गेल्या काही दिवसांपासून सकाळी थंडी असली तरी दुपारी उन्हाचा तडाखा वाढला आहे. बाहेर कितीही ऊन असलं तरी आपल्याला ऑफीसची किंवा घरातली कामं करण्यासाठी बाहेर पडावंच लागतं. बरेचदा आपण उन्हातान्हात कामं करुन घरी येतो आणि मग आपल्याला बाहेर किती कडक ऊन होतं ते समजतं. उन्हामुळे आपल्याला घामाघूम तर होतंच पण त्यामुळे अंगातली शक्ती जाऊन एकदम अशक्तपणा आल्यासारखंही वाटतं. उन्हातून घरी आल्यावर एकतर आपल्या घशाला कोरड पडलेली असते आणि थकवा आल्याने ग्लानी आल्यासारखेही होते. अशावेळी काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. नाहीतर या उन्हाचा आणि त्यानंतर आपण केलेल्या गोष्टींचा आरोग्यावर चुकीचा परीणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच नेमकी काय काळजी घ्यायची ते पाहूया (Summer Health Care Tips).
१. पाणी पिताना...
उन्हातून आल्याआल्या पाणी न पिता ५ मिनीटे थांबून मग पाणी प्या. एकदम ढसाढसा पाणी प्यायले तर त्याचा त्रास होऊ शकतो. तसेच पाणी पिताना ते साधे पिंपातले किंवा माठातले असेल याची काळजी घ्या. फ्रिजमधले किंवा कुलरमधले पाणी प्यायल्याने घसा धरण्याची शक्यता असते. जास्त तहान लागल्याने आपल्याला गार पाणी प्यावेसे वाटते, मात्र ते आरोग्याला बाधणारे असू शकते.
२. एसी, कुलर किंवा फॅन..
कडक उन्हातून घरात किंवा ऑफीसमध्ये आल्यावर आपल्याला बराच घाम आलेला असतो. यावर लगेच गार वारं घेतलं तर ते बाधू शकते. घामावर वारं घेतल्यावर घाम पुन्हा अंगात मुरतो आणि ते आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडावेळ घरातल्या वातावरणाशी जुळवून घेऊन. पाण्याने तोंड-हात पाय धुवून, अंग कोरडे करुन मग हळू स्पीडवर फॅन लावणे ठिक आहे.
३. थकवा असेल तर
अनेकदा उन्हातून आल्यावर आपल्याला एकदम गळूनन गेल्यासारखे होते. अशावेळी डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखे होणे, त्राण गेल्यासारखे होणे असे होऊ शकते. म्हणून उन्हातून आल्यावर गुळाचा खडा किंवा खडीसाखर तोंडात टाकावी. शक्य असेल तर लिंबाचे किंवा कोकमचे सरबत करुन प्यावे. त्यामुळे कमी झालेली एनर्जी लेव्हल भरुन येण्यास मदत होते.