Join us   

रात्री उशीरा जेवण्याचे भयंकर दुष्परिणाम! ऍसिडिटी ते डिप्रेशन आजार करतील जीव नको..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 6:47 PM

तुम्हालाही रात्री जेवायला उशीर होत असेल तर ती सवय बदला म्हणजे तुमच्या आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतील.

ठळक मुद्दे रात्री आपण किती वाजता जेवतो याकडे आपण अनेकदा लक्ष देत नाही, पण द्यायला हवेउशीरा जेवण्याचे शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात, ते वेळीच समजून घ्यायला हवे

सध्या आपल्या सगळ्यांचीच लाइफस्टाइल इतकी बदलली आहे की त्याचा आपल्या आहार-विहारावर चुकीचा परिणाम होत असल्याचे दिसते. कधी ऑफीसचे काम लांबल्यामुळे तर कधी नाईट शिफ्टमुळे किंवा कधी आणखी काही कारणाने आपल्यातील अनेकांना रात्री जेवायला उशीर होतो. रात्री उशीरा जेवल्यामुळे शरीरातील कॅलरीज वाढतात आणि अनावश्यक फॅटस जमा व्हायला लागतात. त्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस यांसारख्या जीवनशैलीविषयक समस्या उद्भवतात. रात्री उशीरा खायची सवय लागल्याने अनेक जण रात्री हॉटेलमधून पदार्थ ऑर्डर करतात. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी लोक फास्ट फूड किंवा जंक फूड खाणे पसंत करतात. यामुळे शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. असे न करता घरचा सात्विक आणि हलका आहार रात्रीच्या जेवणात घेणे आवश्यक आहे. रात्री ७ ते ८ च्या दरम्यान जेवण करणे चांगले. त्यामुळे जेवण आणि झोप यांच्या मध्ये २ ते ३ तास जातात आणि अन्नपचन होऊन चांगली झोप लागते. त्यामुळे तुम्हालाही रात्री जेवायला उशीर होत असेल तर ती सवय बदला म्हणजे तुमच्या आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी दूर होतील.

(Image : Google)

पाहूयात रात्री उशीरा जेवल्याने शरीराला कोणकोणत्या तक्रारी भेडसावतात

१. रात्री उशीरा खाल्ल्याने खाल्लेले अन्न पचत नाही. त्यामुळे या अन्नाचे चरबीमध्ये रुपांतर होते आणि लठ्ठपणाची समस्या उद्भवते. त्यामुळे जे लोक रात्री खूप उशीरा जेवतात ते लठ्ठपणाचा सामना करत असतात. 

२. रात्री उशीरा खाणाऱ्यांमध्ये अॅसिडीटीची समस्या असल्याचे दिसते. खाल्लेले न पचल्यामुळेच अॅसिडीटीसारखे अपचनाचे त्रास उद्भवतात. 

३. छातीत जळजळ होणे, छातीत दुखणे यांसारख्या समस्या रात्री उशीरा जेवणाऱ्यांना भेडसावतात. गॅसेस होणे, अपचन, छातीत दुखणे असे त्यांचे स्वरुप असू शकते. 

(Image : Google)

४. रात्री उशीरा जेवल्यावर आपल्याला नीट झोप येत नाही. त्यामुळे आपली पुरेशी झोप पूर्ण होत नाही. जेवण आणि झोप यांच्यामध्ये पुरेसा वेळ गेल्यास आपल्याला नीट गाढ झोप लागण्यास मदत होते. 

५. रात्री उशीरा जेवणाऱ्यांमध्ये मानसिक ताणतणाव आणि निराशा असण्याचीही शक्यता असल्याचे काही अभ्यासातून समोर आले आहे. या लोकांना डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर यांसारख्या समस्याही भेडसावतात. त्यामुळे रात्री वेळेत जेवणे केव्हाही उत्तम.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल