कोरोना संसर्गानं , त्याच्या वेगवेगळ्या उत्परिवर्तनानं ( म्युटेशननं) जगभरात भीतीची लाट आणली. आज आरोग्याचा विचार करताना फक्त कोरोनाच डोळ्यासमोर ठेवला जातो. पण आरोग्य तज्ज्ञ म्हणतात, की केवळ कोरोनाकडेच लक्ष केंद्रित केल्यानं आपण केवळ कोरोनापासून वाचू पण हदयविकाराच्या धोक्याचं काय? तो तर आहेच. हदयविकार, हदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार हे महामारी वाटावी इतके या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. आज पूर्वीच्या तुलनेत हदयासंबंधित गुंतागुंतीचे आजार उद्भभवल्यावर त्यावर उपचार करणार्या शस्त्रक्रिया आज मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. या शस्त्रक्रियांमुळे रुग्णाचा जीव वाचतो. पण उपचार उपलब्ध आहेत म्हणून हदयरोगाच्या रुग्णांचं प्रमाण कमी होतंय असं नाही. उलट ते दिवसेंदिवस वाढतंच आहे. हदयविकाराशी संबंधित रुग्णांची भयावह वाटावी अशी आकडेवारी बघितल्यास हा आजार रोखणं , तो होता होईल असे प्रयत्न करुन हदयविकाराच्या आजाराचा धोका अडवणं एवढंच आपल्या हातात आहे ,असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
पण आरोग्यतज्ज्ञांच्या मते सर्वच परिस्थितीत हदयविकाराचा धोका आपण पूृर्णपणे टाळू शकतो असं नाही. कारण हदयविकाराच्या बाबतीत काही गोष्टींमधे बदल केल्यास परिणाम दिसून येतो. पण हदयविकाराच्या बाबतीत काही घटक असे असतात की त्यात बदल करता येत नाही. पण बदल करता येणार्या गोष्टींमधे बदल केल्यास हदयविकाराचा धोका टाळण्याबाबतची एक बाजू तरी भक्कम होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, धूम्रपान, स्थूलता, बैठी जीवनशैली आणि अनारोग्यकारक आहार या गोष्टींमुळे हदयविकाराचा धोका असतो.
Image: Google
पण आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करुन आपण हा धोका टाळू शकतो. पण हदयविकारात अनुवांशिकता, लिंग, वय हे देखील कारणीभूत घटक असून ते बदलता येत नाही. पण प्रामुख्याने हद्यविकाराचा धोका हा जीवनशैलीशी निगडित असल्याचं तज्ज्ञ आणि संशोधकांना आढळून आलं आहे. त्यामुळे नवीन वर्षाचा संकल्प करताना केवळ कोरोना डोळ्यासमोर ठेवू नका तर हदयविकाराचा धोकाही आपल्याला टाळायचा आहे, हा उद्देश ठेवून जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करा असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ जगभरातील आणि सर्व वयोगटातील लोकांना देत आहेत.
Image: Google
हदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 4 गोष्टी महत्त्वाच्या
1. व्यायाम करा
सध्याची जीवनशैली बैठी आहे असं आपण म्हणतो. पण बसून सतत काम करत राहाणं हे वास्तव आज अनेक स्त्री पुरुष यांच्या वाट्याला आलं आहे. त्यामुळे व्यायामाचं महत्त्व समजत असूनही अनेकजण केवळ कामाच्या धावपळीत व्यायामासाठी वेगळा वेळ काढू शकत नाही. पण हदयाला ही अडचण समजण्याचं कारण नाही. बैठ्या जीवनशैलीचा दुष्परिणाम एका सीमेपलिकडे गेला तर हदयविकाराचा धोका न टळणारा आहे. तो टाळायचा असेल तर कामाइतकंच आपल्या आरोग्याला महत्त्व देणं आणि त्यासाठी आवर्जून रोज व्यायामाला वेळ देणं आवश्यक आहे. तज्ज्ञ म्हणतात आठवड्यातले पाच दिवस रोज 45 मिनिटं ते 1 तास व्यायाम करणं आवश्यक आहे. त्यात योग,पळणं, चालणं, पोहोणं, सायकलिंग करणं, दोरीवरच्या उड्या मारणं, जिमला जाऊन व्यायाम करणं आवश्यक आहे. तसेच कामामुळे मनाला आलेला थकवा घालवण्यासाठी आठवडा, पंधरवाड्यातून मित्र मैत्रिणींसोबत समुहानं ट्रेकिंगला जाणं किंवा एखादा खेळ खेळणं आवश्यक आहे. यामुळे शरीर आणि मनावरचा ताण निघून जातो. सोबत कोणी असलं की शारीरिक कसरत करायला उत्साह मिळतो, प्रेरणा मिळते. बसून काम करणं ही कामाची गरज आहे. पण कामच्याशिवाय आपली जीवनशैली केवळ बैठी असू नये याची काळजी घेणं महत्त्वाचं आणि त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
Image: Google
2. आरोग्यदायी आहार
खाण्यापिण्याच्या आरोग्यदायी सवयींमुळे हदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हदयविकाराचा धोका उत्पन्न करणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणं या समस्या उदभवण्याचा धोकाही कमी होतो. त्यामुळे आहारात मीठाचं प्रमाण योग्य ठेवणं, शक्यतो कमी ठेवून रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. आपल्या रोजच्या आहारात भाज्या, फळं यांचा समावेश असणं, सोबतच कबरेदकं, फॅटस, प्रथिनं यांचं प्रमाण संतुलित ठेवणंही गरजेचं आहे. स्वयंपाक करताना तेल कमी वापरणं, मीठ प्रमाणात घालणं, शिवाय तळलेले पदार्थ खाणं टाळणं आवश्यक आहे. तळलेले पदार्थ खाल्ल्यानंतर पचनास त्रास होतो. चयापचय क्रिया बिघडून त्याचा हदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो. तसेच खूप गोड पदार्थ रोज खाणं टाळावं. एखाद्या दिवशी तळलेले किंवा गोड पदार्थ खाल्ले तर चालतात पण त्याचं प्रमाणही प्रमाणातच हवं. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या खाद्य पदार्थांच्या गाड्यावरचे, हॉटेलमधले पदार्थ टाळावेत. त्यात तेल आणि मीठ याचं असलेलं प्रमाण, तेलाचा दर्जा, मसाले आपल्या आरोग्यास धोका निर्माण करतात. त्यामुळे घरी तयार केलेला पौष्टिक -सात्विक आणि संतुलित आहार खाणं ही आहारविषयक शैली हदयविकाराचा धोका टाळू शकतो.
Image: Google
3. धूम्रपान टाळणं
धूम्रपान करण्याची सवय पुरुषांच्याबरोबरीनं महिलांमधेही वाढते आहे. धूम्रपानाच्या सवयीचा हदयावर वाईट परिणाम होतो. त्यातच जर हदयावर अँंजिओप्लास्टी सारख्या शस्त्रक्रिया झाल्या असल्यास आणि तरीही धूम्रपान चालू ठेवल्यास त्या शस्त्रक्रियांचा आणि उपचारांचा काहीच परिणाम होत नाही. त्यामुळे धूम्रपानाची सवय असल्यास ती तातडीने सोडणं हे हदयविकाराचा धोका टाळण्यासाठी उचलेलं मोठं पाऊल ठरेल. धूम्रपान करण्याची सवय ही जुनी असेल तर ती सोडण्यास वेळ लागतो, प्रयत्न करावे लागतात. एकट्याचे प्रयत्न अपुरे पडतात. अशा वेळेस तज्ज्ञांच्या सहाय्यानं धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न केल्यास ही सवय लवकर सुटणं सोपं जाईल.
Image: Google
4. नियमित आरोग्य तपासणी
आपल्याला काय होत? असा समज प्रत्येकाचा स्वत:विषयी असतो. हा समज असल्यानंच आपण आपल्या आरोग्याबाबत गाफिल राहतो. हा समज आणि गाफिलपणा एक दिवस अचानक, अवेळी हदयविकाराच्या धोक्याच्या स्वरुपात उभा राहातो. हे अचानक येणारं हद्यविकाराचं संकट आपल्यापासून दूर ठेवायचं असेल तर स्त्री आणि पुरुष यांनी नियमित आरोग्य तपासणी करायलाच हवी.
आरोग्य तपासणी नियमित केल्यास हदयविकार , कर्करोग यांची शक्यता किंवा सुरुवात लगेच लक्षात येऊन त्याबाबतचे उपचार आणि काळजी घेणं वेळेवर सुरु होऊ शकतं. आणि ज्यांना मुळातच हदयाशी संबंधित आजार आहे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळापत्रकाप्रमाणे तपासण्या कराव्यात. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर वर्षातून एकदा हदयाचं आरोग्य तपासणार्या चाचण्या अवश्य करायला हव्यात. यामधे इसीजी, इकोडायोग्राफी , ट्रेडमिल टेस्ट या चाचण्यांचा समावेश होतो. हदयविकाराच धोका वेळीच ओळखण्यासाठी या चाचण्या महत्त्वाच्या ठरतात. हे वर्ष संपण्याआधीच वर्षअखेरीच्या सेलिब्रेशनचं प्लॅनिंग करण्याआधी आपल्या जीवनशैलीत हे 4 बदल करण्याचे नियोजन आधी करा.