बाहेर कितीही वारा, पाऊस, ऊन असलं तरी आपल्याला बाहेर जावंच लागतं. लहान मुलांना शाळेला किंवा अगदी कॉलेजलाही ज्याप्रमाणे उन्हाळ्याची सुट्टी असते तशी आपल्याला मोठं झाल्यावर नोकरीत किंवा इतर कामांमध्ये सुट्टी नसते. डोक्यावर कितीही तळपते उन असेल तरी आपल्याला ऑफीसला जावेच लागते. इतकेच नाही तर बँकेची किंवा घरातील इतर कामेही आपल्याला दिवसाच्या वेळेला करावीच लागतात. मात्र या कडक उन्हाचा आरोग्याला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक असते (Summer care tips) . त्यामुळे थंडीत बाहेर जाताना आपण स्वेटर घालतो किंवा पावसाळ्यात न विसरता रेनकोट किंवा छत्री घेऊन जातो. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात घराबाहेर पडताना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याकडे असायलाच हव्यात अशा काही गोष्टी आपल्याला माहित असणे आवश्यक असते (How to take care in Summer). या गोष्टी आपल्यासोबत आपली पर्स किंवा सॅकमध्ये असल्यास उन्हाळा काही प्रमाणात सुसह्य होऊ शकतो आणि मुख्य म्हणजे त्यापासून होणाऱ्या त्रासापासून आपण दूर राहू शकतो. पाहूयात उन्हाळ्यात (Summer Special) बॅगेत असायलाच हव्यात अशा गोष्टी कोणत्या...
१. स्कार्फ
मूलं ज्याप्रमाणे उन्हासाठी टोपी आणि गॉगल घालून बाहेर पडतात त्याचप्रमाणे महिलांनी घराबाहेर जाताना डोक्याला आणि चेहऱ्याला स्कार्फ आवर्जून बांधायला हवा. या स्कार्फमुळे कडक उन्हापासून आपल्या डोक्याचे संरक्षण होते. इतकेच नाही तर उन्हाच्या चटक्यामुळे काळी पडणारी स्कीन आणि केस यांचेही संरक्षण होते. सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे स्कार्फ मिळतात ज्यामुळे आपला लूकही खुलून येऊ शकतो. मात्र उन्हात बाहेर पडताना कॉटनची ओढणी किंवा दुपट्टा घ्यायला अजिबात विसरु नका. इतकेच नाही तर तुम्ही गाडीवर किंवा चालत फिरणार असाल तर गॉगल लावायला विसरु नका, त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे संरक्षण व्हायला मदत होईल.
२. पाण्याची बाटली
उन्हामुळे आपल्याला सतत तहान तहान होते. इतकेच नाही तर अनेकदा उन्हामुळे डोळ्यापुढे अंधारी येणे, चक्कर येणे अशा समस्याही उद्भवू शकतात. अशावेळी पाणी विकत घेण्यापेक्षा आपल्या बॅगमध्ये पाणी असलेले केव्हाही चांगले. उन्हाळ्यात तहान लागली की आपण सरळ रस्त्यावरचे लिंबू सरबत किंवा फ्रूट ज्यूस पितो. पण यामध्ये वापरलेले पाणी कुठले असते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे पोटाचे किंवा इतर आजार होण्याची शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला पाण्याची जास्त गरज असल्याने घराबाहेर पडताना न विसरता पाण्याची बाटली आवर्जून घ्यायला हवी.
३. वेट वाईप्स
उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्याला सतत घाम येतो. घामामुळे चिकचिक होणे, चेहऱ्यावर मानेवर खाज आल्यासारखे होणे, मेकअप पसरणे अशा अनेक गोष्टी होतात. अशावेळी आपल्याजवळ वेट वाईप्स असतील तर त्याचा चांगला उपयोग होतो. या वाईप्सनी घाम पटकन टिपता येत असल्याने आपला अवतार होत नाही. तसेच आपण ज्याठिकाणी आहोत त्याठिकाणी तोंड धुण्यासाठी पाणी उपलब्ध असेलच असे नाही. अशावेळी आपल्याला एखाद्या मिटींगसाठी बसायचे असेल किंवा काही कारणाने प्रेझेंटेबल राहायचे असेल तर आपला चेहरा चांगला असणे आवश्यक असते. अशावेळी वेट वाईप्स अतिशय उपयुक्त ठरतात. याने आपण चेहरा, मान, हात सगळे स्वच्छ पुसू शकतो.
४. परफ्यूम किंवा अत्तर
आपल्याला एरवीच घाम येतो, पण उन्हाळ्यात तर घामाचे प्रमाण जास्त वाढते. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी किंवा समुद्रकिनारा असलेल्या ठिकाणी तर घरातून आंघोळ करुन बाहेर पडलो तरी घामाने परत आंघोळ होते. घाम म्हणजे आपल्या शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडतात. काहींना इतका जास्त घाम येतो की ठराविक वेळाने या घामाचा वास यायला लागतो. घामाच्या वासामुळे आपल्या आजुबाजूच्यांना त्रास होऊ शकतो. अशावेळी आपल्या बॅगमध्ये परफ्यूम, डिओड्रंट, अत्तर यांसारख्या गोष्टी आवर्जून असायला हव्यात. जेणेकरुन घामाचा आपल्याला आणि इतरांना त्रास होणार नाही आणि आपल्यालाही फ्रेश वाटेल.