हायपोथायरॉडिझम आणि हायपरथायरॉडिझम हे थायरॉइडशी संबंधित दोन मुख्य प्रकार आहेत. थायरॉइड ग्रंथीमधून जे हार्मोन्स शरीरात स्त्रवतात ते म्हणजे टी ३ आणि टी ४ . आणि यांचं संतुलन टीएसएच अर्थात थायरॉइड स्टिम्यूलिटींग हार्मोन करते. आणि जेव्हा टी ३ आणि टी४ च्या मात्रेत बिघाड होतो म्हणजे त्यांची पातळी कमी किंवा जास्त होते तेव्हा त्यांना नियंत्रित् करणाऱ्या थायरॉइड स्टिम्यूलिटींग हार्मोनमधे बिघाड झालेला असतो. थायरॉइडसंबधीच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांमधील ७० टक्के महिलांना काही कल्पनाच नसते की आपल्याला थायरॉइडसंबंधी व्याधी आहे. कारण यासंबंधित आजारामधे दिसून येणारी लक्षणं नसतातच. अचानक लक्षात येतं की वजन वाढतंय, थकवा येतोय, केस गळताय, त्वचा कोरडी झालीये. ही लक्षणं तीव्रतेनं जाणवतात तेव्हा महिला दवाखान्यात येतात. तेव्हा रक्ततपासणी केल्यावर थायरॉइड संबधीच्या आजाराचं निदान होतं. स्त्रियांमधे हायपोथायरॉडिझमचं प्रमाण जास्त आहे. हायपरथायरॉडिझमचं प्रमाण कमी आहे.आयोडिन हे थायरॉइड ग्रंथीसाठी उपकारक समजलं जातं. आयोडिन हे मेंदूचं काम आणि शरीराचं एकूणच काम व्यवस्थित चालण्यासाठी आवश्यक असलेलं खनिज आहे . आयोडिनची कमतरता हे थायरॉइडसंबंधी आजार होण्याचं मुख्य कारण आहे.
जानेवारी हा महिना थायरॉइड अवेअरनेस महिना म्हणून साजरा केला जातो. गेल्या काही काळात थायरॉइडच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून थायरॉइडशी निगडीत समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गळ्याला येणारी थायरॉइडची गाठ हे थायरॉइडचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. ही ग्लँड किंवा गाठ यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांनी थायरॉइडच्या समस्येवर उपाय म्हणून ५ महत्त्वाचे पदार्थ सांगितले आहेत. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास थायरॉइड असणाऱ्यांना त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पाहूयात हे पदार्थ कोणते....
आवळा - आवळा आरोग्यासाठी चांगला असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. थंडीच्या दिवसांत बाजारात उपलब्ध असणारा आवळा आवर्जून खायला हवा. अनेक पोषक घटक असलेल्या आवळ्याच्या सेवनाने प्रतिकारशक्ती तर वाढतेच पण विविध आजारांशी लढण्याची ताकदही वाढते. आवळ्यामध्ये संत्र्यापेक्षा ८ पटीने तर डाळींबापेक्षा १७ पटीने जास्त व्हिटॅमिन सी असते. केसांसाठी तर आवळा अतिशय उपयुक्त असून केस पांढरे होणे, गळणे, केसांत कोंडा होणे यांसारख्या तक्रारींवर आवळा उत्तम उपाय ठरतो.
नारळ - खोबरे हा थायरॉइड असणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम अन्नघटक आहे. कच्चे खोबरे किंवा खोबऱ्याचे तेल दोन्हीही अतिशय उपयुक्त असते. खोबऱ्यातील ठराविक घटकांमुळे मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. त्यामुळे तब्येत चांगली राहण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया - भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक जास्त प्रमाणात असते. या झिंकमुळे शरीरातील थायरॉइड हार्मोन्स बॅलन्स होण्यास मदत होते. शरीरात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शोषली जाणे अवघड असते पण झिंकमुळे ही प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते.
ब्राझिल नटस - थायरॉइड हार्मोन्सचे संतुलन व्हावे यासाठी सेलेनियम हा घटक गरजेचा असतो. T4 आणि T3 हे घटक आवश्यक असतात जे ब्राझिल नटमध्ये पुरेशा प्रमाणात असतात. दिवसभरात ३ ब्राझिल नट खाल्ल्यास अँटीऑक्सिडंटस आणि थायरॉइड मिनरल्ससाठी तो उत्तम सोर्स ठरु शकतो.
हिरवे मूग - हिरव्या मूगात प्रोटीन, अँटीऑक्सिडंटस, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेसट, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. थायरॉइडचा त्रास असणाऱ्यांना सामान्यपणे बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. पण हिरव्या मूगात असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होण्याची समस्या दूर होते. मूग पचायला हलके असल्याने थायरॉइड असणाऱ्यांनी मूग खाणे फायद्याचे असते.