Join us   

खूप घाम, शरीराला दुर्गंधी येते का? ही लक्षणं कोणती, आजार तर नाही? उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2022 4:45 PM

शरीराला घामाची दुर्गंधी येते म्हणून स्वत:ला कमी लेखण्यापेक्षा गंभीरपणे त्यावर उपाय करायला हवे.

ठळक मुद्दे सिनेमात तेरी खुशबू वगैरे म्हणत असले तरी ते काही तितकंसं खरं नाही.

काही माणसांच्या अंगाला उग्र गंध येतो. अगदी महिला, लहान मुलं आणि पुरुष कुणीच त्याला अपवाद नाही. सिनेमात तेरी खुशबू वगैरे म्हणत असले तरी ते काही तितकंसं खरं नाही. कारण  प्रत्येकाच्याच घामाला उग्र गंध असतो आणि अनेकदा त्यातून दुर्गंधीही येते. लोकल ट्रेनने, बसने प्रवास करत असाल आणि कुणी हात वर केला तरी किंवा जास्त जवळ आले तरी ती दुर्गंधी जाणवते. कितीही परफ्यूम मारले,तरी हा गंध लपत नाही. घाम येणं ही काही फार भयंकर गोष्ट नाही मात्र शरीराची दुर्गंधी टाळायची असेल तर काही गोष्टी करायला हव्या.  जास्त घाम येणं, दुर्गंधी येणं याची अनेक कारणं आहे. काही आजार असतील तरी शरीराचा गंध बदलतो. त्यामुळे केवळ वरवर उपचार न करता आपल्या शरीराकडे लक्ष द्या.

(Image : Google)

शरीराची दुर्गंधी टाळायची असेल तर..

१. स्वच्छ राहा. भारतीय उष्ण वातावरणात ज्यांना जास्त घाम येतो त्यांनी दोनदार आंघोळ केली तरी चालते. डॉक्टरांच्या सल्ल्याने ॲण्टीबॅक्टिरिअल साबण वापरावा. २.अंग नीट पुसावे, काहीजण ओल्या अंगावरच परफ्यूम मारतात. डिओ फवारतात, ते त्वचेसाठीही चांगले नाही आणि त्यानं शरीराची दुर्गंधीही कमी होत नाही. ३. डिओ, परफ्यूम खूप मारले म्हणजे दुर्गंधी कमी होत नाही. आपल्याला घाम नेमका का येतो, कुठे येतो हे समजून डॉक्टरांना विचारुन योग्य प्रकार वापरला पाहिजे. काहींना डिओचीही रॅश येते त्यामुळे अनावश्यक मारा थांबवा. ४. आहारात अतीमसालेदार, कांदालसूण, चहाकॉफी जास्त, ऊग्र मसाले असे काही असेल तरी दुर्गंधी येते. पण कुणाच्या शरीराला कशाचे वावडे हे सरसकट सांगता येत नाही. त्यामुळे इथंही त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक. खूप पाणी प्यावे म्हणजे दुर्गंध कमी होतो असेही काही नाही. तज्ज्ञ सल्लाच आवश्यक, भलभलते उपाय योग्य नाही. ५. पाय स्वच्छ धुवा. अनेकजण मोजे घाणेरडे घालतात. पायांना खूप घाम येतो त्यामुळेही घाम आणि दुर्गंधी वाढते.

टॅग्स : आरोग्य