उन्हाळ्याच्या दिवसांत हवामानातील तापमान इतके वाढलेले असते की त्याच्याशी जुळवून घेताना आपले शरीरही काही ना काही लक्षणं दाखवते. उन्हाळ्याच्या दिवसांत लघवीचे प्रमाण कमी होते कारण शरीराला पाण्याची जास्त आवश्यकता असते. अनेकांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिवळ्या रंगाची लघवी होते. या गोष्टीकडे अनेकदा आपण फार गांभीर्याने लक्षही देत नाही. पण असं होण्याला काही कारणं आहेत. यामध्ये घाबरण्यासारखे काही नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही. मात्र यामागची कारणे आणि त्यावरीली उपाय यांबाबत सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. संदिप काळे....
कारणे
१. उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते.
२. उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त काम, व्यायाम केल्यामुळे आणि पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते आणि लघवी पिवळी होण्याचा त्रास होतो.
३. रक्तातील अशुद्ध व टाकाऊ द्रव्यपदार्थ किडनीद्वारे गाळले जावून लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. युरीनमध्ये टॉक्सिन्स, बॅक्टेरिया, अतिरिक्त प्रोटीन्स आणि साखर यांचा समावेश असतो. यातील कोणत्या घटकाचे प्रमाण कमी-जास्त झाले तरीही पिवळ्या रंगाची लघवी होते.
४. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे लघवीला पिवळा रंग येण्याची शक्यता असते. शरीरातील रक्ताचे पित्तामध्ये रुपांतर होत असते. हे पित्त मलावाटे शरीराबाहेर टाकले जाते.
५. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे हे लघवी पिवळी होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.
उपाय
१. जर तुमच्या लघवीचा रंग पाण्यासारखा असेल तर याचा अर्थ तुमचं पोट आणि किडनी एकदम ठिक आहे. पण जर तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा असेल तरी ठिक आहे, मात्र तुम्ही जास्त पाणी पिण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे.
२. जर उन्हाळा नसतानाही तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर ती चिंतेची बाब असू शकते. कारण गडद पिवळ्या रंगाची लघवी होण्याचे महत्त्वाचे कारण लिव्हरमध्ये समस्या असणे हे असू शकते. अशावेळी जराही वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
३. तुम्हाला घाम येत नसेल, भूक कमी झाली असेल, सतत एसीमध्ये बसत असाल तरी उन्हाळ्यात पिवळ्या रंगाची लघवी होऊ शकते. मात्र यासाठी जास्तीत जास्त पाणी आणि द्रव पदार्थ घेणे हाच उत्तम उपाय आहे.
४. दिवसभरात दोन ते अडिच लीटर लघवी झाल्यास शरीर चांगल्या पद्धतीने साफ होते. त्यामुळे आपल्याला २४ तासांत किमान ५ ते ६ वेळा लघवी लागते की नाही याकडे लक्ष द्यावे. पाणी योग्य प्रमाणात प्यायले तर लघवी व्यवस्थित होते आणि तब्येत चांगली राहते.
५. उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याबरोबरच आहारात कलिंगड, खरबूज अशा पाणीदार फळांचा समावेश ठेवावा. ताक, शहाळं पाणी, नीरा या गोष्टींमुळेही लघवी साफ होण्यास मदत होते. त्यामुळे आहारात या पेयांचा जरुर समावेश करावा.