गेल्या काही दिवसांपासून आपल्याला दिवसा चांगलेच उकडायला लागले आहे. डोक्यावर ऊन तापत असल्याने घामाघूम होण्याची वेळ आली आहे. उन्हाचा तडाखा वाढला की आणखी एक गोष्ट आपल्याला सतावते ती म्हणजे घशाला पडणारा कोरडेपणा. अशावेळी आपल्याला सतत पाणी प्यायची इच्छा होते. पाण्यामुळे कोरडेपणा दूर होतो आणि घशाला आणि शरीराला आराम मिळतो. उन्हाने शरीरात आलेली शुष्कता कमी होऊन शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहण्यास याची मदत होते (Summer Care Tips For Constant Mouth Dry Problem).
अनेकदा तर आपल्याला उकाड्यामुळे काहीच खावसं वाटत नाही आणि सतत काहीतरी थंडगार प्यावं असं वाटत राहतं. पाणी किंवा इतर काही प्यायल्यास पोट इतकं भरतं की काहीच खायचीही इच्छा होत नाही. एकदा पाणी प्यायलं तरी परत काही वेळातच आपल्याला पुन्हा पाणी प्यावसं वाटतं, उकाड्याने तोंड, घसा सतत कोरडा पडत असल्याने असं होतं. अशावेळी काय केल्याने आपल्याला तहान तहान होणं कमी होईल आणि आराम मिळेल पाहूया...
१. तोंडात गोळी ठेवणं
उन्हाळ्यात सारखं पाणी पाणी होत असेल तर तोंडात एखादी गोळी ठेवणे हा उत्तम उपाय असू शकतो. यामध्ये संत्र्याची गोळी किंवा बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्यांचा समावेश करता येऊ शकतो. यामुळे लाळेची निर्मिती होते आणि तोंडातील तसेच घशातील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. इतकेच नाही या गोळ्या चवीला गोड असल्याने उन्हामुळे आलेला थकवा कमी होण्यासही चांगली मदत होऊ शकते.
२. बर्फ चघळणे
उन्हाळ्यात आपल्याला सतत गारेगार काहीतरी खावेसे किंवा प्यावेसे वाटते. अशावेळी बर्फाचा छोटा तुकडा तोंडात ठेवल्यास अतिशय छान वाटते. तोंडातील उष्णतेने बर्फ विरघळतो आणि त्याचे पाणी घशाला आराम देणारे ठरते. त्यामुळे आपल्याला सतत पाणी पाणी होत नाही. मात्र हा बर्फ चांगल्या पाण्याचा घरात केलेला असावा. तसेच तो खूप जास्त प्रमाणात न चघळता एक किंवा दोन तुकडेच चघळावेत.
३. सरबत किंवा थंड पेय
सोलकढी, ताक, लिंबाचे किंवा कोकम, आवळा सरबत ही उन्हाळ्याच्या दिवसांत आवर्जून घेतली जाणारी पेय आहेत. यासोबतच नीरा, शहाळ्याचं पाणी, पाणीदार फळे यांचा आहारात समावेश वाढवावा. त्यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच पण सतत पाणी पाणी होण्याची समस्याही यामुळे कमी होते. थंड पेय प्यायल्याने तात्पुरते बरे वाटते पण पुन्हा तहान लागल्यासारखे होते. त्यामुळे खूप गार फ्रिजमध्ये ठेवलेले पेय न पिता सामान्य तापमानाचे किंवा थोडे गार असलेले पेय प्यायला हवे.