हदय हा शरीराचा महत्त्वाचा भाग. पण तरीही रोजच्या धावपळीत हदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. हदयाला गृहित धरुन रोजची कामं, आहार विहार सुरु असतो. हदयाच्या आरोग्यासंबंधी गैरसमजही खूप असतात. जसे हदयासंबंधीचे आजार फक्त पुरुषांनाच होतात, महिलांन नाही वगैरे... तज्ज्ञ म्हणतात, या अशा प्रकारच्या गैरसमजातूनच हदयाच्या आरोग्याकडे, शरीर हदयाच्या आरोग्याबाबत काही संकेत देत असतं, त्याकडे दुर्लक्ष होतं. हदयाशी संबंधित आजारांचे/ समस्यांचे संकेत शरीर देत असतं. त्याकडे वेळीच लक्ष दिलं तर गंभीर समस्यांचा धोका टाळता येतो.
Image: Google
शरीर जेव्हा ह्रदयाच्या बिघडलेल्या आरोग्याबद्दल सांगतं...
1. छातीत दुखणं हे ह्रदयाशी निगडित समस्येचं मुख्य लक्षण आहे. छातीत दुखणं, छातीवर ओझं असल्यासारखं वाटणं, आखडल्यासारखं वाटणं ही लक्षणं ह्रदयाच्या बिघडलेल्या आरोग्याबद्दल सांगत असतात.
2. ह्रदय निरोगी नसल्यास रोजची कामं करताना कमालीचा थकवा येणं, मळमळणं, अपचन होणं, पोटात दुखणं यासारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे केवळ अपचन किंवा बिघडलं असेल पोट असं म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नये.
Image: Google
3. पाणी कमी प्यायलं गेल्यास डिहायड्रेशन होवून चक्कर येतात. पण पाणी व्यवस्थित प्यायलेलं असतानाही अचानक चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं अशी लक्षणं दिसल्यास त्वरित डाॅक्टरांना संपर्क साधावा. ह्रदयाचं रक्त पंप करण्याचं कार्य बिघडलेलं असल्यानं ही लक्षणं दिसतात , त्यामुळे अशा लक्षणांची वेळीच दखल घ्यायला हवी असं तज्ज्ञ म्हणतात.
4. ह्रदयाचा आणि घशाचा, ह्रदयाचा आणि जबड्याचा तसा संबंध नसतो. पण ह्रदयविकारात वेदना घशा आणि जबड्यापर्यंत पसरु शकतात. त्यामुळे घशात, जबड्यात वेदना जाणवल्यास डाॅक्टरांना दाखवावं.
5. थोडंस चालल्यास, पायऱ्यांची चढउतार केल्यास लगेच थकवा येणं म्हणजे ह्रदय कमजोर असण्याचे लक्षण आहे. कामामुळे थकवा आला असेल असं म्हणून महिला थकव्याकडे दुर्लक्ष करतात.
Image: Google
6. वातावरण सामान्य असताना, शरीर थकेल असं कोणतंही काम/ अथवा व्यायाम न करताही घाम येत असेल तर हे ह्र्दयाचं रक्त पंप करण्याचं कार्य बिघडलेलं आहे हे सूचित करतं. हे काम नीट होत नसल्यास कारण नसतांनाही घाम येतो. तसेच जेव्हा आपण उत्साहित असतो किंवा घाबरालेलो असतो तेव्हा ह्रदय वेगानं धडधडतं. पण कारण नसताना, शांत बसलेलं असतानाही ते वेगानं धडधडत असेल तर ते निरोगी ह्रदयाचं लक्षण नाही हे समजावं.
7. दीर्घकाळ टिकून राहाणारा खोकला ह्रदयाचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे. ह्रदय शरीराच्या गरजा पूर्ण करण्यास असर्मथ ठरतं यामुळे फुप्फुसात रक्त गळतं आणि त्यातून खोकला येतो. खोकल्यासोबतच गुलाबीसर कफ येत असल्यास त्वरित डाॅक्टरांकडे जायला हवं.
Image: Google
8. पायावर सूज दिसणं हे ह्रदयाचं काम नीट न चालण्याची खूण आहे. ह्रदयाद्वारे शरीरात होणारा रक्तप्रवाह बिघडतो. ह्रदयाला नेहमीच्या गतीने रक्त पंप करता येत नाही. त्यामुळे नसांमध्ये रक्त पुन्हा येतं आणि अवयवांवर सूज दिसते.