Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात अचानक ताप येतो, उलट्या होऊन अंगावर रॅश येते? उन्हाळा बाधू नये म्हणून लक्षात ठेवा १० टिप्स..

उन्हाळ्यात अचानक ताप येतो, उलट्या होऊन अंगावर रॅश येते? उन्हाळा बाधू नये म्हणून लक्षात ठेवा १० टिप्स..

Summer Care Tips : उन्हाचा कडाका वाढल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2023 02:33 PM2023-04-30T14:33:30+5:302023-04-30T14:44:02+5:30

Summer Care Tips : उन्हाचा कडाका वाढल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, अशावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

Summer Care Tips : Sudden fever, vomiting and body rash in summer? Remember 10 tips to avoid summer... | उन्हाळ्यात अचानक ताप येतो, उलट्या होऊन अंगावर रॅश येते? उन्हाळा बाधू नये म्हणून लक्षात ठेवा १० टिप्स..

उन्हाळ्यात अचानक ताप येतो, उलट्या होऊन अंगावर रॅश येते? उन्हाळा बाधू नये म्हणून लक्षात ठेवा १० टिप्स..

डॉ. अविनाश भोंडवे    
 

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हात काही काळ हिंडल्यावर, त्वचेचा दाह होऊन त्यावर पुरळ येते, द्रव पदार्थाने भरलेले छोटे वेदनादायी फोड येतात, स्पर्श केल्यावर त्वचा गरम लागते आणि क्वचितप्रसंगी डोकेदुखी, ताप, मळमळ होऊन उलट्या सुरु होतात, या सर्व लक्षणांना 'सनबर्नस' म्हणतात. तीव्र उन्हाळ्यात सनबर्नची लक्षणे अनेकांना जाणवू लागतात. कान, मस्तक,कपाळ, टाळू, ओठ, डोळे अशा अवयवांमध्ये सनबर्न्सचा दाह उद्भवतो. कपड्यांची वीण सैल असेल तर कपड्यातून अल्ट्राव्हायोलेट किरणे जाऊन, झाकलेल्या त्वचेवरही तो उद्भवतो. अशावेळी संवेदनाशील असलेल्या डोळ्यांनाही लाल होणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यातून पाणी येणे असे त्रास जाणवतात (Summer Care Tips). 

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

उन्हात जाऊन आल्यावर, अंगावर मोठे फोड येणे, चेहरा, हात किंवा गुप्तांगांवर फोड येणे, फोडांवरील सूज त्वचेवर इतरत्र पसरणे, फोडांमध्ये जंतुसंसर्ग होऊन पू भरून तीव्र वेदना होणे, डोकेदुखी, मळमळ, ताप किंवा थंडी वाजून येणे असे त्रास झाल्यास डॉक्टरांना त्वरित दाखवावे. डोळा दुखू लागल्यास किंवा दृष्टीमध्ये बदल घडल्यास नेत्रतज्ञांनादेखील दाखवणे आवश्यक असते. ३८ अंश सेंटीग्रेड किंवा १०१ अंश फॅरेनहीटपेक्षा कडक ताप, तापासोबत उलट्या होत असल्यास, आजूबाजूला काय चाललेय हे न समजण्यासारखी संभ्रमित अवस्था होऊन चक्कर येऊ लागल्यास, त्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करणे आवश्यक असते.


असे झाल्यास उपचार काय?


१. सकाळी १० ते सायंकाळी ५च्या  दरम्यान उन्हात जाणे शक्यतो टाळावे. या काळात सूर्याची किरणे तीव्र असल्यामुळे उन्हात जाणे टाळलेले केव्हाही चांगले.

२. ढगाळ दिवसातही, पाणी-प्रतिरोधक, ब्रॉड-स्पेक्ट्रम लिप बाम व किमान ३० एसपीएफ असलेले सनस्क्रीन वापरावे. ब्रॉड-स्पेक्ट्रम उत्पादने अल्ट्राव्हायोलेट ए आणि बी किरणांपासून संरक्षण देतात. एसपीएफ १० हे अतिनील किरणांना ९७ टक्के अवरोधित करते. 

३. घराबाहेर जाण्यापूर्वी सुमारे ३० मिनिटे आधी, स्वच्छ, कोरड्या त्वचेवर भरपूर प्रमाणात सनस्क्रीन लोशन लावावे. पापण्या वगळता, चेहरा, हात, पाय अशा शरीराच्या सर्व उघड्या भागांवर किमान २ चमचे सनस्क्रीन वापरावे.  

४. सनस्क्रीन स्प्रे वापरत असल्यास, तो त्वचेवर न उडवता, हातावर उडवून त्वचेवर चोळावा. यामध्ये स्प्रे श्वासावाटे आत घेतला जाणार नाही याची काळजी घ्यावी. धूम्रपान करताना किंवा गॅस शेगडी, स्टोव्ह अशा जाळ असलेल्या उपकरणांसमोर वापरू नका.

५. टायटॅनियम ऑक्साईड, झिंक ऑक्साईड असे फिजिकल ब्लॉकर्स असलेली उत्पादने मेकअप केलेल्या चेहऱ्यावरही लावता येते. संवेदनशील त्वचेसाठी सर्वात प्रभावी संरक्षण फिजिकल ब्लॉकर्सद्वारे मिळते.

६. सनस्क्रीन दर दोन तासांनी आणि पोहताना किंवा सतत घाम येत असेल, तर दर तासाला लावावे. मेकअप केलेला असेल, तर संपूर्ण चेहरा न धुता मेकअपवर एसपीएफ पावडर वापरावी.

७. महिन्यापेक्षा मोठ्या मुलामुलींना १५ एसपीएफचे सनस्क्रीन लोशन वापरावे. त्याहून छोट्या मुलांना ते वापरू नये. सनस्क्रीन उत्पादने वापरताना आणि साठवून ठेवताना त्याच्यावरील एक्सपायरीच्या तारखा बघाव्यात. सनस्क्रीन कालबाह्य झाले असल्यास किंवा तीन वर्षांहून अधिक जुने असल्यास ते फेकून द्यावे.

८. उन्हाळ्यात सुती आणि सैलसर, शक्यतो पांढरे किंवा सौम्य रंगाचे आणि  हात आणि पाय पूर्ण झाकणारे कपडे वापरावेत. उन्हात जाताना डोक्यात टोपी घालावी किंवा छत्री वापरावी. 

९. अतिनील किरणे ए आणि बी यांच्यापासून संरक्षण देणारे गॉगल्स वापरावेत. ते खरेदी करताना त्यांचे यूव्ही रेटिंग तपासावे. लेन्स गडद असल्यावर युव्ही संरक्षण चांगले असतेच असे नाही. गॉगल्स शक्यतो मोठ्या आकाराचे असावेत.

१०. काही प्रिस्क्रिप्शन आणि नॉन-प्रिस्क्रिप्शन औषधे सूर्यप्रकाशात त्वचेसाठी अधिक संवेदनशील बनतात. यात प्रतिजैविके, नॉनस्टेरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे, कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे यांचा समावेश होतो. घेत असलेल्या औषधांच्या दुष्परिणामांबद्दल डॉक्टरांशी बोलावे. अल्फा-हायड्रॉक्सी अॅसिड असलेली सौंदर्यप्रसाधनेदेखील सूर्यप्रकाशाची संवेदनशीलता वाढवतात.

 (लेखक जनरल फिजिशियन असून इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत.)       

Web Title: Summer Care Tips : Sudden fever, vomiting and body rash in summer? Remember 10 tips to avoid summer...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.