ऑक्टोबर महिना ‘ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ’ अर्थात स्तनांचा कर्करोग जागरुकतेचा महिना आहे. जगभरातील महिलांमधे स्तनांच्या कर्करोगाचं प्रमाण चिंतनीय असून याबाबतची जागरुकता वाढावी म्हणून ऑक्टोबर महिन्यात जगभरात विविध माध्यमातून स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरुक करणारे संदेश आणि माहिती दिली जाते. उद्देश हाच की जगभरातील महिलांमधे स्तनांच्या कर्करोगाबाबत जागरुकता वाढावी. जगभरात दर वर्षाला स्तनांच्या कर्करोग रुग्णांचं प्रमाण 0.5 टक्क्यांनी वाढतंय. भारतातही आजच्या घडीला दर 28 महिलांमागे एक महिलेला स्तनांचा कर्करोग होत असल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. तसेच स्तनांच्या कर्करोगानं होणार्या मृत्यूचं प्रमाणही वाढलेलं आहे. पण स्तनांचा कर्करोग वेळीच लक्षात आला तर त्यावर योग्य ते उपचार करुन त्याची वाढ रोखता येते तसेच रुग्णाचा जीवही वाचतो त्यासाठी स्तनांच्या कर्करोगाबद्दलची जागरुकता महत्त्वाची आहे.
स्तनांच्या कर्करोगातील जागरुकतेमधील अनेक मुद्यांमधील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या आजारामागील कारणं. स्तनांचा कर्करोग होण्यामागे अनुवांशिकता हे प्रमुख कारण असलं तरी इतरही अनेक कारणं या आजाराला कारणीभूत ठरतात. ही कारणं जीवनशैलीशी निगडित असल्यानं ती माहित असणं गरजेचं आहे असं अभ्यासक म्हणतात. ही कारणं माहित झाली तर त्यावर काम करुन ती कमी करणं , रोखणं या गोष्टी शक्य होतील.
स्तनांचा कर्करोग होतो कारण..
Image: Google
1. वाढतं वजन- बदललेल्या जीवनशैलीचा दुष्परिणाम म्हणजे वजन वाढणे. वजन वाढल्यामुळे अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. वजन वाढल्यानं कंबर, कोलेस्ट्रॉल, हदय याच्याशी निगडित अनेक समस्या निर्माण होतात. वाढत्या वजनाचा परिणाम स्तनांच्या कर्करोग होण्यावरही होतो. स्त्रियांमधे मेनोपॉजनंतर बहुतेक करुन वजन वाढतं. हे वाढलेलं वजन स्तनांच्या कर्करोगास कारणीभूत ठरतं. आरोग्य तज्ज्ञ सांगतात तुम्ही कोणत्याही वयाचे असू द्या पण स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळायचा असेल तर वजन संतुलित ठेवणं, वजन वाढण्यास प्रतिबंध करणं अत्यंत आवश्यक आहे. वजन वाढतंय हे लक्षात आल्यास त्वरित डॉक्टरांना, आहार तज्ज्ञांना संपर्क साधून वाढणार्या वजनाचे नियमन करु शकाणारे आहाराचे नियम माहित करुन घ्यावेत. तसेच आहारासोबतच नियमित व्यायाम केल्यानं शरीरातील अतिरिक्त फॅटस जळतात. वजन संतुलित राहिलं तर स्तनांच्या कर्करोगाचा धोका खूप कमी होतो असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
2. चुकीचा आहार- कॅन्सर सारख्या आजारात आहाराची भूमिका महत्त्वाची असते. फॅटयुक्त आहार यामुळे वजन तर वाढतंच सोबतच स्त्रियांमधे स्तनांच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. आहार तज्ज्ञ म्हणतात कोणत्याही कर्करोगाचा धोका आपल्या बाजूने टाळायचा असल्यास जंक फूड, प्रोसेस्ड फूड, अल्कोहोल, मांसाहारी पदार्थ, अति गोड पदार्थ, रिफाइंड कर्बोदकं टाळायला हवीत.
Image: Google
3. गरोदरपण- कोणत्या वयात स्त्री गरोदर होते हा मुद्दा बाळाच्या आणि आईच्या दोघांच्याही आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. उशिरा मूल होऊ देणे किंवा मूल होऊ न देणं ही कारणंही स्तनांच्या कर्करोगामागे अभ्यासकांना आढळून आली आहेत. तज्ज्ञ म्हणतात की योग्य वयात गर्भधारणा न झाल्यास त्याचा परिणाम म्हणजे स्तनातील ऊती अँस्ट्रोजन नामक संप्रेरकाच्या जास्त संपर्कात येतात. ही स्थिती महिलांमधे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. तिशीच्या आत मूल जन्माला घातल्यानं, तसेच मूल होऊ दिल्यानं स्त्रियांमधील स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होत असल्याचं अभ्यासकांना आढळून आलं आहे.
Image: Google
4. पाळी आणि मेनोपॉज- तज्ज्ञ म्हणतात की ज्यांना पाळी वयाच्या 12 वर्षांच्या आत आली असेल किंवा ज्यांना मेनोपॉज उशीरा येतो त्यांच्यात स्तनाच्या कर्करोगाचा धोका असातो. या दोन्ही गोष्टींमुळे स्तनांच्या ऊतींवर अँस्ट्रोजन संप्रेरकाचा घातक परिणाम होतो. त्यामुळेच अशी परिस्थिती ज्या महिलांमधे असते त्यांनी वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं स्तनांची तपासणी करुन घ्यायला हवी असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
5. मद्य सेवन - महिलांनी मद्य पिण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. मद्य घेणं हा अनेक महिलांना प्रतिष्ठेचा विषय वाटतो. पण तज्ज्ञ म्हणतात की स्तनांच्या कर्करोगाचा धोका पाहाता हा काळजीचा विषय आहे. स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी महिलांनी मद्यापासून लांब राहायला हवं.