थंडीचा सिझन म्हटला की भाज्या आणि फळांची सरबराई. बाजारात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या भाज्या, कंदमुळे म्हणजे आरोग्यासाठी वरदानच. थंडीच्या दिवसांत कडकडून लागणारी भूक, शरीराला असणारी ऊर्जेची गरज आणि ताटात असणारे एकाहून एक मस्त गरमागरम पदार्थ यांची मजा काही औरच. थंडीच्या दिवसांत उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा आपण आरोग्यासाठी फायदा करुन घ्यायला हवा. या काळात आपला आहार संतुलित आणि पौष्टीक असावा यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. आपण ज्या भागात राहतो, त्या भागात पिकणाऱ्या स्थानिक गोष्टी आपल्या आहारात आवर्जून असायला हव्यात. रताळे हे त्यापैकीच एक कंदमूळ. रताळे फक्त उपवासाला खातात असा आपला समज असतो, पण असे नसून एरवीही तुम्ही रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ खाऊ शकता. यामध्ये रताळ्याची भाजी, रताळ्याचा कीस, गूळ आणि तूपातील रताळ्याच्या गोड फोडी, रताळ्याची खीर असे अनेक पदार्थ करता येतात. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यांनी रताळ्याचे फायदे सांगत आहारात त्याचा समावेश का असायला हवा याबाबत नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. रताळ्यातील गुणधर्म आणि शरीराला त्याची असणारी आवश्यकता समजून घ्यायला त्यांची ही एक पोस्ट पुरेशी आहे.
रताळ्याचे फायदे
१. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने जे लोक लठ्ठपणा, पीसीओडी, डायबिटीस यांसारख्या समस्यांचा सामना करतात त्यांच्यासाठी रताळ्याचा आहारात समावेश करणे अतिशय चांगले आहे.
२. तुम्ही सकाळी व्यायाम करत असाल तर त्यानंतर ब्रेकफास्ट म्हणूनही तुम्ही रताळे खाऊ शकता. त्यामुळे तुमची खर्च झालेली ऊर्जा भरुन येण्यास मदत होते.
३. यामध्ये असणाऱ्या लोह, फॉलेट, तांबे, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए यांमुळे विविध प्रकारच्या इन्फेक्शन्सपासून तुम्ही दूर राहू शकता. सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले असताना त्याच्याशी सामना करण्यासाठी आहारात रताळ्याचा समावेश असणे फायदेशीर ठरते. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करणारे रताळे आहारात असायला हवे.
४. तसेच रताळ्यामुळे थंडीमुळे रुक्ष झालेल्या त्वचेचा पोत चांगला होण्यासही मदत होते. वयानुसार त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्यांपासून तुम्ही काही काळ दूर राहू शकता. त्यामुळे तुम्ही तरुण दिसण्यास मदत होते.
५. रताळे कंदमूळ असल्याने त्यामध्ये खनिजांचे प्रमाण जास्त असते. ही खनिजे आणि व्हिटॅमिन बी यामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते.
६. डायबिटीस असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास सांगितले जाते. त्यांच्यासाठी रताळे हा उत्तम उपाय असू शकतो.
७. शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी रताळे अतिशय उपयुक्त असते. शरीरातील नको असणारे घटक बाहेर टाकण्यासाठी रताळ्यात आवश्यक ते घटक असतात.
८. रताळ्यातील व्हिटॅमिन डी हृदय, दात आणि हाडांसाठी फायदेशीर असते. तसेच ज्यांना थायरॉईडची समस्या आहे त्यांच्यासाठीही रताळे अतिशय चांगले.
९. महिलांना विशेषत: गर्भवती महिलांना फोलिक अॅसिडची आवश्यकता असते. रताळ्यामध्ये हा घटक पुरेशा प्रमाणात असल्याने ही गरज भागवली जाऊ शकते.
१०. रताळ्यातील पोषक घटक फुफ्फुसांचे कार्य सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे श्वसनाशी संबधित कोणतेही विकार झाले असल्यास किंवा फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा येत असल्यास रताळी खाण्यास सुरुवात करावी.