सकाळी चहा पिल्याशिवाय सुरुवातच होत नाही, मला तर बेड टीच लागतो असं कौतुकाने सांगणारे अनेकजण वजन कमी होत नसल्याच्या किंवा वजन वाढल्याच्या तक्रारी करतानाही दिसतात. आपल्या या वजन वाढीचं कारण सकाळच्या गरमा गरम एक कप कडक चहात आहे असं सांगितलं तर विश्वास बसेल? पण तो बसायलाच हवा. कारण रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या दुष्परिणामांबाबत सखोल अभ्यास झाला आहे आणि या अभ्यासाचे निष्कर्ष रिकाम्या पोटी चहा पिल्यानं केवळ वजनच वाढतं असं नाही तर आरोग्याच्या इतर गंभीर समस्याही या सवयीमुळे निर्माण होतात असं सांगतात. पोषण तज्ज्ञ वरुण कत्याल म्हणतात की सकाळी रिकाम्या पोटी चहा पिल्यानं पोटात आम्लीय आणि क्षारीय घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो त्यामुळे चयापचय प्रक्रिया बिघडते. रिकाम्या पोटी चहा पिल्यानं चयापचय क्रिया विस्कळित होवून त्याचा परिणाम दिवसभर त्रास देतो. पण यासाठी आपण दुसर्याच गोष्टीला जबाबदार धरतो. आपल्या रिकाम्या पोटी चहा पिण्याच्या सवयीकडे लक्षच जात नाही. कारण या दुष्परिणामांबद्दल फारशी चर्चाच होत नाही.
छायाचित्र- गुगल
रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा..
1. पोषण तज्ज्ञ वरुण कत्याल म्हणतात की , ‘ टी रिसर्च असोसिएशन इन इंडिया’ द्वारे झालेला अभ्यास सांगतो की जेव्हा चहात आपण दूध घालतो तेव्हा दुधात वजन घटवणारे जे गुणधर्म असतात ते निष्प्रभ होतात. सोबतच दूध घातलेला चहा पोटातील आम्ल वाढवतो. हे आम्ल पचन क्रियेवर परिणाम करतो. दूध घातलेला चहा रिकाम्या पोटी पिल्यानं पोटातील आम्ल तर वाढतंच सोबत वजन वाढण्याचंही ते मुख्य कारण ठरतं.
2. सकाळी उठल्या उठल्या गरम आणि जास्त चहा पावडर घातलेला कडक चहा पिल्यानं पोटातल्या आतल्या भागात जखम होते. ही जखम वाढत वाढत पोटातील अल्सर होण्यालाही कारणीभूत ठरते.
3. रिकाम्या पोटी चहा पितो तेव्हा चहात विरघळलेली साखर शरीरात प्रवेश करते. ही साखर वजन वाढण्यास कारणीभूत ठरते.
4. आपल्या या सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याचा वाईट परिणाम आपल्या हाडांवर देखील होतो. चहा पिण्याची ही चुकीची सवय जर दीर्घकाळ तशीच ठेवली तर ‘ स्केलेटल फ्लोरोसिस’ हा हाडांचा गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. या आजारात हाडं आतून पोकळ बनतात.
छायाचित्र- गुगल
5. चहा पिल्यानं आळस जातो, ऊर्जा मिळते, काम करायला किक मिळते असं म्हटलं जातं पण वास्तव तर हे आहे की सकाळी रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा पिल्यास थकवा येतो, चिडचिड होते.
6. एक कप गरम आणि कडक दूध घातलेला चहा आपली पचन क्रिया पूर्णपणे बिघडवण्यास कारणीभूत ठरतो. यामुळे पोटात गॅस होतो आणि त्यामुळे पचन क्रिया मंद होते. रिकाम्या पोटी चहा पिल्यानं पित्त प्रक्रियेत अडथ्ळा येतो आणि पित्त वाढून उलटीसारखं होणे, अस्वस्थ वाटणे असे त्रासही होतात.
7. उत्साही आणि आनंदी वाटण्यासाठी सकाळी सकाळी चहा घेतला जातो पण होतं उलटच. रिकाम्या पोटी दूध घातलेला चहा घेतल्यानं शरीरात कॅफिनचं प्रमाण वाढतं. यामुळे झोप येत नाही . त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होऊन नैराश्य आणि तणाव यासारख्या समस्या निर्माण होतात.
8. रिकाम्या पोटी चहा घेतल्यानं चहामधील कॅफिन हा घटक रक्तात वेगानं मिसळतो. यामुळे रक्तदाब वाढून हदयाच्या आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम होतात.
(छायाचित्र- गुगल)
चहा प्यायचाच असेल तर..
सकाळी रिकाम्या पोटी दूध घातलेला कडक चहा घेतल्याचे एवढे दुष्परिणाम वाचूनही जर आपला सकाळी चहा पिण्याचा हट्ट असेलच तर तो किमान आरोग्यास त्रास होणार नाही असा तरी असावा. म्हणूनच चहा पिण्याच्या पध्दतीत थोडा बदल करावा. कधीही चहा एकदम गरम आणि एकदम थंड घेऊ नये. रिकाम्या पोटी चहा न घेत आधी पौष्टिक कपदार्थ खाऊन मग चहा घ्यावा. गव्हाची, नाचणीची बिस्किटं खाऊन त्यावर चहा घेतल्यास चहाच्या दुष्परिणामांचे धोके टाळता तरी येतील!