तोंड येणे आणि त्यामुळे होणारी तोंडाची आग हा सर्वसामान्यांमध्ये नेहमी आढळणारा आजार आहे. सामान्यत: हा सौम्य आजार वाटत असला तरीही रुग्णांना तोंड आल्यावर तिखट तसेच मसल्याचे पदार्थ खाण्यास त्रास होतो. हा जर वाढत गेला तर काही रुग्णांना रोजचे जेवण करणे सुद्धा कठीण होऊन जाते. आता हे तोंड येते म्हणजे नेमके काय, अशी कोणती कारणे असतात ज्यामुळे तोंडीची इतकी आग होते. या समस्य़ांवर कोणते उपाय करायला हवेत याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. त्यासाठीच तोंडाची आग अर्थात तोंड येणे याच्या काही सर्वसामान्य कारणांची माहिती सोप्या भाषेत सांगत आहेत प्रसिद्ध मुखविकारतज्ज्ञ डॉ. प्रियांका साखवळकर..
१. Recurrent Aphthous Ulcer - हा तोंड येण्याचा नेहमीचा आणि सौम्य असा आजार आहे. यामध्ये जखमा लहान मोठया आकारात दिसतात आणि साधारणतः सात ते आठ दिवसात आपोआप या जखमा बऱ्याही होतात. हा त्रास झाल्यास रुग्णाला विशेष उपचारांची गरज नसते परंतु या जखमा वारंवार येत असतील तर एकदा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
२. Oral Submucous Fibrosis (OSMF) - हा आजार सामान्यत: तंबाखू किंवा गुटखा खाणाऱ्या लोकांमध्ये आढळून येतो. या आजारामध्ये गालामध्ये पट्टे तयार होऊन रुग्णाला तोंड उघडणे अवघड होते. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास हा आजार गंभीर स्वरूपाच्या कर्करोगामध्ये रूपांतरीत होऊ शकतो.
३. Oral Lichen Planus - तोंडात दोन्ही गालावर एकप्रकारची जखम होते. असे झाल्यास याठिकाणी आगआग होत असल्याने रुग्णांना साधे जेवणेही अवघड होते. तोंडात होणारे दृश्य बदल डायबेटीस, ब्लडप्रेशर यांसारखा आजार असणाऱ्या रुग्णांमध्ये अथवा काही औषधांच्या सेवनाने अशा जखमा होतात. वेळीच इलाज न केल्यास रुग्णांना रोजच्या जेवणालाही त्रास होतो.
४. Oral Cancer - कर्करोग हे तोंडातील जखमा किंवा आग होण्याचे सर्वात गंभीर स्वरूपाचे कारण आहे. तोंडातील जखम जर तीन आठवड्यापेक्षा जास्त दिवस भरत नसेल तर वेळीच तपासणी करून घेणे आवश्यक असते. आपण अनेकदा तोंड आले होईल कमी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करत राहतो. पण कर्करोगापासून वाचण्यासाठी लवकर निदान हाच सर्वात प्रभावी उपचार आहे.
५. Post Radiation (Cancer Therapy) Oral Mucositis - कर्करोगच्या उपचारासाठी रेडिएशन थेरपी ही सामान्यपणे वापरली जाणारी उपचारपद्धती आहे. परंतु या उपचाराचे दुष्परिणाम तोंडात दिसतात. या उपचारांमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि जखमा होतात. वेळीच योग्य ते उपचार झाले नाहीत तर रुग्णांना साधे जेवण करणेही कठीण होते.