
२. थंड पदार्थांचा समावेश वाढवणे
दही, दूध, गुलकंद, काकडी यांसारखे पदार्थ शरीराला थंडावा देणारे असतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत हे पदार्थ आहारात आवर्जून घ्यायला हवेत. अनेकदा आईस्क्रीम किंवा उसाचा रस थंड असतो म्हणून आपण तो आहारात घेतो. पण हे दोन्हीही उष्ण असते आणि त्यामुळे आरोग्याच्या इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे दही भात, दह्याचे रायते, गुलकंद दूध असे पोटाला थंड पदार्थांचा उन्हाळ्यात आवर्जून समावेश करायला हवा.
३. ताजी फळं
उन्हाळ्याच्या दिवसांत बाजारात द्राक्षं, कलिंगड, खरबूज, काकडी यांसारखी फळं उपलब्ध असतात. याशिवाय गरे, आंबे, संत्री, ताडगोळे यांसारखी ऊर्जा आणि विविध पोषक घटक शरीराला मिळतात. प्रत्येक सिझनला स्थानिक रसाळ फळे आवर्जून खायला हवीत. कारण अशा फळांमध्ये उष्णता कमी करणारे गुणधर्म असतात.