Join us   

उन्हाळ्यात घराबाहेर पडताना बॅगेत असायलाच हव्यात ४ गोष्टी, उकाडा होईल सुसह्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2023 5:40 PM

Summer Care Tips : उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी आवर्जून असायला हव्यात.

एप्रिल आणि मे महिना म्हणजे अजिबात नको होणारा कालावधी. उन्हाचा कडाका वाढल्याने शरीराची लाहीलाही, त्यामुळे प्रमाणाबाहेर येणारा घाम आणि होणारी चिकचिक नको होते. त्यातही घशाला आणि तोंडाला सतत कोरड पडत असल्याने सारखं पाणी प्यावसं वाटतं. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता होणे, उन्हाळी लागणे, चक्कर येणे किंवा डिहायड्रेशन अशा समस्या निर्माण होतात. उन्हाचा तडाखा वाढतो म्हणून लहान मुलांना शाळेला किंवा कॉलेजलाही सुट्टी असते. पण आपल्याला मात्र ऑफीस, बाहेरची कामं हे सगळं करावंच लागतं. मात्र या कडक उन्हाचा आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असते. थंडीत बाहेर जाताना आपण स्वेटर घालतो किंवा पावसाळ्यात न विसरता रेनकोट किंवा छत्री घेऊन जातो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे काही गोष्टी आवर्जून असायला हव्यात. या वस्तू कोणत्या आणि त्याचा काय उपयोग होतो पाहूया (Summer Care Tips)...

१. स्कार्फ किंवा टोपी

मूलं ज्याप्रमाणे उन्हासाठी टोपी आणि गॉगल घालून बाहेर पडतात त्याचप्रमाणे महिलांनी घराबाहेर जाताना डोक्याला आणि चेहऱ्याला स्कार्फ आवर्जून बांधायला हवा. या स्कार्फमुळे कडक उन्हापासून आपल्या डोक्याचे संरक्षण होते. इतकेच नाही तर उन्हाच्या चटक्यामुळे काळी पडणारी स्कीन आणि केस यांचेही संरक्षण होते. त्यामुळे उन्हात बाहेर पडताना कॉटनची ओढणी किंवा दुपट्टा घ्यायला अजिबात विसरु नका. इतकेच नाही तर तुम्ही गाडीवर किंवा चालत फिरणार असाल तर गॉगल लावायला विसरु नका, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण व्हायला मदत होईल.

२. पाण्याची बाटली

उन्हामुळे आपल्याला सतत तहान तहान होते. अनेकदा उन्हामुळे डोळ्यापुढे अंधारी येणे, चक्कर येणे अशा समस्याही उद्भवू शकतात. अशावेळी पाणी विकत घेण्यापेक्षा आपल्या बॅगमध्ये पाणी असलेले केव्हाही चांगले. उन्हाळ्यात तहान लागली की आपण सरळ रस्त्यावरचे लिंबू सरबत किंवा फ्रूट ज्यूस पितो. पण यामध्ये वापरलेले पाणी कुठले असते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पोटाचे किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला पाण्याची जास्त गरज असल्याने घराबाहेर पडताना न विसरता पाण्याची बाटली आवर्जून घ्यायला हवी. 

३. सन स्क्रीन लोशन

उन्हाळ्याच्या दिवसांत सूर्यकिरणे तीव्र असतात. ही किरणे अंगावर पडली की त्यामुळे सन बर्न किंवा त्वचेला रॅश येणे, खाज येणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी आपण घरातून बाहेर पडताना हाताला, मान आणि चेहऱ्याला आवर्जून सनस्क्रीन लोशन लावतो. मात्र काही वेळाने याचा इफेक्ट कमी होत जातो. अशावेळी पुन्हा सनस्क्रीन लोशन लावण्याची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्याला बाहेर वेळ लागणार असेल तर आपल्या बॅगेत सनस्क्रीन लोशन आवर्जून असायला हवे. 

(Image : Google)

४. परफ्यूम किंवा अत्तर 

आपल्याला एरवीच घाम येतो, पण उन्हाळ्यात तर घामाचे प्रमाण जास्त वाढते. घाम म्हणजे आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. काहींना इतका जास्त घाम येतो की ठराविक वेळाने या घामाचा वास यायला लागतो. घामाच्या वासामुळे आपल्या आजुबाजूच्यांना त्रास होऊ शकतो. अशावेळी आपल्या बॅगमध्ये परफ्यूम, डिओड्रंट, अत्तर यांसारख्या गोष्टी आवर्जून असायला हव्यात. जेणेकरुन घामाचा आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्यालाही फ्रेश वाटेल. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशललाइफस्टाइल