उन्हाळा म्हटलं की अंगाची लाहीलाही होते आणि उन्हामुळे गळून गेल्यासारखे होते. कधी एकदा अंगावर गार पाणी घेतो आणि फॅनखाली जाऊन बसतो असे होऊन जाते. मग सतत काहीतरी गार खायची इच्छा होते आणि उन्हामुळे मरगळ किंवा ग्लानी आल्यासारखे होते (Summer Special). पण उन्हाळ्यातही आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. दिवसभर वेगवेगळी कामं करताना आपण पार थकून जातो. पण दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश राहायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये काय आणि कसा बदल करायला हवा याविषयी...
१. आहार
आहार ही आपल्या आरोग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असून आपला आहार उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. तसेच फळे, भाज्या, डाळी, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ या सगळ्या गोष्टी आहारात योग्य प्रमाणात असायला हव्यात. म्हणजे तब्येत तर चांगली राहतेच पण आपली प्रतिकारशक्तीही चांगली राहते.
२. झोप
उन्हाळ्यात शरीराची लाहीलाही होत असल्याने रात्री लवकर झोप येत नाही. सकाळीही लवकर ऊन पडत असल्याने लवकर जाग येते. असे असले तरी आपण शक्यतो रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठायचा प्रयत्न करायला हवा. दररोज किमान ७ ते ८ तासांची झोप होणे अतिशय आवश्यक असते. तशी झोप झाली तरच आपली तब्येत ठणठणीत राहण्यास मदत होते.
३. व्यायाम
उन्हाळ्यात आधीच घामाघूम व्हायला होते, त्यात व्यायाम केला तर आणखी घाम येतो. असे असले तरी कोणत्याही ऋतूमध्ये तब्येत चांगली ठेवायची असेल तर व्यायाम आवर्जून करायलाच हवा. चालणे, स्ट्रेचिंग, योगा यांसारखा किमान अर्धा तासांचा व्यायाम न चुकता केल्यास प्रकृती चांगले राहण्यास मदत होते. व्यायामामुळे प्रतिकारशक्ती चांगली होऊन सतत आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते.
४. शरीर हायड्रेट ठेवणे
उन्हाळ्यात हवेतील तापमान वाढल्यामुळे शरीर या तापमानाशी जुळवून घेत असते. त्यामुळे आपल्याला सतत खूप घाम येतो. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशावेळी सतत भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याबरोबरच सरबत, शहाळ्याचं पाणी, ताक, उसाचा रस, फळांचे ज्यूस असे द्रव पदार्थ आहारात घ्यायला हवेत. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहून तब्येत चांगली राहण्यास मदत होईल.