उन्हाळ्याच्या दिवसांत आपली भूक मंदावते, खायची इच्छा कमी होते. पण ताकद टिकवून ठेवायची असेल तर हलका, पोषक आहार, पुरेसे शक्तिवर्धक आणि क्षारयुक्त पदार्थ, पेयं आवर्जून घ्यायला हवीत. अन्न जात नाही म्हणून या काळात उपाशी राहिलं किंवा खाणं पिणं खूप कमी केलं तर उन्हाळ्यामुळे थकवा येऊन, चक्कर येऊ शकते. डीहायड्रेशन होऊन उष्माघाताची शक्यताही वाढते. प्यायच्या पाण्याची शरीराला कायमच गरज असते. उन्हाळ्यात शरीरातून उष्णता बाहेर टाकण्यासाठी, बाष्पीभवनाने म्हणजेच घामावाटे पाणी बाहेर टाकले जाते. त्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. सकाळी उठल्यावर दिड दोन ग्लास आणि नंतर दर एक तासाने किमान दीड ते दोन ग्लास पाणी प्यावं. नंतर गरजेनुसार कमी जास्त प्रमाण ठेवावं. त्यामुळे अन्न जात नसेल तर उन्हाळ्यात घेता येतील असे द्रव पदार्थ कोणते ते पाहूया. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुकेशा सातवळेकर यांनी हे पदार्थ सांगितले असून उन्हाळ्यात शरीरातील ताकद टिकवून ठेवण्यासाठी आपण त्यांचा आहारात नक्की समावेश करु शकता.
१. पातळ ताक - सैंधव मीठ आणि जीरपूडयुक्त ताकामुळे पचनशक्ती वाढेल आणि उन्हाळ्यापासून बचावही होईल.
२. बार्ली वॉटर - यामध्ये लिंबाचा किंवा आंबट फळांचा रस, मीठ, साखर घालून घ्या. तहान तर भागेल आणि लघवीही साफ होईल.
३. सरबते - लिंबू, आवळ, कोकम यांसारख्या सरबतातून शरीराला व्हिटॅमिन सी आणि आवश्यक क्षार मिळतील. कोकम सरबत पित्तशामक असल्याने उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच हे सरबत घेऊ शकता. वाळा, गुलाब, मोगरा यांसारख्या सरबतानीही थंडावा मिळायला मदत होईल. सरबतात तुळशीचं बी / सब्जाचं बी घाला, त्यामुळे पोटाचं आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
४. कैरीचे पन्हे - कैरीच्या पन्ह्याने, उन्हामुळे थकलेल्या शरीराला तातडीने ऊर्जा मिळेल.
५. जलजीरा - तोंडाला चव येऊन, भूक आणि पचनशक्ती वाढेल.
६. नैसर्गिक पेये - शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, नीरा ही नैसर्गिक पेयं आवश्यक ऊर्जा देतात आणि शरीराला आवश्यक असलेली सॉल्टस पुरवतात.
७. फळांचे रस - संत्र, मोसंबी, द्राक्ष, कलिंगड, खरबूज, अननस, डाळिंब, जांभूळ असे फळांचे रस म्हणजे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिनाच. त्यामुळे आहारात आवर्जून या फळांचा समावेश करा.
८. स्मूदी - भाज्या आणि फळांचा वापर करुन दही वापरून घरच्या घरी आपण स्मूदी बवनू शकतो. यामुळे अन्न जात नसेल तरी शरीराचे पोषण होण्यास मदत होईल.
९. लस्सी, मिल्क शेक्स - यांमुळे थंडाव्याबरोबरच आवश्यक कार्यशक्ती, प्रोटीन, कॅल्शियम मिळेल
१०. आंबील - नाचणी किंवा ज्वारी पिठाची ताकातली आंबील सकाळी किंवा संध्याकाळी घेतली की थंडावा मिळेल आणि भूकही भागेल.
११. सत्तू - हे पीठ गहू, हरभरा डाळ आणि बार्ली पासून बनवतात. यात लिंबाचा रस, जिरेपूड, सैंधव मीठ घालून सरबत बनवून घेतलं तर तहान कमी होऊन उन्हाळ्याचा त्रास कमी होईल.
१२. थंडाई - खरबूजाच्या बिया, बदाम, खसखस, बडीशेप, तुळशीचं बी, गुलाबाच्या पाकळ्या, थोडं मिरं वाटून, दुधात घालून थंडाई बनते. उन्हाळ्यात ही जरूर घ्यावी. पचनशक्ती वाढून, पोटाला आधार मिळतो, थंडावा मिळतो.
हे लक्षात ठेवा
घराबाहेर सरबत, उसाचा रस, ताक पिताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. उन्हाळ्यात पेये आणि पदार्थ लवकर खराब होतात. बरेचदा दुकानदार खराब रस चांगल्यामध्ये मिसळून विकतात, त्यामुळे आपल्या पोटाला त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळी काळजी घ्यायला हवी. तसंच ही सरबते तयार करण्यासाठी कोणतं पाणी आणि बर्फ वापरलाय ते तपासायला हवा. अति थंड / बर्फ घातलेल्या पेयांमुळे तात्पुरतं बरं वाटतं पण पचनक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. दातांच्या मुळांना इजा होते, घशाचे विकार बळावतात. याबरोबरच आईस्क्रीमही वरचेवर खाणे चांगले नाही. कारण त्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आणि ट्रान्सफॅट्स असतात. याशिवाय कोल्ड्रिक्समध्ये हानिकारक स्ट्रॉंग असिड्स, प्रिझर्व्हेटीव्हज, आर्टिफिशियल स्वाद, रंग, इसेन्स असतो. याबरोबरच यातील कॅफिनमुळे शरीरातील आवश्यक सॉल्टस आणि मिनरल्सची हानी होते. त्यामुळे कोल्ड्रींक्स न घेतलेलीच केव्हाही चांगली.