डॉ. नम्रता डाहाके
हवामानाचा आपल्या आरोग्यावर सतत चांगला किंवा वाईट परिणाम हा होत असतो. आयुर्वेदामध्ये सहा ऋतूंचे वर्णन आहे ऋतुनुसार शरीरात अनेक गोष्टी बदलत असतात. म्हणून ऋतुचर्येचे पालन करणे गरजेचे आहे. आयुर्वेदात तीन दोष सांगितले आहेत वात-पित्त(अग्नि)-कफ यामधला कफ शरीराच्या वरच्या भागात राहतो. त्यामुळे श्वास लागणे, खोकला, अधिक झोप येणे, थंडी वाजणे, आळस येणे, सूज येणे इत्यादी व्याधी होताना दिसतात. हेमंत व शिशिर ऋतु मधील थंडीमुळे शरीरात कफ साठात जातो व वसंत मधील उष्णतेमुळे तो कफ द्रवीभूत होऊन शरीरात पसरून व्याधी उत्पन्न करतो. वसंत ऋतूच्या काळात रुग्ण संख्या अधिक वाढलेली असते. सध्याच्या कोरोना लक्षणांचा विचार करता प्रतिकारशक्ती उत्तम असणे, आरोग्याची काळजी घेणे, हवामान आणि ऋतूमानाला अनुकूल दिनचर्या असणे गरजेचे आहे.
हवामानाचा शरीरावर होणारा परिणाम
1)हवामानात अचानक बदल होणे जसे जोरदार वारा, वादळ किंवा थंडीमुळे आरोग्यामध्ये बदल होतो. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली असते त्यांच्या आरोग्याचा ऱ्हास व्यवहारी दृष्ट्या जाणवत नाही. परंतु हृदयरोगी, उच्च रक्तदाबाचे रुग्ण, मधुमेही यांचे व्याधी अधिक वाढतात व त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
2) हिवाळा आणि शरद ऋतूमध्ये पोटाशी संबंधित रोगाची तीव्रता अधिक असते जसे भूक न लागणे, पोट फुगणे, मलबद्धता, पोटात दुखणे इत्यादी.
3) अधिक उष्णतेचा हृदयावर परिणाम होतो याची अनेक डॉक्टर पुष्टी करतात की उन्हाळ्यात बहुतेकदा हृदयविकाराचे झटके येतात. तसेच हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधी रोगाची तीव्रता वाढते. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्यांनी या काळात काळजी घेतलेली अधिक चांगली.
4) हवामानातील आर्द्रता आणि दाब बदलणे देखील प्रतिकारशक्तीवर परिणाम करतो पर्वतावर चढतांना हा प्रभाव अधिक लक्षात येतो. उंचीवर ऑक्सिजन कमी होऊन सामान्य श्वाच्छोश्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे रक्तामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तकण दिसतात.
5) लहान मुले ही हवामान बदलासाठी संवेदनशील असतात परंतु तेथे सर्व काही प्रोढा पेक्षा थोडे वेगळे असते. लहान मुलांचे शरीर परिस्थितीशी अधिक वेगाने जुळवून घेतात म्हणून ते हवामान बदलामुळे लवकर आजारी पडतात पण लवकर बरे पण होतात.
6) ढगाळ वातावरण अधूनमधून होणारा पाऊस आणि रात्री थंडी अशा विचित्र हवामानामुळे साथींच्या आजारांचा सह सांधेदुखी, डोकेदुखी, अंगदुखी, पोटाचे त्रास वाढत आहेत. त्यामुळे अशा वातावरणात आहारविहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.
7) ऋतूबदलाचा आपल्या शरीरावरच परिणाम होतो असे नाही तर मनावरही त्याचा परिणाम होत असतो. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरण व निसर्ग आल्हाददायक असतो. त्यामुळे मन सुद्धा उत्साहित असते तसेच सतत ढगाळ वातावरण असल्यास सूर्यदर्शन न झाल्यास पण मन खिन्न होते. अशाप्रकारे हवामानाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रतिकार शक्तीवर परिणाम होत असतो.
(लेखिका आयुर्वेद रोगनिदान तज्ज्ञ आहेत.)