उन्हाळ्याची सुरुवात झाल्यानंतर तुम्ही जशी त्वचेची काळजी घेता, तशी डोळ्यांची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. डोळे खूप संवेदनशील असतात आणि वाढते ऊन, धूळ व प्रदुषणामुळे डोळ्यांचे विविध आजार होऊ शकतात. ( Top 8 Tips for Summer Eye Health) उष्ण हवामान, युव्ही किरणांचे वाढलेले प्रमाण आणि क्लोरिन असलेले पाणी इत्यादी घटकांमुळे कॉर्नियाची जळजळ होणे, रेटिनालला हानी पोहोचणे, बुबुळांचा दाह होणे आणि कॉर्नियल संसर्ग होणे असे विकार होतात. डोळ्यांची काळजी घेण्याबाबत डॉ. वंदना जैन यांनी अधिक माहिती दिली आहे. (डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, वाशी)
उन्हाळ्यात बाहेर फिरण्याचा आनंद घेण्यासाठी आपण उत्सुक असतो, पण तसे करताना डोळ्यांची काळजी घ्यायला आपण कायम विसरतो. डोळ्यांसाठी उन्हाळा खूप हानीकारक असतो, कारण युव्ही किरणांचे प्रमाण वाढल्यामुळे कॉर्नियाची जळजळ होणे, रेटिनालला हानी पोहोचणे हे व डोळ्यांचे असे इतर विकार होतात.
एसीच्या वातावरणात जास्त वेळ राहिल्यामुळे डोळे कोरडे होतात, तर पोहोण्याच्या तलावातील क्लोरिनयुक्त पाण्यामुळे बुबुळांना संसर्ग किंवा अॅलर्जी होऊ शकते. परिणामी डोळ्यांना खाज सुटते. म्हणूनच उन्हाळ्याच्या दिवसांत अशा घटकांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे.’
१) युव्हीपासून १०० टक्के संरक्षण देणारे मोठे सनग्लासेस घाला - धोकादायक युव्ही किरणांपासून संपूर्ण संरक्षण देणारे सनग्लासेस खरेदी करा. रॅपअराउंड फ्रेम्स खरेदी करण्यास प्राधान्य द्या, कारण त्या बाजूनेही संरक्षण देतात.
२) रूंद कडा असलेली टोपी – सनग्लासेसबरोबर रूंद कडा असलेली टोपी (वाइड ब्रिम्ड हॅट) वापरल्यानेही उन्हापासून संरक्षण मिळते.
३) भरपूर पाणी प्या – डोळे आणि त्वचा शुष्क पडू नये म्हणून किमान 2 लीटर पाणी प्या.
वजन घटवण्यासाठी भात कशाला सोडता? 'या' पद्धतीनं भात शिजवा, अजिबात वाढणार नाही वजन
४) सनस्क्रीन काळजीपूर्वक लावा – सनस्क्रीन लावताना ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, म्हणजे डोळ्यांची खाज होणार नाही.
५) ऊन टाळा – दुपारी 11 ते 3 दरम्यान उन्हात जाणे टाळा. यावेळेत घरीच राहा. बाहेर जायचे असेल, तर सनग्लासेस आणि टोपी घालायला विसरू नका.
६) पोहोण्याच्या तलावात असताना डोळ्यांची काळजी घ्या – क्लोरिन असलेल्या पाण्यामुळे डोळ्यांना खाज सुटते. पोहोण्याच्या तलावात उतरताना स्विमिंग गॉगल्स घाला आणि पोहून झाल्यावर डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
७) डोळ्यांना ओलावा देणारे ड्रॉप्स घाला – एयर कंडिशनच्या सततच्या वापरामुळे डोळ्यांना खाज सुटते. प्रीझर्व्हेटिव्ह्ज नसलेले आय ड्रॉप्स वापरून डोळ्यांना आराम द्या.
८) संरक्षक आय गियर वापरा – बाहेर वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होताना डोळ्यांना इजा होऊ नये म्हणून संरक्षक आय गियर वापरा.
डोळ्यांची काळजी घेण्यास मदत करणाऱ्या या काही सोप्या टिप्समुळे डोळ्यांच्या कोणत्याही समस्येशिवाय उन्हाळ्याचा आनंद घेणे शक्य होईल. उपचारांपेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. म्हणूनच नियमितपणे डोळ्यांची तपासणी करून काही समस्या असल्यास त्यांचे वेळीच निदान करणे फार महत्त्वाचे आहे. लोकांनी धूम्रपान करणेसुद्धा टाळायला हवे, कारण त्यामुळे कॅटॅरॅक्ट आणि मॅक्युलर डिजनरेशन असे डोळ्यांचे विविध विकार होतात. तेव्हा यंदाच्या उन्हाळ्यात डोळ्यांचे संरक्षण करा आणि काळजीपूर्वक बाहेर फिरण्याचा आनंद घ्या.’