आपण आरोग्याची काळजी घेण्याबाबत अनेकदा बोलतो. यामध्ये प्रत्येक अवयवाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी काय करायचे याची माहिती घेतो. पण अतिशय महत्त्वाच्या असलेल्या प्रायव्हेट पार्टबाबत मात्र आपण बोलणे टाळतो. बापरे त्या विषयावर कसे बोलणार किंवा तो काय चर्चा करायचा विषय आहे का असे म्हणत या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. पण योनी मार्गाची स्वच्छता ठेवणे सर्वात जास्त महत्त्वाचे असून तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ते गरजेचे असते. महिलांच्या बाबतीत मासिक पाळी, अंगावरुन पांढरे जाणे, योनी मार्गावरील केस अशा अनेक गोष्टींचा या अवयवाशी संबंध असतो. तसेच अंतर्वस्त्रांची निवड, याठिकाणी असलेले केस काढण्याची योग्य पद्धत याविषयी कधीच खुलेपणाने बोलले जात नाही. पण या विषयात योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. पाहूयात योनी मार्गाची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात याविषयी...
१. अशी करा अंतर्वस्त्रांची निवड - पँटीज खरेदी करताना त्याच्या कापडाबाबत आपण जागरुक असले पाहीजे. उगाचच फॅशन म्हणून सॅटीन किंवा इतर कोणत्या कापडांच्या पँटीज घेणे योनी मार्गाच्या आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. पँटीज कायम कॉटनच्या कापडाच्या आणि कम्फर्टेबल असायला हव्यात. कॉटनमुळे या भागाला योग्य पद्धतीने श्वास घेता येऊ शकतो. पुरेशी हवा न मिळाल्यास याठिकाणी बॅक्टेरीयल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे आतले कपडे खरेदी करताना कापड आणि साईजबाबत काळजी घ्यायला हवी. पँटीज खूप घट्ट असल्या तरीही या भागाला पुरेशी हवा मिळत नाही आणि त्वचेचे किंवा इतर इन्फेक्शन होऊ शकतात.
२. केस कसे काढायचे - खालच्या भागात असलेले केस काढणे हा एक महत्त्वाचा विषय आहे, पण यावरी योग्य पद्धतीचे मार्गदर्शन दिले जात नाही. तर हे केस ट्रीम करणे हा सर्वात चांगला उपाय आहे. त्यामुळे तुमच्या स्कीनला कोणत्याही प्रकारचे इरिटेशन होत नाही. तसेच शेव्हींग आणि व्हॅक्सिंग हे खालचे केस काढण्याचे आणखी दोन उपाय आहेत. पण या दोन्ही प्रकारांमुळे त्वचेला इरिटेशन होऊ शकते. शेव्हिंग करताना तुम्ही केसांच्या वाढीच्या दिशेने करत आहात याची खात्री करा. याठिकाणची स्कीन अतिशय नाजूक असते, अशावेळी तुम्ही तिथे व्हॅक्सिंग केल्यास तुम्हाला आग, जळजळ होऊ शकते. भविष्यातही व्हॅक्सिंग करण्याचे काही विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन एखादवेळी व्हॅक्सिंग केले तर ठिक आहे पण नियमित व्हॅक्सिंग करणे आरोग्यासाठी चांगले नाही. आपण हात किंवा पायावरचे केस काढण्यासाठी काही वेळा बाजारात मिळणाऱ्या क्रिमचा वापर करतो. पण या क्रिममध्ये जास्त प्रमाणात केमिकल असल्याने व्हजायनावरील केस या क्रिमने काढणे धोक्याचे असते.
३. योनी मार्गाची स्वच्छता कशी राखाल - अनेक मुलींना किंवा महिलांना योनी मार्ग स्वच्छ कसा ठेवायचा असा प्रश्न असतो. तर व्हजायना ही तुम्ही स्वच्छ करण्याची विशेष आवश्यकता नसते. याठिकाणी असणारे चांगले बॅक्टेरीया आणि वाईट बॅक्टेरीया हा भाग स्वच्छ ठेवण्याचे काम करत असतात. तरीही तुम्ही हा भाग स्वच्छ करण्यासाठी साबण किंवा बॉडीवॉश वापरत असाल तर तो केवळ वरच्या भागाला लावावा. योनी मार्गाच्या आतल्या त्वचेशी या गोष्टींचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्या.
४. रंग उजळवण्यासाठी वापरली जाणारी साधने - आपल्या शरीराच्या इतर भागापेक्षा याठिकाणची त्वचा डार्क असते. सध्या बाजारात तुमचा हा भाग उजळवण्यासाठी हे घ्या, यामुळे दिसेल तुमचा प्रायव्हेट पार्ट अधिक उजळ अशी जाहिरातबाजी करुन काही उत्पादने विकली जातात. मात्र अशाप्रकारच्या जाहिरातींना भुलणे योग्य नाही. हा भाग डार्क असणे नैसर्गिक असल्याने त्यासाठी कोणतेही उपाय करण्याची आवश्यकता नाही.
५. या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या -
१. व्हाईट डिसचार्जचा रंग वेगळा असेल किंवा त्याला वेगळा वास येत असेल तर त्वरीत डॉक्टरांना दाखवा. २. मासिक पाळीच्या वेळी या भागाची स्वच्छता ठेवा. सॅनिटरी नॅपकीन जास्त काळ न वापरता दर काही वेळाने बदला. ३. सेक्सनंतर लघवीला जाऊन या, त्या भागाची त्वरित योग्य स्वच्छता करा.