Join us

असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्याने होणारा 'सिफिलिस' नावाचा आजार कधीच बरा होत नाही? मग उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2023 13:32 IST

Syphilis sexual infection : सिफिलिस म्हणजेच उपदंश, त्याला आजारांचा राजा, म्हणतात तो नक्की कशानं होतो?

डॉ. दाक्षायणी पंडित 

टीबी(क्षयरोग) साठी त्वचेत इंजेक्शन देऊन चाचणी व उपदंशाची रक्तचाचणी करण्यासाठी एक २७ वर्षांचा तरुण आमच्या प्रयोगशाळेत आला. प्रयोगशाळा तंत्रज्ञाने त्याला माझ्याकडे आणून मला विचारलं, “ मॅडम, याच्या हातावर इंजेक्शन द्यायला जागाच नाहीये.” मी त्या तरुणाचे हात पाहिले आणि नंतर त्याच्याकडे. त्याच्या अंगावर (हात आणि चेहरा) एक विशिष्ट प्रकारचं पुरळ होतं. मी काही विचारायच्या आधी तोच म्हणाला, “डॉक्टर, मला एचआयव्ही आणि सिफिलिस आहे.” त्याने षटकारच मारला. डॉक्टरांना त्याला टीबी असल्याचीही शंका होती. माझ्या सांगण्यानुसार तंत्रज्ञाने उपदंश चाचणीसाठी रक्त घेतले व टीबीचीही चाचणी केली. दोन्ही चाचण्या सकारात्मक आल्या. एचआयव्हीचा सकारात्मक अहवाल त्याच्याकडे होताच. 

आजाराचं नाव – उपदंश / सिफिलिस (Syphilis). याला पूर्वी ‘आजारांचा राजा’ व ‘राजांचा आजार’ असे म्हणत.

रोगकारक जंतू – ट्रिपोनिमा पॅलिडम नावाचे जिवाणू, सर्पिल किंवा स्प्रिंगसारखे. अनेकांशी लैंगिक संबंध, लैंगिक स्वैराचार, देहविक्रय करणाऱ्या व्यक्तींशी संबंध, साहस/कुतूहल म्हणून किशोरांचे लैंगिक व्यावसायिकांकडे जाणे इ. मुळे हा आजार होतो. पुढे तो त्यांच्या लैंगिक भागीदारास होतो. अशा प्रकारे उपदंश पसरत राहतो. पेनिसिलीनच्या शोधाआधी उपदंशाचे प्रमाण खूपच जास्त होते. पेनिसिलीन त्यावर जालिम उपाय ठरले आणि प्रमाण खूप घटले. एड्सच्या जागतिक साथीसोबत उपदंश पुन्हा वाढला. 

लक्षणे – याच्या तीन अवस्था असतात. 

पहिल्या अवस्थेत जंतू शरीरात शिरून स्त्रियांच्या योनिमार्गाच्या मुखावर किंवा योनीमार्गात एक व्रण तयार होतो. तो वेदनारहित असल्याने . रुग्ण डॉक्टरांकडे जात नाही. ३० ते ४० दिवसात व्रण भरून येतो. अन्यथा व्रणातील जंतू रक्तात शिरून शरीरभर पसरतात. 

(Image : Google)

दुसरी अवस्था - रक्तातील जंतूंमुळे त्याविरुद्ध प्रतिपिंडे तयार होतात पण प्रतिपिंडांमुळे रोग बरा होत नाही. जंतू रक्ताद्वारा सर्व अवयवात शिरून वाढत राहतात. रुग्णाच्या त्वचेवर तांबुस लाल रंगाचे चपटे पुरळ येते व आपोआप जाते. 

तिसरी अवस्था – उपचारांअभावी जंतू अधिकाधिक वाढून तेथील पेशींचा घाऊक प्रमाणात नाश करतात. यामुळे त्या अवयवाचे (मेंदू, हाडे, यकृत, प्लिहा, गर्भाशय इ.) काम बिघडून लक्षणे दिसू लागतात. 

उपदंशबाधित महिला गर्भवती झाल्यास जंतू आईच्या रक्तातून बाळाकडे जातात व बाळाला बाधा होते. बाळाला बाधा गर्भारपणात केव्हा झाली त्यावर बाळावरचे परिणाम अवलंबून असतात: पहिली तिमाही -गर्भपात; दुसरी तिमाही-मृत किंवा व्यंग असलेल्या बाळाचा जन्म; तिसरी तिमाही- लक्षणरहित पण संसर्गाच्या दुसऱ्या अवस्थेतील बाळाचा जन्म.  

निदान- लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटावे. डॉक्टर प्रथम तुम्ही जोखमीचे वर्तन करता का हे जाणून घेतात. निदान-चाचण्या रोगाच्या अवस्थेप्रमाणे ठरतात. पहिल्या अवस्थेत व्रणातील द्रव सूक्ष्मदर्शकाखाली बघून जंतू शोधतात. दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत रक्तद्रवातील जंतूंविरुद्धची प्रतिपिंडे मोजतात.

उपचार – सर्व परिस्थितीत प्रतिजैविके हेच अतिशय प्रभावी व महत्वाचे उपचार. पहिल्या वा दुसऱ्या अवस्थेत उपचारांनी रुग्ण बरा होतो. तिसऱ्या अवस्थेत उपचारांनी रोगाची वाढ थांबते पण रोगामुळे आधीच झालेली हानी भरून येत नाही. प्रसूतीपूर्व तपासणी झालेली नसल्यास प्रसूतीच्या वेळी उपदंशाची चाचणी करून ती सकारात्मक असल्यास बाळाचीही चाचणी करतात. जन्मत:च बाधित बाळाचीही चाचणी करावी लागते. रुग्णासोबत लैंगिक सहकाऱ्यावरही उपचार करणे आवश्यक. अन्यथा टेनिसच्या चेंडूप्रमाणे उपदंश एकाकडून दुसऱ्याकडे असा फिरत राहतो. बरे झाल्यावर लैंगिक स्वैराचार चालू राहिल्यास संसर्ग पुन्हा होऊच शकतो. 

प्रतिबंध- जोखमीच्या वर्तनापासून दूर राहणे, शंका आल्यास किंवा लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार घेणे, यामुळे संसर्ग बरा करता येतो. त्वरित उपचार घेण्याने पुढची गुंतागुंत व भविष्यात तुमच्या बाळाचा संसर्ग तुम्ही टाळू शकता.  उपदंशावर वर लस उपलब्ध नाही.

(लोखिका एम बी बी एस, एम डी. असून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथील सूक्ष्मजीवशास्त्र विभाग व चिकित्सा प्रयोगशाळेच्या प्रमुख निवृत्त प्राध्यापिका आहेत. )

टॅग्स : आरोग्यलैंगिक आरोग्यहेल्थ टिप्ससंसर्गजन्य रोग