Join us   

Summer Special : उन्हामुळे डोळे चुरचुरतात, लाल होतात, आगही फार होते? उन्हाळ्यात डोळ्यांना जपायचे तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 3:13 PM

Summer Special : उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी सांगत आहेत नेत्रतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे...

ठळक मुद्दे डोळ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चांगल्या प्रतीचा गॉगल घालून उन्हात जाणे आवश्यक आहे. डोळ्यांची उघड़झाप करणे, डोळे पाण्याने धुणे असे उपाय करावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळू शकतो. 

उन्हाळ्याच्या दिवसांत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने आपल्याला डोळ्यांशी निगडीत समस्या निर्माण होतात. डोळे हे आपले दैनंदिन कामकाज सुरळीत चालण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असल्याने एकदा डोळ्यांना काही झाले तर आपल्या हालचालींवरच नियंत्रण येते. परंतु योग्य ती काळजी घेतल्यास उन्हाळ्यातही आपण डोळ्यांना चांगले ठेवू शकतो. डोळे येणे, डोळे लाल होणे, चुरचुरणे, डोळ्यांची आग होणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या तुम्हालाही उद्भवत असतील तर उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यायची याविषयी सांगत आहेत नेत्रतज्ज्ञ डॉ. ऐश्वर्या मुळे...

(Image : Google)

१. हल्ली बऱ्याच ऑफीसेसमध्ये नियमितपणे एसी लावलेला असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत तर बाहेरचे तापमान कमी असल्याने एसीचे तापमान फारच कमी केले जाते. त्यामुळे आपल्याला गारवा वाटत असला तरी आपल्या आजुबाजूची हवा कोरडी होते आणि त्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येऊ शकतो. उन्हामुळे ज्याप्रमाणे डोळे कोरडे होतात तसेच सतत एसीमध्ये बसल्यानेही डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यामुळे याबाबत काळजी घ्यायला हवी. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने आय ड्रॉप्सचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा होतो.

२. उन्हाळ्याच्या दिवसांत एकूणच हवेतील तापमानामुळे शरीर आणि डोळेही कोरडे पडतात. त्यासाठी जास्तीत जास्त पाणी पिणे, पाणीदार फळे खाणे, सरबत, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा होऊ नये म्हणून आहाराकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे. 

३. आपण सतत उन्हात असलो किंवा सतत स्क्रिनवर काम असले तर ठराविक वेळाने डोळ्यांचे व्यायाम करणे, डोळ्यांची उघड़झाप करणे, डोळे पाण्याने धुणे असे उपाय करावेत. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळू शकतो. 

४. याबरोबरच डोळ्यांवर गार पाण्याच्या पट्ट्या, दुधाच्या पट्ट्या ठेवणे, गुलाबपाण्याच्या पट्ट्या ठेवणे असे उपायही करु शकतो. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्यानेही डोळ्यांना थंडावा मिळू शकतो. तसेच कोरफडीच्या जेलचे आय मास्क हल्ली बाजारात मिळतात हे आय मास्क घातले तरी डोळ्यांना आराम मिळू शकतो. 

(Image : Google)

५. डोळ्यांचा कोरडेपणा, खाज किंवा चुरचुरणे यांसाठी ल्यूब्रिकेटींग आय ड्रॉप्स मिळतात. या ड्रॉप्सचा डॉक्टरांच्या सल्ल्याने वापर केल्यास डोळ्यांच्या समस्या काही प्रमाणात दूर होऊ शकतात. 

६. त्वचा काळवंडू नये म्हणून आपण उन्हाळ्यात सनस्क्रीन लोशन लावतो. डोक्याला ऊन लागू नये किंवा केस खराब होऊ नयेत म्हणून आपण स्कार्फ वापरतो त्याचप्रमाणे डोळ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चांगल्या प्रतीचा गॉगल घालून उन्हात जाणे आवश्यक आहे. 

७. उन्हाळ्याच्या काळात डोळे येणे, डोळ्यांतून घाण येणे, डोळे चिकटणे, रांजणवाडी येणे अशा समस्या साधारणपणे दिसून येतात. अशावेळी घरच्या घरी उपाय न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे केव्हाही अधिक फायद्याचे असते. त्यामुळे लवकरात लवकर उपचार होऊन त्रास कमी होण्यास मदत होते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलडोळ्यांची निगा