उन्हाळा म्हटला की शरीराची लाहीलाही होत राहते. उन्हामुळे सतत पाणी नाहीतर गार काहीतरी प्यावसं वाटतं. काही प्यायलं की पोट इतकं डब्ब होतं की पुन्हा काहीच खावसं वाटत नाही. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीर लवकर थकते आणि त्यामुळे शरीराला भरपूर एनर्जीची आवश्यकता असते. ही एनर्जी द्रव पदार्थ, थंड पदार्थ, आंब्यासारखे एनर्जी देणारे फळ, कलिंगड, खरबूज, काकडी यांसारखी पाणीदार फळे यांतून मिळू शकते. त्यात दिवस मोठा असल्याने आणि मुलांना सुट्ट्या असल्याने त्यांना सतत काहीतरी तोंडात घालायला लागते. अशावेळी मुलांना काय खायला द्यायचे असा प्रश्न तमाम आई वर्गाला पडतो. उन्हाळ्यात जेवण नको वाटत असेल आणि शरीराचे पोषण व्हावे यासाठी आहाराबाबतच्या काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात (Summer Special Diet Tips)...
१. ऊन पडायच्या आधी पोटभर खाऊन घ्यायचे
सकाळी उठल्या उठल्या पोटभर नाष्ता करावा. यामध्ये एखाद्या फळाचा समावेश असेल असे आवर्जून पाहा. सकाळी एकदा पोट व्यवस्थित भरलेले असले की दुपारी भर उन्हाच्या वेळी थोडे कमी खाल्ले तरी चालते. दुपारी उन्हामुळे सतत पाणी प्यायले जात असल्याने जेवण कमी जाते. मात्र सकाळी उठल्यावर नीट प्रोटीनयुक्त पोटभर नाश्ता केलेला असला की टेन्शन राहत नाही.
२. पाणीदार पदार्थांचा समावेश वाढवा
जेवण कमी जात असल्यास काकडी, टोमॅटो यांसारखे पाणीदार सॅलेड, कलिंगड, खरबूज, संत्री अशी पाणीदार फळे यांचा आहारात समावेश वाढवावा. लिंबू सरबत, ताक, शहाळं पाणी यांचाही आहारात समावेश करु शकतो. पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांमुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते. यामुळे उष्णता, डिहायड्रेशन यांसारखे त्रास होत नाहीत.
३. थंडगार आणि एनर्जी देणारे पदार्थ
मिल्कशेक, लस्सी, फालुदा असे दुधाचे पदार्थ आणि दहीभात, दही पोहे असे पदार्थ खाल्ल्यास पोषणही मिळते आणि गार खाल्ल्याचा आनंदही मिळतो. तसेच कोरडी पोळी-भाजी जात नसेल तर साखरांबा,कैरीचे लोणचे, तळण यांचा आहारात समावेश करावा जेणेकरुन जेवण जायला मदत होते.