Join us   

Summer Care Tips : भर उन्हात रस्त्यावरची सरबतं पिता, फ्रुट डिश खाताय? 4 गोष्टी विसरलात तर तब्येत बिघडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 5:39 PM

Summer Care Tips : उन्हाळ्यात बाहेर सरबत किंवा ज्यूस प्यायचाच असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी...

ठळक मुद्दे घशाला गार लागण्यासाठी हे चांगले वाटत असले तरी बर्फामुळे घशाला त्रास होण्याची शक्यता असते. आपण ज्याठिकाणी बाहेर खातो किंवा पितो त्याठिकाणी माशा, किटक असणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्यायला हवी.

डोक्यावर ऊन तापायला लागलं की आपल्या शरीराची लाहीलाही होते. त्यातही आपण घराबाहेर असू तर उन्हामुळे अक्षरश: अंगातले त्राण गेल्यासारखे होते. अशावेळी तहान शमवण्यासाठी आपण पाण्याचा आधार घेतो आणि पाण्यानेही तहान शमली नाही तर आपण रस्त्यात मिळणारी गार सरबते, फ्रूट डिश किंवा शीतपेये यांचा आधार घेतो. या गोष्टींमुळे आपल्याला तात्पुरती एनर्जी येते, आपली तहानही शमते. पण नंतर या गोष्टींमुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता असते. (Summer Care Tips) त्यामुळे बाहेर सरबत किंवा ज्यूस प्यायचाच असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याविषयी...

(Image : Google)

१. पाणी 

अनेकदा बाहेर सरबत किंवा ज्यूस तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे चांगले आहे की नाही याबाबत आपल्याला माहित नसते. हे पाणी दूषित किंवा अस्वच्छ असेल तर यातून पोटाचे आजार किंवा इतर काही अॅलर्जी निर्माण होऊ शकतात. काही वेळा हे पोटाचे आजार इतके तीव्र असतात की डायरीया किंवा अतिसारामुळे अॅडमिट होण्याची वेळ येऊ शकते.

२. याठिकाणी वापरली जाणारी भांडी व इतर साधने 

आपण बाहेर ज्यूर किंवा सरबत पितो त्याठिकाणी वापरले जाणारे ग्लास, पातेली, मिक्सर, सुरी, चमचे हे स्वच्छ आहेत की नाही पाहावे. ही भांडी स्वच्छ नसतील किंवा त्यांना गंज आलेला असेल तर ती आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. किंवा अनेकदा रस्त्यावरील स्टॉलवर जास्त गर्दी असेल तर दिले जाणारे ग्लास हे व्यवस्थित न धुता तसेच दिले जातात. त्यामुळे इन्फेक्शन्स पसरण्याची भिती असते. 

३. माशा, किटक आणि अस्वच्छता

ऊसाचा रस पिताना याठिकाणी असलेल्या उसाच्या मळीमुळे किंवा फळांच्या स्टॉलवरही माशा घोंघावताना दिसतात. माशांमुळे जुलाब, उलट्या किंवा संसर्गजन्य आजार सपरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण ज्याठिकाणी बाहेर खातो किंवा पितो त्याठिकाणी माशा, किटक असणार नाहीत याची आवर्जून काळजी घ्यायला हवी. तसेच याठिकाणी किमान स्वच्छता असेल तरच अशाठिकाणी खाल्लेले किंवा प्यायलेले चांगले. 

४. फळांची सकसता

आपण फळे खातो म्हणजे आपण हेल्दी खातो असे अनेकांना वाटते. पण ही फळे जुनी झालेली, सडलेली किंवा कमी दर्जाची असू शकतात. आपल्याला फळे देताना ती खूप गार झालेली किंवा त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकून दिले जातात. त्यामुळे आपल्याला त्या फळांची नेमकी चव लक्षात येत नाही. इतकेच नाही तर ही फळे पुरेशी गोड नसतील तर त्यावर साखर टाकून देणे, ती साखरेच्या पाण्यात ठेवणे, असे प्रकार सर्रास केले जातात. त्यामुळे आपण फळे खात असलो तरी त्याचा दर्जा कसा आहे हे लक्षात घ्यायला हवे. 

(Image : Google)

५. बर्फ आणि खूप गार पाणी टाळावे

उन्हाळ्यात अनेकदा बाहेर सरबत किंवा उसाचा रस पिताना त्यामध्ये बर्फाचा वापर केलेला असतो. त्या वेळेपुरचे घशाला गार लागण्यासाठी हे चांगले वाटत असले तरी बर्फामुळे घशाला त्रास होण्याची शक्यता असते. बर्फामुळे घसा धरणे, सर्दी होणे, ताप येणे, खोकला होणे अशा समस्या उद्भवतात. तसेच हा बर्फ कुठून आणला आहे, त्यासाठी वापरलेले पाणी चांगले आहे की नाही याबाबत आपल्याला माहित नसते. त्यामळे उन्हाळ्यात बाहेर काही पिताना बर्फे न घातलेल पेय प्यावे.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससमर स्पेशल