पावसाळी किंवा थंड हवा असेल तर हाडांचे दुखणे डोके वर काढते. वय झालेल्या व्यक्ती, ज्यांना संधीवात, आमवात आहे असे किंवा बाळंत स्त्रियांना हा त्रास जास्त प्रमाणात उद्भवतो. हाडांसाठी कॅल्शियम हा अतिशय उपयुक्त घटक असून त्याची कमतरता असेल तर हाडं दुखण्याची समस्या उद्भवते. कॅल्शियम मिळण्याचा उत्तम स्त्रोत हा आहार हाच असतो. त्यामुळे शरीराला जास्तीत जास्त कॅल्शियम मिळावे यासाठी कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेल्या घटकांचा आहारात समावेश करायला हवा. तसेच शरीरात व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए आणि मॅग्नेशियम योग्य प्रमाणात असेल तर हा कॅल्शियम हाडात शोषला जाण्यास मदत होते (Superfoods for strong bones).
आता आहारात असे कोणते घटक घ्यायला हवेत की ज्यामुळे आपली कॅल्शियमची कमतरता भरुन निघायला मदत होईल. हाडांचे आरोग्य चांगले नसेल तर मुडदूस, ऑस्टीओपोरॅसिस तसेच हाडे मोडण्याच्या समस्या वाढण्याची शक्यता असते.मांसाहारात आणि दुधात जास्त कॅल्शियम असते असे आपल्याला वारंवार सांगितले जाते. त्यामुळे आपण त्याच पद्धतीचा आहार घेतो. पण शाकाहारी पदार्थांमधूनही आपल्याला चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळू शकतो. हे पदार्थ कोणते ते पाहूया...
१. पालेभाज्या
गडद रंगाच्या हिरव्या पालेभाज्या कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असतात. यामध्ये केल, पालक, साग यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन के, विविध खनिजे यांचा समावेश असतो. तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंटसही असतात ज्यामुळे सूज कमी होण्यास मदत होते. यामुळे हाडांची झीज होण्यापासून बचत होते.
२. टोफू
पनीरसारखे असणारे टोफू हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत असते. यात प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि खनिजे असतात. या सगळ्या घटकांमुळे हाडांना ताकद मिळण्यास मदत होते.
३. तीळ
तीळ हा आपल्या भारतीय आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तीळाची चटणी, तीळाचा कूट, तीळाची पोळी, लाडू असे आपली आजी-आई आपल्याला आवर्जून खायला सांगतात. त्यामुळे आहारात तीळाचा अवश्य समावेश असायला हवा.
४. क्विनोआ
क्विनोआ हे एकप्रकारचे तृणधान्य असून त्यामध्ये ९ प्रकारची अतिशय महत्त्वाची अमिनो अॅसिड असतात. याशिवाय त्यामध्ये मॅग्नेशियम, मँगनिज असे महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे हाडे मजबूत राहण्यास मदत होते. शाकाहारी लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे.