Join us   

पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट असते, ती उलटल्यावर पाणी फेकून द्यावे की प्यावे? अमेरिकन अभ्यास सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 6:26 PM

The expiry date on the water bottle is for the bottle and not for water पाणी कधीच शिळं होत नाही, मग पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट का असते? कशाची असते?

''जल है तो जीवन है'', आपण हे वाक्य ऐकलंच असेल, आणि खरंच पाणी आपल्या जीवनात मुख्य बाजू सांभाळते. ही संपूर्ण सृष्टी पाण्यावर चालते. मानवी जीवन जगण्यासाठी पाणी हवेच. जस जशी लोकसंख्या वाढत चालली आहे. त्याच प्रमाणे पाण्याच्या तुटवड्याला देखील सामोरे जावे लागत आहे. म्हणून पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला जातो. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टी पाण्यावाचून अपूर्ण आहेत.

आजकाल पाणी साफ करण्याचे अनेक प्युरीफायर बाजारात उपलब्ध आहेत. पाण्याच्या बाटल्या बाजारात विकले जातात. मात्र, त्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट का छापली जाते? याचा आपण कधी विचार केला आहे का? अन्न जसे शिळे होते, तसेच पाणी देखील शिळे होते का? असे अनेक ब्रँड आहेत ज्यांनी पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहायला सुरू केली आहे. अनेक वस्तूंवर एक्सपायरी डेट लिहिली जाते, परंतु पाणी शिळे होते का? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.

अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) पाण्याच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहिणे बंधनकारक केलेले नाही. तज्ज्ञांनी असे करण्यामागचे कारण सांगितले आहे. जाणून घेऊया यामागचे खरे कारण..

पाणी होत नाही खराब तर प्लास्टिकची बाटली..

लाईव्ह साईन्सच्या रिपोर्टनुसार, पाणी कधी खराब होत नाही. बाटलीवर लिहिलेली एक्सपायरी डेट प्लास्टिकला जोडलेली असते. या प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर फक्त पाणी साठवण्यासाठी केला जातो. वास्तविक, पाहता ठराविक वेळानंतर प्लास्टिक पाण्यात विरघळू लागते. त्यामुळेच अनेक वर्षे प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी ठेवल्याने पाण्याच्या चवीवर परिणाम होऊन दुर्गंधीही येऊ लागते. साधारणपणे या बाटल्यांवर उत्पादनाच्या तारखेपासून २ वर्षांची एक्सपायरी डेट लिहिली जाते. या तारखेच्या आत साठवलेले पाणी वापरणे चांगले मानले जाते.

प्लास्टिकच्या बाटल्यांचे दुष्परिणाम

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ सायन्सेसच्या म्हणण्यानुसार,  ''प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बनवण्यासाठी बीपीए नावाचे रसायन वापरले जाते. हे रसायन तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. याच्या सेवनामुळे रक्तदाब, टाइप-2 मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, एक्सपायरी डेट पुढील पाणी पिणे आपल्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

एकल वापराच्या बाटल्या धोकादायक..

पाणी साठवण्यासाठी आणि बाजारात विकण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बाटल्या या एकल वापराच्या प्लास्टिकच्या असतात. जे कमी खर्चात तयार केले जातात, अशा बाटल्या रिसायकल करता येत नाही. बर्‍याचदा काही लोक या बाटल्या बराच काळ वापरत राहतात, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यातील पाणी प्यायल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यपाणी